एक प्राचीन ईजिप्शियन गौण देवता. पूर्वेकडील वाळवंटातील रहिवासी असून ती सुफलन व पुनर्जन्माची देवता होय. पूर्व दिशेच्या भूमीचे हे मानवीकरण किंवा मानवी रूपातील प्रतीक होय. खेन्तेत ईआबेत म्हणूनही ती परिचित आहे. तिचा उल्लेख आबेत, आब्तेत, आब, ईआबेत, ईआब आदी भिन्न नामांतरांनी पपायरसमध्ये आढळतो. या सर्व नावांचा अर्थ पूर्वदिशेची अग्रगण्य देवता असाच होतो. ईआबेत ही मिननामक देवाची माता आणि पत्नीही असल्याचे उल्लेख असून तोही तिच्याप्रमाणे पूर्व वाळवंटाचा देव आहे. ईआबेतसारखीच पश्चिम दिशादर्शक देवता आमेनतेत आहे; पण आमेनतेत ईआबेतपेक्षा श्रेष्ठ देवता आहे. तथापि तिचे चित्रण आमेनतेतबरोबर नवसाम्राज्यातील थडग्यांवर, शवपेट्यांवर आणि अश्मशवपेट्यांवर आढळते. एवढेच नव्हे, तर अन्यविधिदर्शक पपायरसवरील दृश्यांत चितारलेले दिसते; पण नवसाम्राज्यातील फेअरोंच्या (राजांच्या) शाही थडग्यांवर त्याचे क्वचित दर्शन घडते. खुफू फेअरोच्या कारकिर्दीतील एका राजकन्येने तिचे नेफेर्त-ईआबेत हे नाव धारण केले होते. त्याचा अर्थ ईआबेतचे लावण्य असा होतो. शिवाय पूर्वेकडील एक सुरसुंदरी असाही तिचा उल्लेख असून ईआबेत देवतेशी त्या नावाचा काही संबंध नाही.

ईआबेतचा रा या देवतेशी जवळचा संबंध आहे. त्यामुळे ती अनुबिसची कन्या केबेचेट हिच्याशी जवळीक दर्शविते. केबेचेट ही जलाद्वारे मृतात्म्यांना पवित्र व ताजेतवाने करणारी देवता होती. ईजिप्तमध्ये असणाऱ्या सर्व मंदिर-वास्तूंतील काही पुजारी यांच्याकडे खास करून दैनंदिन पूजाविधीचे काम सोपविलेले असे. ते गर्भगृहातील देव अथवा देवता बाहेर काढून त्याला वा तिला अभिषेक (धूत) करीत. नंतर तेल लावून पोषाख चढवीत व उदबत्तीने ओवाळीत. त्यामुळे हवा स्वच्छ होई. ईआबेत या विधींनी पूजिली जाई. ईआबेत ही मुळात आकाशस्थ देवता आहे. तिचा पूर्वेकडील उगवत्या सूर्यदेवतेशीही संबंध दर्शविला जातो. सामान्यपणे ईआबेतचे रेखाटन दोन्ही हात बाजूला असणाऱ्या स्त्री-रूपात अन्य आमेनतेत, नीथ, इसिस, तेफनत इत्यादी अकरा देवतांच्या सोबत केलेले असते. मिन आणि त्याची दुसरी पत्नी रेपित ह्यांच्या सोबत ईआबेत पनोपलिस येथे पूजिली जात असे.

संदर्भ :

  • Remlar, Pat, Egyptian Mythology A to Z, Pennsylvania, 2010.

समीक्षक – सिंधू डांगे

प्रतिक्रिया व्यक्त करा