स्वच्छ व गोड्या पाण्याच्या डबक्यात आढळणारा एक कीटक. कीटक वर्गाच्या हेमिप्टेरा गणातील हेटेरोप्टेरा उपगणाच्या नेपिडी कुलात त्याचा समावेश होतो. या कुलातील पाण्यात राहणाऱ्या सु. १५० जातीच्या कीटकांना सामान्यपणे पाणविंचू म्हणतात. नेपिडी कुलात नेपिनी आणि रनात्रिनी अशी दोन उपकुले आहेत. या दोन उपकुलांमध्ये एकूण १४ प्रजाती असून नेपा प्रजाती नेपिनी या उपकुलात मोडते. नेपा सिनेरिया हे शास्त्रीय नाव असलेल्या जातीचे पाणविंचू सर्वत्र आढळतात. हा कीटक जमिनीवर वावरणाऱ्या विंचवासारखा दिसतो म्हणून त्याला पाणविंचू हे नाव पडले आहे. अंटार्क्टिका वगळता ते जगात सर्वत्र आढळतात. प्रामुख्याने तलावातील व सरोवरातील स्थिर जलात, चिखलात व उथळ पाण्यात ते राहतात. समुद्रकिनाऱ्यावरील पाण्यातही ते काही प्रमाणात आढळतात. मात्र, फार खोल पाण्यात ते आढळत नाहीत.
पाणविंचवाच्या शरीराची लांबी २–५ सेंमी. असून रंग फिकट तपकिरी असतो. शरीर रुंद व पसरट असते. पंखांची एक जोडी असते. मात्र, नेपा प्रजातीचे पाणविंचू उडू शकत नाहीत. त्यांच्या मस्तकावर दोन संयुक्त नेत्र असतात. मुखांगे तीक्ष्ण सोंडेसारखी असतात. पायांच्या तीन जोड्या असतात. पुढील पाय विळ्याच्या आकाराचे असून भक्ष्य पकडण्यासाठी हे अनुकूलित झालेले असतात. दुसऱ्या आणि तिसऱ्या जोड्यांतील पाय मागच्या बाजूला वळलेले असतात. शरीराच्या पश्च टोकाला चाबकासारखे शेपूट असते. दोन श्वसननलिका एकमेकांना जुळल्यामुळे हे शेपूट तयार झालेले असते. शेपूट पाण्याबाहेर काढून पाणविंचू पाण्याच्या पृष्ठभागाशी कोन करून पाण्याखाली लोंबत राहतो. या शेपटीतील वायुनलिकेद्वारे तो शरीरात हवा घेतो आणि हवेतील ऑक्सिजन मिळवितो. पाणविंचवाचा दंश वेदनामय असतो; परंतु जमिनीवरील विंचवाच्या मानाने तो कमी घातक असतो.
पुढील पाय खालीवर हालवीत व मागील चार पायांनी पाण्याला धक्के देत पाणविंचू पोहतो. पाण्याच्या तळाशी सरपटत चालताना तो मागील चार पायांचा वापर करतो. पुढील दोन पायांनी तो मासे, बेडूकमासे आणि इतर प्राण्यांना पकडून त्यांच्या शरीरातील द्रव सोंडेने पितो. पाणविंचू हे बदक, मासे तसेच जलकीटकांच्या मोठ्या अळ्या यांचे अन्न आहे.
मार्च-एप्रिल हा पाणविंचवाच्या मीलनाचा काळ असतो. या काळात विशिष्ट आवाज करून नर मादीला आकर्षित करतो. मीलनानंतर मादी चिखलात, कुजलेल्या वनस्पतींमध्ये किंवा पाणवनस्पतींच्या देठांवर सु. ३० अंडी घालते. अंड्यांवर श्वासरंध्रे असून त्यांपासून भ्रूणास आवश्यक ऑक्सिजन मिळतो. पाणविंचवामध्ये अर्धरूपांतरण प्रकारचे जीवनचक्र असते. ३ ते ४ आठवड्यांनंतर अंड्यांतून कुमारावस्थेतील पाणविंचू बाहेर पडतात. त्यांमध्ये श्वसननलिका विकसित झालेली नसते. त्याऐवजी त्यांच्या उदरावर श्वासरंध्रांच्या सहा जोड्या असतात. कोशावस्था टाळून ६–८ आठवड्यांत त्यांचे रूपांतर प्रौढ पाणविंचवांत होते.