घरातील भिंतींवर व छतावर वावरणारा एक सरपटणारा प्राणी. पालीचा समावेश सरीसृप वर्गातील डायॉप्सिडा उपवर्गाच्या स्क्वॅमेटा गणातील लॅसर्टिलिया उपगणाच्या गेकोनिडी कुलात होतो. या कुलात सु. ३०० जाती आहेत. पालीचा प्रसार जगभर झालेला असून ती सर्वत्र आढळते. भारतात हेमिडॅक्टिलस प्रजातीतील हे. ब्रूकाय ही जाती प्रामुख्याने दिसून येते. याशिवाय लाल पालीची हे. मॅक्युलॅटस ही जाती दक्षिण भारत, महाराष्ट्र, गुजरात येथे आणि हे. प्रशादाय ही जाती पश्चिम घाट परिसरात आढळते. हे. फ्रेनॅटस दक्षिण भारतात आणि पश्चिम बंगालमध्ये आढळते.
पालीची लांबी सु. १५ सेंमी.पर्यंत असून रंग पांढरट करडा असतो. काही वेळा ती आपला रंग गडद किंवा फिकट करून पार्श्वभूमीच्या रंगाशी जुळवून घेत असते. शरीर शल्कांनी आच्छादलेले असून शल्क लहान आणि कणीसारखे असतात. मात्र, मुस्कटावर आणि शेपटीवरील दोन्ही बाजूंना शल्क आकाराने मोठे असतात. डोके, मान, धड आणि शेपूट असे शरीराचे चार भाग असतात. डोके आकाराने मोठे आणि चपटे असून समोरच्या बाजूला मुख असते. तोंडात साधी, मांसल आणि न दुभंगलेली जीभ असून तिच्यामार्फत पाल कीटकांसारखे भक्ष्य पकडते. डोक्याच्या अग्र बाजूला दोन लहान नाकपुड्या असून त्यांमागे वरच्या बाजूला डोळे असतात. डोळे मोठे असून उठून दिसतात. डोळ्यांना उघडझाप करणारी पापणी नसते, परंतु प्रत्येक डोळ्याला एक अर्धपारदर्शक निमेषक पटल असते. डोळ्यांच्या मागे दोन उभट कर्णछिद्रे असतात. त्यांद्वारे पाल हवेतून येणाऱ्या ध्वनिलहरी ग्रहण करते. अरुंद मुखछिद्र, डोक्यावरचे शल्क, न दुभंगलेली जीभ, निमेषक पटल आणि कर्णछिद्रे यांमुळे पाल ही सापाहून वेगळी दिसते.
पाल कीटकभक्षी असल्यामुळे घरातील कीटकांवर ती नियंत्रण राखते. तिच्या आतड्याची लांबी कमी असते. अन्नाबरोबर तिच्या शरीरात आलेल्या अल्प प्रमाणातील पाण्यावर तिची गुजराण होते. तिची काळसर विष्ठा आणि मूत्र (युरिक आम्लाचे पांढरे स्फटिक) हे एकत्रित लगद्याच्या स्वरूपात विसर्जित केले जाते. तिला दोन फुप्फुसे असतात आणि हृदयाला दोन अलिंदे असून एकच निलय असते. निलय अर्धवट विभागलेले असते. पाल ही थंड रक्ताची म्हणजे अनियततापी असल्यामुळे तिच्या शरीराचे तापमान बाहेरच्या तापमानानुसार कमीजास्त होत राहते. संकटकाळी पाल स्वविच्छेदनाने स्वत:ची शेपटी तोडून घेते. त्या वळवळणाऱ्या शेपटीकडे शत्रूचे लक्ष्य वेधले जाईल हे पाहते आणि पळून जाते. पुनरुद्भवनाने तिच्या शेपटीची वाढ पूर्ववत होते.
पालीमध्ये नर आणि मादी असा लिंगभेद असतो. नराची शेपटी सुरुवातीच्या भागात फुगीर असते. कारण तिच्या अंतर्भागात दोन अर्धशिस्नके असतात. नर उद्दीपित झाल्यास समागमासाठी ही अर्धशिस्नके बाहेर येतात. फलनानंतर मादी एक खेपेला दोन अंडी घालते. ती वर्षातून दोन-तीन वेळा अंडी घालते. अंड्यावरील कवच केराटिनाने बनलेले असून ते चिवट आणि लवचिक असते.
पाल बिनविषारी असते. मात्र, तिच्या शरीरात साल्मोनेल्ला, लिस्टेरिया, एश्चेरिकिया कोलाय यांसारखे जीवाणू असतात. शिजविलेल्या अन्नात पाल पडली की तिच्या शरीरातील जीवाणूंमुळे अन्न दूषित होते. असे दूषित अन्न खाल्ल्याने मनुष्याला विषबाधा होते.
पाल भिंतीवर आणि छताला चिकटून उलट्या स्थितीत कशी वावरते, हा एक कुतूहलाचा विषय आहे. पालीचे तळपाय आणि छत किंवा भिंत या दोन्ही पृष्ठभागांमध्ये असलेल्या जैवभौतिकी आसंगी (अॅडिसिव्ह) बलामुळे पाल भिंतीला किंवा छताला चिकटते. पालीच्या तळपायावर अनेक कंगोरे असून त्या कंगोऱ्यांवर हजारो सूक्ष्म उपकंगोरे असतात. त्यांना पादरोम म्हणतात. एक चौ.मिमी.मध्ये सु. १४,००० पादरोम असतात. प्रत्येक पादरोमावर असलेले आसंगी बल कमी असूनही पादरोमाच्या प्रचंड संख्येमुळे पाल तिच्या पायांद्वारे स्वत:च्या वजनाच्या चाळीस पट भार तोलू शकते. तसेच पृष्ठभागाला चिकटलेला पाय ती सहज सोडवून घेऊ शकते. कारण पायाचा पृष्ठभाग आतमध्ये ओढून घेऊन, पाय जेथे चिकटलेला आहे तेथे झालेला स्पर्शकोन ती बदलू शकते. स्पर्शकोन बदलल्यामुळे प्रत्येक पादरोमावरील आसंगी बल कमी होते. पाल ज्या प्रकारे छताला पकडून राहते त्या तत्त्वानुसार ‘गेको टेप’ तयार करण्यात आली आहे. ही टेप एका हाताला लावून मनुष्य छताला लोंबकळू शकतो.