सिंग, नायब सुभेदार बाना : (६ जानेवारी १९४९). भारतीय भूसेनेतील एक धाडसी, शूर सैनिक आणि परमवीरचक्र या सर्वोच्च लष्करी पदाचे मानकरी. त्यांचा जन्म सामान्य शेतकरी शीख कुटुंबात कड्याल (पंजाब) या खेड्यात झाला. पाच भाऊ आणि तीन बहिणी यांमध्ये ते जेष्ठ होते. या मोठ्या कुटुंबाच्या चरितार्थासाठी बहुतेक सर्वजण शेतीची कामे करीत. सुभेदार बाना सिंग यांचे आई-वडील अत्यंत धर्मशील होते. बाना सिंगांचे आठवीपर्यंतचे शिक्षण जन्मगावी झाले आणि पुढील मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण त्यांनी शेजारच्या बड्याळ ब्रह्य या गावी घेतले. ऐन तारुण्यात त्यांना देशासाठी काहीतरी भव्यदिव्य करावे, अशी तीव्र इच्छा निर्माण झाली. म्हणून ते वयाच्या विसाव्या वर्षी भारतीय भूसेनेत भरती झाले (६ जानेवारी १९६९). लवकरच स्वतःच्या कर्तबगारीने ते सुभेदारही झाले. त्यामुळे त्यांच्याकडे एका स्वतंत्र पलटणीचे नेतृत्व आले.

भारत-पाकिस्तानच्या फाळणीनंतर झालेल्या कराची करारानुसार (१९४९) दोन्ही देशांनी जम्मू-काश्मीरच्या नकाशावर युद्धबंदी रेषा अधोरेखित केली; परंतु पाकिस्तानने घुसखोरीचे तंत्र अवलंबून काही प्रदेशांचे प्रश्न गुंतागुंतीचे करून सियाचीन हा सु. ५,१८० चौ. किमी. चा भाग चीनला दिला. भारत, पाकिस्तान आणि चीन यांच्या सरहद्दीवरील सु. ६,७०६ मी. उंचीचा निर्मनुष्य, बर्फाच्छादित आणि −३०° से. ते −३५° से. तापमानाचा अतिथंड असा हा भाग होता. पाकिस्तानने १९८३ मध्ये तिथे घुसखोरीचा प्रयत्न केल्यावर भारताने १९८४ मध्ये साल्तो रेंज हा हिमनदीच्या पश्चिमेकडील भाग ताब्यात घेतला. असहिष्णू वातावरणामुळे (बर्फ, अतिथंड हवामान) हा प्रदेश पादाक्रांत करण्यात अडचणी येत होत्या. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने १९८७ मध्ये एक कुटिल कारस्थान करून ‘स्पेशल सर्व्हिसेस ग्रुप’ (एस.एस.जी.)च्या युनिटला छुप्या मार्गाने तेथे ताबा मिळविण्याची यशस्वी योजना आखून, भारतीय हद्दीतील सियाचीन हिमनदीवरच्या एका महत्त्वाच्या शिखरावर फौजा धाडून ताबा मिळविला आणि त्याला कैद-ए-आझम मुहम्मद अली जिना यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘कैद पोस्ट’ हे नाव दिले.

या घुसखोरीला प्रतिबंध करण्यासाठी एक विशेष पथक (Task Force) निर्माण करण्यात आले. बाना सिंग यांनी स्वेच्छा उमेदवारी कळविली. नायब सुभेदार बाना सिंग आणि त्यांच्या साथीदारांनी खंदकाखंदकांमध्ये रांगत रांगत जाऊन हातगोळे भिरकावत आणि संगिनीने हल्ला करीत शत्रूची त्या जागेतून हकालपट्टी केली. यावेळी भारतीय सैन्याने यापूर्वी केलेल्या अयशस्वी प्रयत्नामुळे त्यांना वाटेत बर्फात इतस्ततः पडलेल्या आपल्या अनेक सैनिकांचे मृतदेह ओलांडावे लागले. सुरुवातीस आपल्या चार साथीदारांसह नायब सुभेदार बाना सिंग पुढे गेले आणि त्यानंतर पलटनीतील अन्य साथीदार त्यांना येऊन मिळाले. वाघनखांच्या साह्याने ते बर्फाच्या भिंती चढून वर गेले होते. यावेळी वाऱ्याचा प्रचंड वेग, प्रतिकूल हवामान (−३०° से.) आणि कमरेएवढ्या उंचीच्या भुरभुरणाऱ्या बर्फातून मार्गक्रमण करीत ते शत्रूजवळ पोहोचले. ग्रेनेड घेऊन बाना सिंग पुढे धावले. बंकरमध्ये हातातील ग्रेनेड त्यांनी फेकले आणि तेथे असणाऱ्या सैनिकांना संगिनीने भोसकून ठार केले. पाकिस्तानी एस.एस.जी.चे सात कमांडो जागीच ठार झाले आणि इतर पळून गेले. ते ठाणे भारतीय सेनेने ताब्यात घेतले. पुढे त्याचे ‘बाना टॉप’ असे नामकरण करण्यात आले.

नायब सुभेदार बाना सिंग यांनी केलेल्या धाडसी कामगिरीबद्दल त्यांना परमवीरचक्र पदक देऊन गौरविले गेले (१९८८). त्या वेळी पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरे जाताना ते म्हणाले, “माझ्या बटालियनच्या कुणाही व्यक्तीने जे केले असते, तेच मी केले आणि माझ्या सुदैवाने मी त्यांचे नेतृत्व केले”.

संदर्भ :

  • लेले, जोत्स्ना (अनु.), परमवीर चक्र : रणांगनावरील आपले महान योद्धे, पुणे, २००६.