यूरोपातील आल्प्स पर्वतांपैकी पूर्व आल्प्स विभागातील एक पर्वतश्रेणी. या पर्वतरांगेची लांबी सुमारे ६५० ते ७०० किमी. आणि रुंदी ५० किमी. ते २०० किमी. असून तिने सुमारे २,००,००० चौ. किमी. क्षेत्र व्यापले आहे. अल्बेनियातील येझेरत्से (उंची २,६९४ मी.) हे या पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर आहे. दक्षिण मध्य आणि आग्नेय यूरोपमधील ही पर्वतरांग वायव्य-आग्नेय दिशेत इटली, स्लोव्हेनिया, क्रोएशिया, माँटनीग्रो, बॉझ्निया व हेर्ट्सगोव्हीना, सर्बीया आणि अल्बेनिया या देशांत पसरली आहे. ही पर्वतरांग उत्तरेस सोका व साव्हा या नद्यांनी; पूर्वेस कॉलूबारा, ईबार, सित्नीत्सा या नद्यांनी; दक्षिणेस द्वीना नदीने, तर पश्चिमेस एड्रिॲटिक समुद्राने सीमित केली असून ती एड्रिॲटिक समुद्रकिनार्याला समांतर अशी पसरली आहे. ही पर्वतरांग ज्यूल्यन आल्प्स पर्वताच्या माध्यमातून आल्प्स पर्वतरांगेत विलीन झाली आहे. या श्रेणीच्या पश्चिमेकडील काही भागाचे निमज्जन होऊन क्रोएशियाच्या किनार्यावर अनेक बेटे निर्माण झाली आहेत.
सुमारे ५० ते १०० द. ल. वर्षांपूर्वी झालेल्या आल्पीय गिरिजनन प्रक्रियेच्या वेळी येथील भूपृष्ठाला घड्या पडून या पर्वताची निर्मिती झाली आहे. यूरोपातील हा एक विस्तृत व ओबडधोबड भूप्रदेश आहे. नद्यांच्या क्षरण कार्यामुळे पात्रात खोल घळ्या निर्माण झाल्या आहेत. विदारण व क्षरण यांमुळे याचा बराचसा अंतर्भाग उघडा पडलेला आहे. येथे वाळू, चूनखडी व डोलोमाइट, सेनोझोइक, मेसोझोइक प्रकारचे खडक आढळतात. तसेच या पर्वतरांगेच्या वायव्य भागात वैशिष्ट्यपूर्ण कार्स्ट भूमिस्वरूप आढळते. या भूमिस्वरूपांमुळे तेथे अनेक गुहा व विवरे निर्माण झाली आहेत. किनार्यावरून अंतर्गत भागात जाण्यासाठी ही पर्वतश्रेणी अडथळा ठरतो. त्यामुळे त्यातील खिंडींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. वाहतुकीच्या दृष्टीने येथील सात खिंडी महत्त्वाच्या असून त्यांतील पोस्टॉइना गेट (उंची ६०६ मी.) या खिंडीची उंची सर्वाधिक आहे. नद्यांची खोरी, खोल दर्या, कार्स्ट भूमिस्वरूप यांमुळे या पर्वतरांगेतील काही पर्वतीय भाग अलग झालेले दिसतात. येथील तारा, व्हर्बास, नेरत्व्खा, उगर, मोरचा, लिम, द्रिन, रॅकित्नीका इत्यादी प्रमुख नद्या असून त्या स्वच्छ व मानवनिर्मित प्रदूषणमुक्त आहेत. हिमानी क्रियेतून निर्माण झालेली अनेक सरोवरे या पर्वतभागात आढळतात.
दिनारिक आल्प्स पर्वतीय प्रदेशांत तीन प्रकारचे हवामान आढळते. त्यांपैकी किनार्यालगतच्या भागात भूमध्य सागरी प्रकारचे हवामान आढळते; पर्वताच्या बहुतांश भागात अल्पाइन प्रकारचे हवामान असून भरपूर पर्जन्य, अल्पकालीन व शीत उन्हाळे आणि जोराची हिमवृष्टी ही तेथील वैशिष्ट्ये आहेत; तर पर्वताच्या उत्तर कडेवर आणि ईशान्येकडील कमी उंचीच्या श्रेण्यांमध्ये पर्वतीय व खंडीय अशा मिश्र स्वरूपाचे हवामान आढळते. या पर्वतश्रेणीच्या अंतर्गत भागात असलेल्या खोरी एकाकी असली, तरी ती सुपीक मृदेची व दाट लोकवस्तींची आहेत. पर्वतीय भागात विविध प्रकारच्या वनस्पती, गवताळ कुरणे आणि समृद्ध प्राणिजीवन आढळते. तसेच या प्रदेशात इटालियन, क्रोएशियन, स्लोव्हेनियन, बॉझ्नियन इत्यादी लोक वास्तव्यास आहेत. येथील पुरुषांची सरासरी उंची ६ फुट व स्त्रियांची उंची ५’ ७” असून ते जगातील उंच लोकांत समाविष्ट होतात. अरण्योद्योग, खाणकाम आणि पर्यटन हे येथील प्रमुख आर्थिक व्यवसाय आहेत.
समीक्षक – वसंत चौधरी