सिंग, मेजर होशियार : (५ मे १९३६–६ डिसेंबर १९९८). भारतीय लष्करातील एक पराक्रमी सेनाधिकारी आणि परमवीरचक्र या सर्वोच्च लष्करी पुरस्काराचे मानकरी. त्यांचा जन्म लढाऊ परंपरा असलेल्या जाट ज्ञातितील शेतकरी कुटुंबात चौधरी हिरासिंग व माधुरीदेवी या दांपत्यापोटी सिसाना (जि. सोनपत, हरयाणा) येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण जन्मगावी झाले. त्यानंतर जाट हायर सेकंडरी हायस्कूलमधून ते प्रथम श्रेणीत मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले (१९५६). त्यानंतर त्यांनी रोहटकच्या जाट महाविद्यालयात एक वर्ष अभ्यास केला व नंतर ते भूसेनेत रूजू झाले. तत्पूर्वी विद्यार्थिदशेत एक उत्तम व्हॉलीबॉलपटू म्हणून त्यांची नॅशनल चॅम्पियनशिपसाठी संयुक्त पंजाबच्या व्हॉलीबॉल संघात निवड झाली होती. याच सुमारास त्यांचे धन्नूनामक तरुणीशी लग्न झाले. त्यांना तीन मुले आहेत. पुढे ते पंजाब व्हॉलीबॉल संघाचे कॅप्टन झाले आणि त्यांची भारताच्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल संघामध्ये निवड झाली. अशाच एका व्हॉलीबॉल स्पर्धेच्या वेळी जाट रेजिमेंटच्या एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने त्यांचे कौशल्य पाहून त्यांना लष्करात भरती होण्यासाठी प्रोत्साहित केले.

प्रारंभीच्या प्रशिक्षणानंतर त्यांची ३ ग्रेनेडिअर्समध्ये नेमणूक झाली. त्यांच्या धैर्याची व कर्तृत्वाची दखल घेऊन त्यांना कमिशन देण्यात आले (१९६३) व त्यांची बदली नेफामध्ये झाली. १९६५ च्या भारत-पाकिस्तान संघर्षात त्यांच्या धैर्याची आणि निश्चयाची प्रचिती आली. त्यांनी बिकानेर सेक्टरमध्ये आपल्या पलटणीसाठी कसून टेहळणी करून अत्यंत गुप्त आणि महत्त्वाची माहिती मिळविली. या माहितीचा उपयोग पुढील कारवाईसाठी पलटणीला झाला. त्यांनी या टेहळणीसाठी दाखविलेल्या साहसाची पलटणीच्या अहवालात नोंद झाली. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना मेजरपदी पदोन्नती मिळाली.

पाकिस्तानबरोबर १५ डिसेंबर १९७१ रोजी युद्ध सुरू झाले. त्या वेळी मेजर होशियार सिंगांच्या नेतृत्वाखालील तीन क्रमांकाच्या पलटणीला शकरगढ सेक्टरमधील बसंतर नदीपलीकडे मोर्चेबांधणी करण्याचे काम दिले होते, तर कंपनीच्या डाव्या आघाडीचे नेतृत्व मेजर होशियार सिंग करत होते. नदीच्या दोन्ही बाजूंस शत्रूने सुरुंग पेरले होते आणि रक्षणासाठी फौज तैनात केली होती. त्यांना शत्रूचे जरपाल ठाणे काबीज करण्याचा हुकूम होता. मेजर होशियार सिंगांनी हल्ला करताच शत्रूकडून त्यांच्यावर मशीनगनमधून प्रचंड मारा होत होता आणि सर्व बाजूंनी गोळीबारही सुरू होता; तथापि या कशाचीही तमा न बाळगता समोरासमोर लढत ते खंदक ओलांडत पुढे जात होते आणि त्यांनी लक्ष्य काबीज केले. १६ डिसेंबर १९७१ रोजी शत्रूने पुन्हा तीन प्रतिहल्ले चढविले. त्यांपैकी दोन हल्ल्यांना रणगाड्यांची साथ होती. तरीसुद्धा तोफांच्या भडीमाराला आणि रणगाड्यातून होणाऱ्या गोळीबाराला न जुमानता विलक्षण धैर्याने मेजर होशियार सिंग एका खंदकातून दुसऱ्या खंदकाकडे झेप घेत होते आणि आपल्या सहकारी जवानांना प्रोत्साहन व धीर देत होते. त्यांच्या असीम धैर्याने आणि नेतृत्वाने प्रेरित होऊन त्यांच्या तुकडीने शत्रूचे सर्व हल्ले परतवून लावले आणि शत्रूकडील अनेक सैनिक जखमी झाले. त्यानंतर १७ डिसेंबर रोजी शत्रुसैन्याने तोफखान्याच्या मदतीने जोरदार हल्ला केला. त्यात मेजर होशियार सिंग जबर जखमी झाले, तरीही बेधडक निर्भयपणे एका खंदकातून दुसऱ्या खंदकात जात असतानाच तोफेचा एक गोळा त्यांच्या चमूतील एका मध्यमवेध घेणाऱ्या मशीनगनजवळ पडला. त्यामुळे ती गन निकामी झाली व चमूतील काही जण जखमी झाले. मशीनगनचे महत्त्व होशियार सिंगांना ठाऊक असल्यामुळे खंदकात उडी घेऊन त्यांनी शत्रूवर बेछूट गोळीबार केला. यामध्ये शत्रुसैन्याचे पंच्याऐंशी जवान आणि त्यांचा कमांडिंग ऑफिसर मोहम्मद अक्रम राजा व इतर काही अधिकारी मृत्युमुखी पडले. शत्रूचा पूर्ण पराभव झाला होता; मात्र जबर जखमी होऊनही युद्धविरामाची घोषणा होईपर्यंत त्यांनी रणांगण सोडले नाही. या संपूर्ण लष्करी संघर्षात मेजर होशियार सिंग यांनी लष्करी परंपरेला साजेल असे नेत्रदीपक शौर्य, दुर्दम्य आशावाद, लढाऊबाणा आणि कणखर नेतृत्व दाखविले. त्याचा उचित गौरव त्यांना परमवीरचक्र देऊन करण्यात आला (१९७२). कंपनी कमांडरच्या दहा वर्षांच्या कारकीर्दीत त्यांची कंपनी सलग सहा वेळा सर्वश्रेष्ठ कंपनी म्हणून घोषित करण्यात आली होती. मेजर होशियार सिंग १९९६ मध्ये सेवानिवृत्त झाले.

अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले.

संदर्भ :

  • कारडोझो, मेजर जनरल इयान, अनु. लेले, ज्योत्स्ना, परमवीर चक्र, पुणे, २००६.

समीक्षक – सु. र. देशपांडे

प्रतिक्रिया व्यक्त करा