पुत्रजीवी(पुत्रंजीवा रॉक्सबर्गाय) : (१) वनस्पती, (२) फळे व पाने यांसह फांदी, (३) फुलोरा

पुत्रजीवी हा सदाहरित वृक्ष पुत्रंजिव्हेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव पुत्रंजीवा रॉक्सबर्गाय आहे. तो मूळचा भारत आणि श्रीलंका येथील पर्जन्यवनांतील असून पूर्वी त्याचा समावेश यूफोर्बिएसी कुलात होत असे.

पुत्रजीवी हा मध्यम आकाराचा वृक्ष ८–१५ मी. उंच वाढतो. खोडाचा घेर सु. २ मी.पर्यंत असतो. सालीचा रंग गडद करडा असून ती खडबडीत व आतून भुसभुशीत असते. लोंबणाऱ्या फांद्या व उपफांद्या असलेल्या या वृक्षावर आडवी सूक्ष्म श्‍वसनरंध्रे असतात. पाने साधी, गडद हिरवी, चकचकीत, दीर्घवृत्ताकार, ५–८ सेंमी. लांब व टोकदार असून देठ आखूड असतो. पानांच्या मुख्य शिरेच्या दोन्ही बाजूंना असंख्य उपशिरा असतात. फुले लहान, पिवळट, अनाकर्षक व एकलिंगी असून त्यांना पाकळ्या नसतात. नर-फुले गोलसर फुलोऱ्यात येतात. मादी-फुले एकेकटी किंवा तीन-चारच्या झुबक्यांत व हिरवी, परंतु भिन्न वृक्षांवर असतात. फळ आठळीयुक्त, लांबट, गोलसर, गुळगुळीत, पांढरे व कठीण असून त्यात एकच बी असते. बीजावरण चिवट व कठीण असते. हरिणे व वटवाघळे ही फळे खातात. त्यांच्यामार्फत बियांचा प्रसार होतो.

पित्त, तहान व दाह यांवर पुत्रजीवी वनस्पती गुणकारी आहे. पाने व फळे संधिवातावर वापरतात. बियांपासून भुरकट रंगाचे तेल काढतात. ते दिव्यात जाळण्यासाठी वापरतात. लाकूड करड्या रंगाचे, कठीण व टिकाऊ असते. त्यापासून हत्यारे व अवजारे तयार करतात. पाने चारा म्हणून गुरांना खायला देतात. सावलीसाठी व शोभेसाठी हा वृक्ष बागेत तसेच रस्त्याच्या कडेला दुतर्फा लावतात.

प्रतिक्रिया व्यक्त करा