सिंग, सुभेदार जोगिंदर : (२८ सप्टेंबर १९२१‒२३ ऑक्टोबर १९६२). भारतीय लष्करातील एक शूर व पराक्रमी सुभेदार आणि परमवीरचक्र या सर्वोच्च शौर्य पदकाचे मरणोत्तर मानकरी. त्यांचा जन्म एका गरीब शेतकरी कुटुंबात महाकालन (मोगा, पंजाब) या खेड्यात झाला. सामान्य परिस्थितीमुळे त्यांना प्राथमिक शिक्षणाव्यतरिक्त पुढील औपचारिक शिक्षण घेता आले नाही. पुढे ते सैन्यदलात शीख पलटणीमध्ये भरती झाले (२८ सप्टेंबर १९३६). तिथे त्यांनी सैनिकी प्रशिक्षण घेतले आणि ‘युनिट एज्युकेशन इन्स्ट्रक्टर’ म्हणून सेवेत रुजू झाले. अल्पकाळातच त्यांचे कर्तृत्व दिसून आले, त्यामुळे त्यांना सुभेदारपद देण्यात आले.

भारत-चीन संघर्षात (१९६२) दक्षिणेकडील थांगला रेंज या प्रदेशातून शत्रूला हुसकावून लावण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला. नामकाचू या शत्रूच्या ताब्यातील आणि असुरक्षित भागात कूच करण्याचा आदेश पायदळाच्या सातव्या तुकडीला देण्यात आला. या हल्ल्याची माहिती हल्ल्यापूर्वी प्रसृत झाली आणि ही मोहीम आक्रमक असल्याचे सांगितले गेले; तथापि आपल्या सैन्याची काहीच तयारी नव्हती. चिनी सैन्याने वृत्तपत्रीय बातम्यांचा आणि तेथील भौगोलिक परिस्थितीचा फायदा घेऊन नामकाचू येथील हल्ला सर्व शक्तीनिशी केला. भारतीय सैनिक प्राणपणाने लढले; परंतु जुनी आणि निरुपयोगी शस्त्रास्त्रे, अपुरा दारूगोळा आणि संदेशवहनाचा अभाव यांमुळे बरेच जवान युद्धात जबर जखमी झाले; काही मृत्युमुखी पडले. अखेर भारतीय सैन्याचा दारुण पराभव झाला (२० ऑक्टोबर १९६२).

त्यानंतर चिनी सैन्याने तवांगकडे कूच केले. बुला येथे सुभेदार जोगिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखालील एक नंबरच्या शीख कंपनीच्या तुकडीने चिनी सैन्याला रोखले. जोगिंदर सिंगांकडे थोडे सैनिक होते. या हल्ल्यात अर्धेअधिक सैनिक आणि सुभेदार जोगिंदर सिंग जखमी झाले, तरीसुद्धा त्यांच्या सैन्याने पहिला हल्ला निकराने परतविला. ‘बोले सोनिहाल सत श्री अकाल’ अशी शीख सैनिकांनी आरोळी ठोकून समोरून येणाऱ्या दुसऱ्या तुकडीवर प्रतिहल्ला चढविला. त्यात दारूगोळा संपला, तेव्हा जखमी सैनिकांनी आपल्या संगिनी रोखून काही चिनी सैनिकांना जायबंद केले; परंतु संख्याबळ अधिक असलेल्या चिनी लष्कराने सुभेदार जोगिंदर सिंग आणि त्यांच्या साथीदारांना पराजित केले आणि जखमी जोगिंदर सिंगांना पकडून नेले. तिथेच त्यांचे निधन झाले.

त्यांचा विवाह झाला होता (१९५०). त्यांना एक पुत्र आणि दोन कन्या होत्या. त्यांपैकी त्यांच्या मोठ्या कन्येचे वडिलांच्या निधनाचे वृत्त ऐकून त्या धक्क्याने निधन झाले.

या लढाईत दाखविलेल्या अतुलनीय धैर्य व पराक्रमाबद्दल जोगिंदर सिंगांना मरणोत्तर परमवीरचक्र या पदकाने सन्मानित केले. याशिवाय पंजाब सरकारने त्यांच्या कुटुंबास उपजिविकेसाठी जमीन दिली.

संदर्भ :

  • कारडोझो, मेजर जनरल इयान, अनु. लेले, ज्योत्स्ना, परमवीर चक्र, पुणे, २००६.

समीक्षक – सु. र. देशपांडे

प्रतिक्रिया व्यक्त करा