कास्थिमत्स्य वर्गाच्या सेलॅची उपवर्गातील हायपोट्रेमॅटा गणात रे माशांचा समावेश होतो. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर आढळणाऱ्या डॅसिॲटिडी मत्स्य कुलातील एका रे माशाला पाकट म्हणतात. त्याचे शास्त्रीय नाव डॅसिॲटिस सेफेन आहे. तो समुद्रतळाशी वावरतो (पहा : रे मासे).
पाकटाच्या शरीराची लांबी सु. १∙२ मी. असून वजन सु. ४५ किग्रॅ.पर्यंत असते. सर्वसाधारण रे माशांप्रमाणे त्याच्या शरीराचे डोके, धड आणि शेपूट असे भाग असतात. मुख, डोके आणि धड यांना वक्षपरांच्या जोडीने पूर्णपणे वेढून टाकल्यामुळे पाकट मासा एखाद्या तबकडीसारखा किंवा पतंगासारखा दिसतो. मुख आणि कल्ले शरीराच्या अधर भागावर असतात. वक्षपरातील शलाका (ॲरे) तबकडीच्या बाजूला ठळकपणे दिसतात. तबकडीचा व्यास सु. १∙८ मी.पर्यंत असतो. पाकटाच्या शरीराची रुंदी नेहमीच लांबीपेक्षा जास्त असते. शेपटी लांब व चाबकासारखी असते. शेपटीच्या सुरुवातीच्या पृष्ठभागावर एक दंतुर नांगी असून तिच्या तळाशी विषग्रंथी असतात. नांगीचा उपयोग पाकट स्वसंरक्षणासाठी करतो. त्याने नांगी भोसकल्यास जखम होऊन विष मनुष्याच्या शरीरात गेल्यामुळे वेदना होतात. नांगी झिजल्यावर त्या जागी दुसरी नवीन नांगी येते.
पाकट मांसाहारी असून चिंगाटी, शेवंडे, खेकडे, मृदुकाय प्राणी आणि इतर मासे हे त्याचे अन्न आहे. तो अंडजरायुज आहे. फलन मादीच्या अंडनलिकेत होते. आंतरफलनानंतर मादी तिच्या शरीरात तयार झालेल्या चौकोनी पिशवीत अंडी घालते. अशा पिशव्या ती शरीरापासून मोकळ्या करून समुद्रतळाशी सुरक्षित जागी चिकटवून ठेवते. पिलांची वाढ झाल्यानंतर ती पिशवीतून बाहेर येतात.
पाकटाचे मांस खाल्ले जाते. त्यांच्या यकृतापासून आणि शरीरापासून तेल मिळवितात. त्यांना अनुक्रमे यकृत तेल व शरीर तेल म्हणतात. यकृत तेलात अ आणि ड ही जीवनसत्त्वे असतात. शरीर तेलाचा उपयोग वंगण, खाद्यतेल आणि साबण तयार करण्यासाठी केला जातो. त्यांच्या त्वचेपासून कमाविलेले कातडे विविध प्रकारे वापरतात. पावसाळ्यात मुंबईच्या किनाऱ्याला पाकट मोठ्या संख्येने आढळतात. पाकटाच्या नांगीने केलेल्या इजांमुळे माणसे जखमी झाल्याच्या अनेक घटना घडतात.
https://www.youtube.com/watch?v=Nbuu1Fa-c1k