शीळ घालणारा एक लहानसा पक्षी. पॅसेरीफॉर्मिस गणाच्या म्युसिकॅपिडी कुलात नाइटिंगेलचा समावेश होतो. याचे शास्त्रीय नाव ल्युसीनिया मेगॅऱ्हिंकस आहे. सामान्यपणे उन्हाळ्यात तो यूरोप आणि पश्चिम आशियात दिसतो, तर हिवाळ्यात तो आफ्रिकेत स्थलांतर करतो. अमेरिकेत मात्र तो आढळून येत नाही. दाट वने, राखीव राने आणि नद्या असलेल्या खोऱ्यात तो राहतो

नाइटिंगेल (ल्युसीनिया मेगॅऱ्हिंकस)

नाइटिंगेल आकाराने चिमणीएवढा असून शरीराची लांबी १५–१८ सेंमी. असते. पाठीचा रंग तांबूस तपकिरी असून पोटाकडील रंग अधिक फिकट तपकिरी असतो. शेपूट चिमणीच्या शेपटीहून अधिक लांब असून ती गडद तपकिरी असते. गळा आणि पोट पांढरट असतात. चोच आणि पाय तपकिरी असून डोळ्यांभोवती फिकट पांढरी वर्तुळे असतात. नर आणि मादी सारखेच दिसतात.

नाइटिंगेल मिश्राहारी असून त्याच्या आहारात फळे, बिया आणि कीटक असतात. तो भित्रा असून त्याच्या जवळपास कोणी फिरकले की एकदम झुडपात शिरून दिसेनासा होतो. उंदीर, खेकडा, मांजरे आणि साप इ. या पक्ष्याचे भक्षक आहेत. नाइटिंगेलची उन्हाळ्यात वीण होते. एखाद्या दाट झुडपात किंवा जमिनीवर पाने, काटक्या व गवत वापरून मादी वाटीसारखे घरटे बांधते. मे महिन्यात मादी तपकिरी हिरवट रंगाची ४–५ अंडी घालते. अंडी उबविण्याचे काम ती करते. दोन आठवड्यांनी अंड्यांतून पिले बाहेर पडतात. नर आणि मादी दोघे मिळून पिलांची काळजी घेतात.

नाइटिंगेल म्हणजे रात्री गाणारे. हा पक्षी दिवसा आणि रात्रीही गातो. शीळ घालण्याची वृत्ती या पक्ष्याच्या नरामध्ये असून मादीला आकर्षित करण्यासाठी तसेच परिसरावर हक्क जाहीर करण्यासाठी तो गातो. एकेकटे नर पहाटेच्या वेळी गातात. नागरी परिसरात इतर आवाजांवर मात करण्यासाठी ते अधिक मोठ्याने आवाज काढतात. सुरेल आवाजामुळे साहित्य आणि कला क्षेत्रांत नाइटिंगेल पक्ष्यावर अनेक काव्ये आणि कलाकृती निर्मिल्या गेल्या आहेत.