स्तनी वर्गाच्या अपरास्तनी उपवर्गातील एक गण. या गणात नर (माणूस), वानर, माकड, कपी इ. प्राण्यांचा समावेश होतो. या प्राण्यांमध्ये उच्च दर्जाचे अनुकूलन घडून आलेले आहे.नर-वानर गणातील प्राण्यांमध्ये आदिम अपरास्तनी प्राण्यांचे, कीटकाहारी गणातील प्राण्यांचेही विशेष काही णधर्म आढळत असून त्यांचे अन्य गुणधर्म वेगळे असतात.या गणातील प्राण्यांची सामान्य लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत :
हे प्राणी सामान्यत: सर्वभक्षी आहेत. त्यांना हाताचा अथवा पायाचा अंगठा इतर बोटांच्या समोर आणता येतो. अगदी खालच्या दर्जाचे नर-वानर (उदा., लेमूर) हालचाल करताना हातापायांचा उपयोग करतात. लेमूरपेक्षा वरच्या दर्जाचे नर-वानर हातांच्या साहाय्याने झाडांवर चढतात, फांदी पकडून लोंबकळतात किंवा एका फांदीवरून दुसरीकडे जातात. यांच्यापेक्षाही वरच्या दर्जाचे नर-वानर मागील पायांवर उभे राहून चालू शकतात किंवा धावू शकतात (उदा.,बॅबून). हातापायाच्या बोटांच्या टोकांवर चपटी नखे किंवा काही वेळा नख्या असतात. चेहऱ्याचा काही भाग आणि हाताचा व पायाचा तळवा सोडून शरीरावर केस असतात. वक्ष-मेखलेत जत्रुकास्थी (खांद्याचे हाड) असते. छातीवर दोन स्तनग्रंथी असतात. डोळ्यांची खोबण अस्थींनी वेढलेली असते. दातांचे पटाशीचे दात, सुळे, उपदाढा आणि दाढा असे चार प्रकार असतात. मात्र, दातांची संख्या इतर गणांहून कमी असते. डोळे चेहऱ्या च्या समोर असून द्विनेत्री दृष्टी असते. त्यामुळे त्यांच्या अनेक जाती गंध आणि श्रवणक्षमतेऐवजी दृष्टिक्षमतेचा अधिक वापर करतात. कवटी आणि कवटीतील बृहत्रंध्र (पश्चतालू रंध्र) पाठीच्या कण्याकडे अधिक झुकलेले असते. जेव्हा चतुष्पाद अवस्थेतून हे प्राणी दोन पायांवर उभे राहू लागले तेव्हा त्यांच्या कवटीतील हा भाग पाठीच्या कण्याकडे झुकला. त्यामुळे या प्राण्यांना शरीराचा तोल सांभाळता येऊ लागला आणि त्यांना समोरचे, आजूबाजूचे दूरपर्यंत पाहता येऊ लागले. त्यांचा मेंदू आकाराने मोठा आणि विकसित असतो. प्रमस्तिष्क मोठे असून त्यावर वळ्या असतात. हे प्राणी बुद्धिमान आणि समाजप्रिय आहेत. त्यांच्या अनेक जाती समूहाने राहतात. नराची वृषणे वृषणकोशांत असतात आणि शिश्न लोंबते असते. मादीमध्ये गर्भावधी आणि भ्रूणाचा विकासकाल दीर्घ असतो. मादी सामान्यपणे एकावेळी एकाच पिलाला जन्म देते आणि मातापिता पिलांची काळजी घेतात. नर-वानर गणाच्या सु. ३७६ जाती आहेत.
नर-वानर गणाचे दोन उपगण पडतात : (१) प्रोसिमिआय आणि (२) अँथ्रोपॉयडिया.
प्रोसिमिआय : या उपगणात सहा कुले असून त्यांत अंतर्भूत प्राणी खालीलप्रमाणे आहेत.
ट्युपेइडी : या कुलातील प्राणी लहान व सडपातळ असून खारीसारखे असतात. उदा., श्र्यू .
लेमुरॉइडी : या कुलातील प्राणी वृक्षवासी असून निशाचर आहेत. डोळे मोठे असून खोबणीतून थोडे बाहेर आलेले असतात. उदा., लेमूर
इंड्रीडी : या कुलातील प्राणी लेमूरांपेक्षा बरेच मोठे असतात. ते वृक्षवासी असून पूर्णपणे शाकाहारी असतात. त्यांचे २–५ प्राण्यांचे कौटुंबिक गट असतात. उदा., इंड्री.
डॉटोनीइडी : या कुलात एकाच प्रजातीचा समावेश आहे. हे प्राणी एकलकोंडे व निशाचर असतात. उदा., आय-आय.
लोरिसिडी : या कुलातील प्राणी वनात राहणारे व वृक्षवासी असून ते रांगत पुढे सरकतात. त्यांचे मुस्कट आखूड असून डोळे मोठे असतात. उदा., दक्षिण भारतातील लाजवंती (लोरिस).
टार्सिइडी : या कुलात एकच प्रजाती आहे. हे प्राणी लहान असून त्याच्या शेपटीच्या टोकावर केसांचा झुपका असतो. उदा., टार्सिअर.
अँथ्रोपॉयडिया : या उपगणात दोन श्रेण्या असून त्या प्लॅटिऱ्हिनी आणि कॅटॅऱ्हिनी या नावांनी ओळखल्या जातात.
प्लॅटिऱ्हिनी : या श्रेणीमध्ये पश्चिम गोलार्धातील म्हणजेच नव्या जगातील माकडांचा समावेश केला आहे. यातील प्राण्यांमध्ये नाकपुड्या एकमेकींपासून दूर असतात. हाताचा अंगठा बोटांसमोर आणता येत नाही. काहींचे शेपूट हुकासारखे वळलेले असून त्याद्वारे ते झाडाला लोंबकळू शकतात. ढुंगणावरचे घट्टे (श्रोणि-किण) व गालातील पिशव्या (कपोल-कोष्ठ) नसतात. या श्रेणीमध्ये खालील दोन कुले आहेत.
कॅलिथ्रिसिडी : या कुलातील प्राणी फार लहान असून ते वृक्षवासी व दिनचर आहेत. कान मोठे असून त्यांवर पांढरट केसांचे झुपके असतात. उदा., रेशमी मार्मोसेट, टेमॅरिन.
सेबिडी : या कुलातील प्राणी वृक्षवासी व दिनचर आहेत. त्यांपैकी बऱ्या च प्राण्यांचे शेपूट हुकासारखे वळलेले असते. उदा., स्पायडर माकड, हाउलर माकड.
कॅटॅऱ्हिनी : या श्रेणीमध्ये जगाच्या पूर्व गोलार्धातील म्हणजेच जुन्या जगातील माकडे, कपी आणि माणूस यांचा समावेश केला आहे. या प्राण्यांच्या नाकपुड्या जवळजवळ असून त्यांची भोके खालच्या बाजूस असतात. हाताचा अंगठा इतर बोटांसमोर आणता येतो. शेपूट पकड घेणारे नसते, तर काहींमध्ये ते अवशेषी असते. काहींमध्ये श्रोणि-किण व कपोल-कोष्ठ असतात. या श्रेणीमध्ये खालील चार कुले आहेत.
सर्कोपिथेसिडी : या कुलातील प्राणी झाडावर चढण्यात पटाईत असून काही पूर्णपणे भूचर आहेत. उदा., मॅकाका माकड, ऱ्हीसस माकड, बॅबून, मँड्रिल, नासावानर (लंगूर).
हायलोबेटिडी : या कुलातील प्राणी सडपातळ आणि फार चपळ असतात. त्यांच्यात श्रोणि-किणांची वाढ चांगली झालेली असते. उदा., गिबन, सिॲमँग.
पाँजिडी : या कुलात कपींचा समावेश करण्यात आला आहे. या प्राण्यात आणि मानवात बरेच साम्य आहे. उदा., चिंपँझी, गोरिला, ओरँगउटान.
होमिनिडी : या कुलात मानवाचा समावेश असून शरीर ताठ उभे असते. शरीराचा सर्व भार पायांवर असतो. उदा., मानव (आधुनिक आणि लुप्त पूर्वगामी).
आजही जगभरातील उष्ण प्रदेशातील दुर्गम भागात काहीअमानुषाभ नर-वानर (नॉनहोमिनॉयड) मोठ्या संख्येने राहतात. त्यांच्या काही जातींशी अजूनही माणसाचा संपर्वâ आलेला नाही. १९९० सालानंतर वैज्ञानिकांनी मॅलॅगॅसी, आफ्रिका, आशिया व ब्राझील येथे नर-वानराच्या काही नवीन जाती आढळल्याचे सुचविले आहे. या जाती वन्य अवस्थेत असून त्यांच्या अस्तित्वाला धोका असल्याचे लक्षात आले आहे. इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर या संस्थेने तयार केलेल्या धोकादायक जातींच्या यादीत या जातींचा समावेश केलेला आहे. सध्या या जातींचे आणि त्यांच्या अधिवासाचे संवर्धन करण्याचे प्रयत्न चालू आहेत.