वीर्य हा शब्द सामर्थ्य, पराक्रम, शक्ती, पुरुषामधील शुक्र (Semen) या अर्थांनी वापरला जातो. औषधांच्या संदर्भात ‘ज्याच्यामुळे वनस्पती किंवा औषधी आपले कार्य करण्यास समर्थ होते ती शक्ती म्हणजे वीर्य होय’. अर्थात ही शक्ती नसेल तर ती औषधी आपले कार्य करू शकत नाही. औषधामध्ये ही कार्य करणारी शक्ती (वीर्य) जितका काळ टिकेल त्या काळास ‘सवीर्यता अवधी’ असे म्हणतात. उदा., वनस्पतीच्या चूर्णाचा सवीर्यता अवधी २ महिने, काढ्याचा ४ महिने असतो. मात्र आसव, धातूंची भस्मे व रसौषधी (पाऱ्यापासून बनविलेली औषधे) यांचा सवीर्यता अवधी खूप अधिक असतो. ती जितकी जुनी तितकी गुणयुक्त असतात.
वनस्पतींचे वीर्यदेखील तिच्या सर्व भागांमध्ये (फुले, साल, मूळ इ.) सारखे नसते. उदा., दशमुळातील वनस्पतींची मुळे व त्रिफळ्यातील फळे वीर्ययुक्त असतात. वनस्पतींचा वीर्ययुक्त भागच औषधासाठी वापरला जातो. त्याचप्रमाणे त्या भागांचेही वीर्य काही विशिष्ट ऋतूंमध्ये सर्वाधिक असते, त्या काळात तो भाग गोळा करावा लागतो, तर त्याचे अपेक्षित परिणाम दिसतात. उदा., वनस्पतींची पाने वर्षा किंवा वसंत ऋतूत पूर्ण वाढ झालेली असताना, तर मुळे ग्रीष्म किंवा शिशिर ऋतूत घ्यावीत. याखेरीज काही वनस्पती विशिष्ट पद्धतीने वापरल्यासच विशिष्ट परिणाम दाखवतात. अर्थात त्या कल्पनेमध्ये वनस्पतीचे वीर्य उतरते. उदा., सहचर (काटेकोरांटी) तेल, हिरड्याचे चूर्ण, अश्वगंधाचे अरिष्ट इत्यादी.
आयुर्वेदात वीर्याचे सामान्यत : दोन प्रकार सांगितले आहेत — उष्ण (गरम) व शीत (थंड). विश्वातील सर्व पदार्थांना उष्ण वा शीत या दोन प्रकारांमध्ये विभाजित करता येते. मधुर (गोड), तिक्त (कडू) व कषाय (तुरट) रसाचे/चवीचे पदार्थ साधारणत: शीत वीर्याचे, तर अम्ल (आंबट), लवण (खारट) व कटु (तिखट) रसाचे पदार्थ साधारणत: उष्ण वीर्यात्मक असतात. याला काही अपवाद देखील आहेत. उदा., बृहत्पंचमुळातील वनस्पती तिक्त व कषाय रसाच्या असूनही उष्णवीर्य आहेत, तर आवळा अम्ल रसाचा असूनही शीत वीर्याचा आहे.
संदर्भ :
- अष्टांगहृदय — सूत्रस्थान, अध्याय १ श्लोक १७.
- चरकसंहिता — कल्पस्थान, अध्याय १ श्लोक १०.
- चरकसंहिता — सूत्रस्थान, अध्याय २६ श्लोक १३, ४८, ४९.
- शार्ङ्गधर संहिता — पूर्वखंड, अध्याय १ श्लोक ५१-५२.
समीक्षक : जयंत देवपुजारी