रे माशांचा समावेश कास्थिमत्स्य वर्गाच्या सेलॅची उपवर्गातील हायपोट्रेमॅटा गणाच्या राजीफॉर्मीस आणि टॉर्पेडिनिफॉर्मीस या उपगणांत होतो. ते जगात सर्वत्र आढळतात. त्यांचा जास्त आढळ उष्ण, उपोष्ण व समशीतोष्ण प्रदेशांतील समुद्रांत असतो. भारताच्या पूर्व आणि पश्चिम समुद्रकिनाऱ्यांवर ते आढळून येतात. ते समुद्रकिनाऱ्यापासून समुद्राच्या तळाशी सु. ३,००० मी. खोलीपर्यंत आढळतात. काही रे मासे गोड्या पाण्यातही आढळतात.
रे माशाच्या शरीराची लांबी सु. ५·२ मी.पर्यंत असून वजन सु. ४५ किग्रॅ. असते. काही वेळा ३५० किग्रॅ.पर्यंत वजनाचे रे मासे आढळून आले आहेत. त्यांच्या शरीराची रुंदी लांबीपेक्षा नेहमीच जास्त असते. शरीराचे डोके, धड आणि शेपूट असे तीन भाग असतात. डोके आणि धड हे वक्षपरांच्या जोडीने पूर्णपणे वेढून टाकलेले असते. त्यामुळे हा भाग तबकडी, चकती किंवा पतंग यांसारखा दिसतो. डोक्याचा पुढचा भाग लहान त्रिकोणासारखा दिसतो. वक्षपरातील शलाका डोके आणि धड यांच्या दोन्ही बाजूंना ठळकप्रमाणे दिसून येतात. शेपटी लांब असून चाबकासारखी असते. शेपटीच्या सुरुवातीला पृष्ठभागावर एक किंवा दोन नांग्या असतात. नांगी दंतुर असून तिच्या तळाशी विषग्रंथी असतात. रे मासे स्वसंरक्षणासाठी नांगीचा उपयोग करतात. रे माशाचे मुख आणि कल्ले अधर भागावर असतात. कल्ल्यांच्या पाच जोड्या असून त्यांना आवरण नसते. कोळंबी, शेवंडे, खेकडे, मृदुकाय प्राणी व मासे हे त्यांचे भक्ष्य आहे.
रे मासे जरायुज असून आंतरफलनानंतर मादी पिलांना जन्म देते. काही रे मासे अंडजरायुज असतात. आंतरफलनानंतर मादी एका चौकोनी पिशवीत अंडी घालते. या पिशवीच्या चारी कोपऱ्यांना तणावे असतात. मादी या पिशव्या समुद्रतळाशी सुरक्षित जागी चिकटविते. पिशवीत पिलांची वाढ होऊन ती बाहेर येतात.
रे माशांचे मांस खाल्ले जाते. वक्षपर वाळवून त्यांपासून पिण्याचे सूप करतात. त्यांच्या यकृतापासून तेल मिळते. यकृत तेलात अ आणि ड-जीवनसत्त्वे असतात. त्यांच्या त्वचेचा उपयोग कच्च्या चामड्याप्रमाणे तसेच पॉलिश पेपरप्रमाणे केला जातो. जगात रे माशांचे प्रकार पुढीलप्रमाणे आढळून येतात.
पाकट : (स्टिंग रे). पाकटाचा समावेश राजीफॉर्मीस उपगणाच्या डॅसिॲटिडी कुलात होतो. त्याचे शास्त्रीय नाव डॅसिअॅटिस सेफेन आहे. (पहा: पाकट).
गरुड मासा : (र्इगल रे). याचा समावेश राजीफॉर्मीस उपगणाच्या मायलिओबॅटिडी कुलात होतो. त्याचे शास्त्रीय नाव एटोमायलस निचोफी आहे. भारतात चिल्का सरोवर, गंगा नदीच्या मुखाशी, पूर्व आणि पश्चिम समुद्रकिनाऱ्यांवर तो आढळतो. त्याचे शरीर एखाद्या पतंगासारखे अथवा पक्ष्याच्या पंखांसारखे दिसते. शेपटी लांबीला तबकडीच्या दुप्पट असते.
गाय मासा : (काऊ रे). याचा समावेश राजीफॉर्मीस उपगणाच्या ऱ्हिनोप्टेरिडी कुलात होतो. त्याचे शास्त्रीय नाव ऱ्हिनोप्टेरा जावानिका आहे. ते भारतात पश्चिम समुद्रकिनाऱ्यावर आढळतात. त्याचे डोके मोठे असून मध्यभागात बाक असतो.
करवत मासा : (सॉ फिश). याचा समावेश राजीफॉर्मीस उपगणाच्या प्रिस्टिडी कुलात करतात. त्याचे शास्त्रीय नाव प्रिस्टिडी मायक्रॉडॉन आहे. भारताच्या पूर्व आणि पश्चिम समुद्रकिनारपट्टींवर ते आढळतात. वरचा जबडा डोक्यापासून पुढे लांब आलेला असतो. त्यावर दोन्ही बाजूंना मिळून करवतीसारखे ३६–४० दात असतात.
झिणझिण्या : (इलेक्ट्रिक रे). याचा समावेश टॉर्पेडिनिफॉर्मीस उपगणाच्या टॉर्पेडिनिडी कुलात होत असून त्याचे शास्त्रीय नाव टॉर्पेडो मारमोराटा आहे. त्याच्या तबकडीसारख्या शरीरात दोन विद्युत अंगे असतात. त्यातून विद्युत विसर्ग होऊन भक्ष्याला विद्युत धक्का बसतो. हा धक्का ८–२२० व्होल्टइतका असू शकतो. भक्ष्य पकडणे किंवा शत्रूपासून सुटका करणे यासाठी त्याच्या शरीरात हा बदल घडून आलेला असतो. नुकत्याच मेलेल्या झिणझिण्याला स्पर्श झाला तरीही विद्युत धक्का बसू शकतो.