रॉबर्ट एफ. एंजेल : (१० नोव्हेंबर १९४२). अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ आणि नोबेल पुरस्काराचा सहमानकरी. वित्तीय बाजारपेठातील अनाकलनीय चढउतारांच्या काल-श्रेणीची विश्लेषण पद्धती विकसित करण्याबद्दल क्लाइव्ह डब्ल्यू. जॉन  ग्रेंजर (Clive William John Granger) याच्या बरोबरीने अर्थशास्त्र विषयातील २००३ मध्ये नोबेल स्मृती पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.

एंजेल यांचा जन्म सिऱ्याकू, न्ययॉर्क येथे झाला. त्यांनी १९६६ मध्ये विलियम्स कॉलेजमधून भौतिकशास्त्र विषयातील एम. एस. व १९६९ मध्ये अर्थशास्त्र विषयातील पीएच. डी. या पदव्या मिळविल्या. डॉक्टरेट पदवीनंतर १९६९ – १९७५ या काळात त्यांनी मॅसॅच्यूसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (M.I.T.) या संस्थेत अर्थशास्त्र विषयाचे प्राध्यापक म्हणून अध्यापन कार्य केले. १९७५ मध्ये त्यांची सॅन डिएगो (कॅलिफोर्निया विद्यापीठ) येथे प्राध्यापकपदी निवड झाली. तेथून २००३ मध्ये औपचारिक रीत्या ते निवृत्त झाले. सध्या ते त्याच विद्यापीठात सन्माननीय व संशोधन प्राध्यापक पद भूषवीत आहे. शिवाय न्यूयॉर्क विद्यापीठातील स्टेम स्कूल ऑफ बिझनेस या संस्थेत ते वित्तीय सेवा व्यवस्थापन विषयावर व्याख्याने देतात.

एंजेल्स हे दीर्घकालीन विश्लेषणासाठी तज्ज्ञ मानले जातात. त्यांनी जी पद्धत विकसित केली, ती पद्धत वित्तीय बाजारपेठांच्या विश्लेषणाचे अत्यावश्यक साधन मानले जाते. अनेक अर्थतज्ज्ञ त्यांच्या या संदर्भातील प्रतिमानाचा संशोधनासाठी आधार घेतात. त्यापैकी बहुसंख्य पद्धती नाविन्यपूर्ण अशा व्ही लॅब या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. त्यावर हजारो प्रकारच्या मालमत्तामधील दैनंदिन उत्पत्ती व सहसंबंध यांसंबंधीचे अंदाज (Estimates) उपलब्ध आहेत, अशी भाकिते पारंपरिक तसेच आधुनिक सांख्यिकी पद्धतींच्या आधारे वर्तविण्यात येतात. त्यातील संगणने गुंतवणूकीतील जोखीम, मालमत्ता विभागणी, बाजारपेठातील गुंतवणूक व त्यासंबंधीची जोखीम यांमधील चढउतार अभ्यासण्याचे त्यांनी विकसित केलेले तंत्र वित्तीय व्यापाऱ्यांसाठी खूपच उपयुक्त मानले जाते. अर्थकारणातील तज्ज्ञ व्यक्तींनाही विविध प्रकारच्या गुंतवणूकीमधील जोखमीबाबतचे अंदाज बांधून कमीतकमी नुकसान होईल यासाठीची संभाव्यता पडताळून पाहू शकतात. सामान्य गुंतवणूकदारही या पद्धतीचा आधार घेऊन निर्णय घेऊ शकतात.

एंजेल्स हे न्यूयॉर्क विद्यापीठाच्या स्टर्न वोलॅटिलिटी इन्स्टिट्यूट या संस्थेचा संचालक असून तेथील सोसायटी संघटनेचा संस्थापक अध्यक्षही आहे. नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेसचा ते सदस्य आहे. सप्टेंबर २००८ मध्ये जेव्हा बलाढ्य अशा लेहमन ब्रदर्स वित्तीय संस्थेने आर्थिक संकटात सापडल्यामुळे दिवाळखोरीसाठी विनंती अर्ज दाखल केला, तेव्हा एंजेल्स यांच्या न्यूयॉर्क विद्यापीठाच्या स्टर्न इन्स्टीट्यूट या संस्थेने त्यावर भक्कम उपाययोजना सूचविल्या.

एंजल्स यांनी स्वतंत्रपणे तसेच सहकारी अर्थतज्ञाबरोबरीने लिहिलेले ग्रंथ पुढील : आर्च सिलेक्टेड रिडिगज् (१९९५), हँडबुक ऑफ इकॉनॉमेट्रिक्स (१९९९), सर्व्हिंग बाय सेफगार्डिंग यूवर चर्च (२००२), ऑब्जेक्ट ओरिएंटेड ॲनालिसिस ॲण्ड डिझाईन वुथ अप्लिकेशन्स (२००७), अंडरस्टँडिंग फोर व्ह्यूज ऑन बॅप्टिझम (२००७), अँटिसिपेटिंग को-रिलेशन्स (२००९), टेक्निकल कॅपॅबिलिटिझ फॉर सिस्टमेटिक रिस्क रेग्यूलेशन (२०१०). शिवाय त्यांचे अर्थमिती विषयांतर्गत अनेक संशोधनपर लेखही प्रसिद्ध झाले.

एंजल्स यांना वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे सदस्य (२००७), होफ्स्ट्रा विद्यापीठाचे प्रेसिडेंन्सियल मेडल (२००९), यू. एन. सी. चॅपेल हिलकेनन-फ्लॅग्लर बिझनेस स्कूलचे सन्माननीय प्राध्यापक (२०१०), आय. एफ. ई. सन गार्ड संस्थेचे फायनान्सियल इंजिनिअर अवॉर्ड (२०११), कार्नेल विद्यापीठ सांख्यिकी विभागाचे डिस्टिंग्यूश्ड अ लायन्स अवॉर्ड (२०११), रिस्क मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट या आंतरराष्ट्रीय सल्लागार समितीचे सदस्य (२०१२) असे अनेक सन्मान लाभले.

समीक्षक – संतोष दास्ताने

प्रतिक्रिया व्यक्त करा