भारतामध्ये केंद्र शासनाने वन्य जीव रक्षणाच्या उद्देशाने काही नैसर्गिक प्रदेश संरक्षित केले आहेत. हे राष्ट्रीय उद्याने, अभयारण्ये व राज्यस्तरीय वनोद्याने या तीन प्रमुख प्रकारांत आढळून येतात. वन्य जीव व त्यांचे पर्यावरण यांच्या अभिवृद्धीसाठी एखाद्या प्रदेशातील पारिस्थितीकीयदृष्या अनुकूल असलेले क्षेत्र केंद्र व राज्य शासनांकडून निश्चित करण्यात येते. असा प्रदेश क्षेत्र सीमांकित केल्यानंतर तो राष्ट्रीय उद्यान किंवा अभयारण्य म्हणून घोषित केला जातो. अभयारण्यात प्राण्यांची शिकार करण्यास पूर्णपणे बंदी घातली जाते, त्यांना अभय दिले जाते, त्यांचे संरक्षण व संवर्धन करण्यात येते. सर्व अभयारण्ये ही शासनाच्या नियंत्रणाखाली असून त्यांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी वन विभागाकडे सोपविण्यात आली आहे. अभयारण्यातील जीवसृष्टीचे संरक्षण आणि व्यवस्थापन यांविषयी तरतुदी असलेला कायदा (वाइल्ड लाईफ प्रोटेक्शन अॅक्ट, १९७२) केलेला आहे.
पर्यावरणातील जैवविविधता टिकवून ठेवण्यासाठी वन्य जीवांचे रक्षण करणे हा अभयारण्ये स्थापन करण्यामागील प्रमुख उद्देश आहे. मागील २-३ शतकांत वन्य जीवांची प्रचंड प्रमाणात हत्या झाली, प्रदूषणामुळे त्यांच्या प्रजननास प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली आणि अधिवासाचे प्रदेश (वसतिस्थान) नष्ट होऊ लागले. अशा स्थितीत त्यांना जीवनसंघर्षात टिकून राहणे अवघड झाले. त्यामुळे अनेक वन्य जीव प्रजातींचा अवक्षय झाला असून काही प्रजाती विलुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. हे टाळण्यासाठी आणि पर्यावरणातील पारिस्थितिकीय संतुलन टिकून राहण्यासाठी वन्य जीवांचे अभयारण्यात संवर्धन केले जाते. भारतात सु. ५८९ तर महाराष्ट्रात एकूण ५ राष्ट्रीय उद्याने व ३५ अभयारण्ये आहेत. केंद्र शासनाने काही अभयारण्ये खास प्राण्यांसाठी राखून ठेवलेली आहेत. उदा., भारतात १९७२ पासून वाघांच्या संरक्षणासाठी ‘व्याघ्र प्रकल्प’ हाती घेतला गेला आहे. या प्रकल्पांतर्गत देशातील एकूण २६ अभयारण्ये येतात. त्यापैकी राजस्थान राज्यातील सरिस्का आणि महाराष्ट्र राज्यातील मेळघाट व ताडोबा ही अभयारण्ये वाघासाठी राखीव आहेत. केवळ पक्ष्यांसाठीही काही अभयारण्ये राखलेली आहेत. राजस्थानातील भरतपूर येथे खास पक्ष्यांसाठी अभयारण्य आहे. महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील नानज येथील अभयारण्य माळढोक पक्ष्यांसाठी तर नायगांव हे बीड जिल्ह्यातील अभयारण्य मोरांसाठी राखीव आहे. गुजरात राज्यातील गीरचे अभयारण्य सिंहांसाठी राखीव आहे. नैसर्गिक अधिवास आणि त्यातील जैवविविधता यांचे संरक्षण व संधारण करण्यासाठी अभयारण्यांचे मोलाचे साहाय्य झाले आहे.