विषतंत्राला आयुर्वेदीय परिभाषेत ‘अगदतंत्र’ असे म्हटले आहे. अगद म्हणजे ‘विषनाशन’ होय.  अशाप्रकारे विष आणि त्यांची औषधे इत्यादींचे अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अगदतंत्र होय.

विषबाधा होण्याने तसेच विषारी प्राण्यांच्या दंशानेही व्यक्तीस इजा होऊ शकते किंवा व्यक्ती मृत्यूमुखी पडू शकते. या संदर्भातील सर्व बाबींचा विचार या तंत्रात होतो. अष्टांग आयुर्वेदामधील ही एक प्रमुख शाखा असून याला दंष्ट्रा विज्ञान म्हटले आहे. थोडक्यात प्राणी/कीटक यांच्या दंशामुळे किंवा निसर्गातील विविध स्वाभाविक कृत्रिम किंवा संयोगांमुळे झालेल्या विषांमुळे शरीरावर उत्पन्न झालेली लक्षणे, त्यांचे निदान व चिकित्सा ज्यामध्ये सांगितली आहे ते म्हणजे अगदतंत्र होय.

जमीन, हवा आणि पाणी यांना दुषित करणारी कारणे व यांच्यामुळे होणारा सामुहिक लोकसंख्येचा विनाश (जनपदोध्वंस) यांचाही अभ्यास या शाखेत होतो.

सद्यस्थितीत नवनवीन विषांचा शोध लागत आहे. औषधे, कीटकनाशके, घरगुती स्वच्छतेसाठी तसेच औद्योगिक कामात वापरली जाणारी रसायने, खते, युद्धांमधील अस्त्रे, वेगवेगळे विषारी वायू या सर्वांमुळेच कमी-अधिक फरकाने मानवी शरीरावर वाईट परिणाम होत असतो. त्यामुळे होणारी नवीन रोगाची उत्पत्ती तसेच अगदी गुणसूत्रांच्या पातळीपर्यंतच्या परिणामांच्या अध्ययनासाठी या विषयाचे महत्त्व खूप वाढत आहे. तसेच सध्या मादक द्रव्यांचा, व्यसनकारी औषधांचा अतिप्रमाणात वापर इत्यादी सामाजिक समस्या निर्माण झाल्या आहेत. अशा परिस्थितीत लोकशिक्षणाबरोबर याच्या चिकित्सा व त्यांचे कायदे यासंबंधी खूप मोठा विस्तार झाला आहे, त्या सर्वांचा अंतर्भाव या शाखेत होतो.

विषग्रस्त लोकांच्या रोगनिदानासाठी आयुर्वेदाच्या विविध संकल्पना, आधुनिक जीवनशैली आणि रोगनिवारण्याच्या नवनवीन पद्धती, औषधे यांसाठी मोठ्याप्रमाणावर संशोधन सुरू आहे. सद्यस्थितीत अगदतंत्र या शाखेमध्ये या विषयांव्यतिरिक्त न्यायवैद्यकीय दृष्ट्या महत्त्वाचे नियम, वेगवेगळ्या रासायनिक पृथक्करण करणाऱ्या प्रयोगशाळा व त्यासंबंधित कायदे, वैद्यकीय व्यावसायिकांचे नियम, हक्क व त्यासंबंधीचे कायदे, संशोधन करणाऱ्या संस्थांचे नियम व कायदे तसेच वैद्यकाशी संबंधित कायदे अशा विषयांचा अंतर्भाव करण्यात आला आहे.

पहा : अष्टांग आयुर्वेद.

संदर्भ :

  • अयोध्याप्रसाद अचल, अगदतंत्र आयुर्वेदीय विषविज्ञान, चौखम्बा सूरभारती प्रकाशन, २००२.
  • अम्बिकादत्तशास्त्री, आयुर्वेद तत्वसंदिपिका, सुश्रुतसंहिता, विषविज्ञान, चौखम्बा संस्कृत संस्थान प्रकाशन, वाराणसी, २००२.

समीक्षक : अक्षय जोशी