शरीरातील तीन दोषांपैकी एक दोष म्हणजे कफ. कफाला श्लेष्मा असेही म्हणतात. कफ आवश्यक प्रमाणात शरीरात असताना शरीरातील व्यापार सुरळीत चालण्यास मदत करतो. मात्र आवश्यक प्रमाणापेक्षा कमी किंवा अधिक झाल्यास रोग उत्पन्न करतो, तेव्हा त्यास दोष म्हणतात. कफाचे स्वरूप बघितले असता तो पांढऱ्या रंगाचा, जड, स्निग्ध, चिकट व थंड असतो. जेव्हा कफ त्याच्या मूळ स्वरूपात असतो तेव्हा तो चवीला गोड असतो. परंतु, त्यात विकृती निर्माण झाली तर चवीला खारट होतो. कफ मूलत: स्थिर स्वभावाचा असला तरी वाताच्या साहाय्याने तो सर्व शरीरभर भ्रमण करतो. कफाचे वास्तव्य सर्व शरीरात असले तरीही आमाशय, छाती, घसा, जीभ, डोके, सांधे, रस धातू, मेद धातू ही कफाची प्रमुख स्थाने आहेत. कार्य व कार्यक्षेत्राच्या दृष्टीने कफाचे पुढील पाच प्रकार सांगितले आहेत : क्लेदक, अवलंबक, बोधक, तर्पक आणि श्लेषक.

क्लेदक कफ आमाशयात राहून खाल्लेल्या अन्नाला ओलसरपणा आणतो व त्याचा लगदा बनवितो. हा कफ अन्नाचे पचन होण्यास मदत करतो. अवलंबक कफ छातीच्या ठिकाणी राहून हृदयाला आधार व शक्ती देतो. बोधक कफ जिभेचे मूळ व घसा या ठिकाणी राहतो. हा कफ जिभेला सर्व प्रकारच्या चवींचे ज्ञान करवून देण्यात साहाय्यक ठरतो. तर्पक कफ डोक्याच्या ठिकाणी राहून ज्ञानेंद्रियांची काळजी घेतो व त्यांच्या कामात साहाय्य करतो. श्लेषक कफ सांध्यांच्या ठिकाणी राहून वंगणाप्रमाणे काम करतो व सर्व सांध्यांना कार्यक्षम बनवितो.

पहा : दोष (त्रिदोष), दोषधातुमलविज्ञान, पित्तदोष, वातदोष.

संदर्भ :

  • सुश्रुत संहिता—सूत्रस्थान, अध्याय २१ श्लोक १२-१५.

समीक्षक – जयंत देवपुजारी