उडणाऱ्या, द्विपाद व पृष्ठवंशी प्राण्यांचा एक वर्ग. शरीरावरील पिसांचे आच्छादन, पंख आणि चोच या लक्षणांवरून पक्षी चटकन ओळखता येतात. जगात सर्वत्र पक्षी आढळतात. त्यांच्या सु. ९,९५६ जाती असून भारतात सु. १,२५४ जाती आढळतात. त्यांचे शरीर पिसांनी झाकलेले असून ते निमुळते आणि प्रवाहरेखित असते. त्यामुळे ते हवा किंवा पाणी यातून सहज जाऊ शकतात. ते जमीन, झाडे, पाणी व दलदल अशा वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. हिमालय पर्वतावर समुद्रसपाटीपासून सु. ६,००० मी. उंचीपर्यंतही ते आढळतात.
पक्ष्यांच्या शरीराचे डोके, मान, धड आणि शेपूट असे चार भाग असतात. डोक्यावर चोच, तोंड, नासाद्वारे, डोळे आणि कानाचा पडदा असतो. वरच्या आणि खालच्या जबडयांनी मिळून चोच तयार होते. वरच्या चोचीवर दोन नाकपुड्या व मांसल आच्छादन त्वचा (सिअर) असते. दोन जबडयांमध्ये तोंड (मुख) आणि मुख-गुहिका असते. जबडयांना दात नसतात. बहुतेक पक्ष्यांचे डोळे डोक्याच्या बाजूंवर असतात. डोळे बाहेरून लहान दिसतात परंतु नेत्रगोल मोठा असतो. डोळ्यांना तिसरी पारदर्शक पापणी (निमेषक पटल) असते. हे पटल डोळा स्वच्छ आणि ओलसर ठेवण्याचे काम करते. बहुतेक पक्ष्यांना एकनेत्री दृष्टी आणि काहींना द्विनेत्री दृष्टी असते. त्यांना चहूकडचे दिसते. आकाशात उडत असताना जमिनीवरील त्यांची पिले किंवा भक्ष्य ते पाहू शकतात. कानांचे पडदे आणि छिद्रे कर्णपिच्छांनी झाकलेले असतात. पक्ष्यांना बाह्यकर्ण नसतो. त्यांना रंगज्ञान, आवाजाचे ज्ञान आणि चवीचे ज्ञान चांगले असते मात्र वासाचे ज्ञान कमी असते.
पक्ष्यांची मान लवचिक आणि बऱ्याच वेळा लांब असते. मानेतील मणक्यांची संख्या १३-२५ असते. मणक्यांच्या जास्त संख्येमुळे आणि विशिष्ट रचनेमुळे त्यांच्या मानेला अधिक लवचिकता प्राप्त होते. डोके जास्त फिरविता येते. उदा., घुबड. त्याचे डोके क्षितिजसमांतर २७० अंशांतून फिरू शकते. पक्ष्यांच्या धडावर पंखांची एक जोडी, पायांची एक जोडी आणि अधर बाजूस अवस्कर छिद्र असते. धडाच्या अग्र बाजूस छाती व पश्च बाजूस उदर म्हणतात. छातीमध्ये बरगड्यांनी बनलेला पिंजरा असतो व त्याने पाठीचा कणा उरोस्थीला जुळलेला असतो. उरोस्थी रुंद असून तिच्यावर खोल कणा असतो आणि त्याला उड्डाण-स्नायू चिकटलेले असतात. पक्ष्यांमध्ये पुढच्या पायांचे रूपांतर पंखांच्या जोडीमध्ये झालेले असते. पंख उड्डाणपिसांनी बनलेले असतात. उदरात पायांची एक जोडी असते. म्हणून पक्ष्यांना द्विपाद म्हणतात. प्रत्येक पायावर जास्तीत जास्त चार बोटे असून त्यांना नख्या असतात. सर्वसाधारणपणे तीन बोटे पुढच्या बाजूला आणि एक बोट मागच्या बाजूला असते. सुतार पक्षी व कोकिळ यांना पुढे दोन आणि मागे दोन बोटे असतात. खंड्याला तीन बोटे तर शहामृगाला फक्त दोन बोटे असतात. पक्ष्यांचे पाय चालणे, पळणे, जमीन खरवडणे, फांदी किंवा खुंटी पकडणे, अन्न मिळविणे, पोहणे, पाण्यातून व दलदलीतून चालणे यांसाठी अनुकूलित झालेले असतात. पक्ष्यांची शेपटी आखूड असते.
पक्ष्यांचे बाह्यकंकाल पिसे, खवले आणि नख्यांच्या स्वरूपात असते. शरीर पिसांनी झाकलेले असते. त्यामुळे शरीर उबदार राहते व त्याचे उच्च तापमान नेहमी कायम राहते. पक्षी नियततापी असून त्यांच्या शरीराचे तापमान ४०.५०–४४० से. असते. पिसांचे अनेक प्रकार आहेत. त्यांना आवरण पिसे, उड्डाणपिसे, कोमल पिसे, रोम पिसे इत्यादी नावे आहेत. सामान्यपणे विणीच्या हंगामात निर्मोचनामुळे वर्षातून एकदा पक्ष्यांची पिसे गळून पडतात व नवीन पिसे येतात. पक्ष्यांची त्वचा पातळ, मऊ, लवचिक आणि नाजूक असते. बहुतेक सगळ्या त्वचेवर पिसे असतात. परंतु गिधाडांसारख्या काही पक्ष्यांच्या डोक्यावरील व मानेवरील त्वचेचा काही भाग उघडा असतो.
पक्ष्यांच्या पचन संस्थेमधील अन्ननलिकेत काही विशेष बदल दिसून येतात. ग्रसनीचा विस्तार होऊन ती मोठी होते. पाणकोळ्यासारख्या पक्ष्यात गळधानी तयार होते. अनेक पक्ष्यांत ग्रसनीचा खालचा भाग मोठा होऊन अन्नपुट तयार होते. जठराचे ग्रंथिल जठर आणि पेषणी असे दोन भाग असतात. ग्रंथिल जठरात पाचक रस स्रवतात. पेषणीमध्ये पक्ष्यांनी गिळलेले खडे असतात. त्यांच्या साहाय्याने कठीण अन्नपदार्थ बारीक केले जाऊन त्याचे पीठ होते. पक्ष्यांमध्ये चयापचयक्रियेचा वेग प्राणिसृष्टीत सर्वांत जास्त असल्यामुळे त्यांना जास्त अन्न लागते. हृदय चार कप्प्यांचे असून सस्तन प्राण्यांच्या हृदयापेक्षा तुलनेने मोठे असते. हृदयाचे ठोके अतिशय जलद गतीने पडतात. सामान्यत: दर मिनिटाला २००-१२०० ठोके पडतात. कबूतर २१८, कावळा ३४२, चिमणी ४६०, गुणगुणा (हमिंगबर्ड) १२०० अशी ठोक्यांची गती दर मिनिटाला असते. श्वसन संस्थेत दोन फुप्फुसे आणि अनेक वायुकोश असतात. फुप्फुसांचे आकुंचन-प्रसरण कमी प्रमाणात होते. वायुकोशांवर रक्तवाहिन्या नसल्यामुळे त्यांचा श्वसनासाठी उपयोग होत नाही. ध्वनी उत्पन्न करण्यासाठी स्वरपेटिका असते. पक्ष्यांचा मेंदू सापेक्षत: उभयचर आणि सरीसृप प्राण्यांच्या मेंदूंपेक्षा मोठा असून रुंदीला जास्त आणि लांबीला कमी असतो. मात्र त्यांचा मेंदू डोळ्यांहून वजनाने लहान असतो.
पक्ष्यांच्या उत्सर्जन संस्थेत दोन वृक्क आणि दोन मूत्रवाहिन्या असतात. त्यांना मूत्राशय नसते. अंत:स्रावी ग्रंथी सस्तन प्राण्यांप्रमाणेच असतात. प्रजनन संस्थेत नरामध्ये दोन वृषणे व दोन शुक्रवाहिन्या असतात, पण शिश्न नसते. शिश्न फक्त शहामृग आणि काही बदकांमध्ये असते. मादीमध्ये डाव्या बाजूस फक्त एकच अंडाशय आणि एकच अंडवाहिनी असते. उजव्या बाजूच्या अंडाशयाचा आणि अंडवाहिनीचा अपक्षय झालेला असतो. पक्ष्यांमध्ये विणीचा हंगाम असून त्यांच्यात आंतरफलन घडून येते. ते घरटी बांधतात. घरट्यांचा उपयोग अंडी ठेवणे, उबविणे आणि पिलांचे संगोपन करण्यासाठी होतो. ते पिलांना अन्न भरवितात. कबुतरे अन्नपुटातून स्रवणारे ‘कपोतक्षीर’ म्हणजेच दूध पिलांना चोचीतून देतात. मासे, उभयचर आणि सरीसृप यांच्या तुलनेत पक्षी एका वेळी कमी अंडी घालतात. तसेच अंडी पक्ष्यांच्या आकारमानाने लहान असतात. शहामृगाची उंची २४० सेंमी. व वजन १५० किग्रॅ. असून अंडे १६–१७ सेंमी. लांब आणि १.५ किग्रॅ. वजनाचे असते. शहामृगाचे अंडे पक्ष्यांमध्ये सर्वांत मोठे अंडे आहे. मातापित्यांकडून अंडी उबविली जातात आणि पिले बाहेर येतात.
अनेक पक्षी स्थलांतर करतात. त्यांच्यामध्ये भोवतालच्या परिस्थितीनुसार अनुकूलन झालेले दिसून येते. ते निसर्गाचा समतोल राखण्याचे कार्य करतात. त्यांच्यापासून मानवाला अनेक फायदे मिळतात. मात्र काही पक्षी उपद्रवी असतात.
वर्गीकरणविज्ञानानुसार पक्षी वर्गाचे दोन उपवर्ग करण्यात आले आहेत. विलुप्त झालेल्या पक्ष्यांचा आर्किऑर्निथीज हा उपवर्ग आहे. यातील आर्किऑप्टेरिक्स लिथोग्राफिका याला पक्षीपूर्वज मानतात. या पक्ष्याचा सर्वांत जुना जीवाश्म सु. १५.५ कोटी वर्षांपूर्वीच्या काळातील आहे. सध्या जिवंत असलेल्या सर्व पक्ष्यांचा समावेश नीऑर्निथीज या उपवर्गात करण्यात आला आहे. या उपवर्गात सु. २७ गण आणि सु. १६० कुले आहेत. त्यांपैकी स्ट्रुथिऑर्निफॉर्मिस गणात शहामृग ही एकच जात आहे तर, पॅसेरिफॉर्मिस (कुलिंग) म्हणजे फांदीधारी गणात ५,००० हून अधिक जाती आहेत.
पक्ष्यांमध्ये सर्वांत लहान पक्षी गुणगुणा (वजन १.६–२ ग्रॅ.), तर सर्वांत मोठा पक्षी शहामृग (वजन १५० किग्रॅ.) आहे. आर्क्टिक टर्न (कुररी) हा पक्षी स्थलांतर करताना वर्षाकाठी सु. ७०,००० किमी. प्रवास करतो. शकुन पक्षी (अल्बट्रॉस) हा सर्वांत मोठा समुद्रपक्षी सहा वर्षे एकदाही जमिनीवर न उतरता संथपणे आर्क्टिक वृत्ताभोवती घिरटया घालू शकतो. ऑस्ट्रेलियातील बॉवर पक्षी विविध रंगांच्या फुलांनी घरटे सजवितो. मादीला त्याच्या घरट्याची सजावट पसंत पडली तरच ती घरटयात राहायला येते.
पक्षी हे सरीसृपांपासून उत्क्रांत झाले आहेत. काही वैज्ञानिकांच्या मते सरीसृपांच्या आर्कोसोरिया या उपवर्गापासून उत्क्रांत झालेल्या प्राण्यांपैकी आता अस्तित्वात असलेले क्रोकोडिलिया (मगर इत्यादी प्राण्यांचा उपवर्ग) आणि पक्षी हे होत.