कृष्ण यजुर्वेदाशी संबंधित असलेल्या या उपनिषदात अवघे २५ मंत्र आहेत. यातील उपदेश साधकांना संसाराचे बंध कापून मोक्षाची वाट सुकर करण्यासाठी जणू काही क्षुरिका म्हणजेच सुरीसारखी मदत करतो.
उपनिषदाच्या आरंभी ‘साधकाला योगयुक्त करणाऱ्या आणि जन्ममृत्यूच्या चक्रातून सोडवून मोक्षाप्रत नेणाऱ्या क्षुरिका धारणेचे कथन केले जात आहे’ अशा प्रकारे उपनिषदाचा उद्देश स्पष्ट करण्यात आलेला आहे. यात क्षुरिका हे रूपक मन आणि प्राणायाम या दोघांना उद्देशून वापरले आहे. कारण शुद्ध असलेले मन ज्ञानप्राप्तीसाठी समर्थ होते; ज्यायोगे मुक्ती मिळते आणि प्राणायामामुळे मनाचा निरोध होतो. म्हणून पुढील काही श्लोकांमध्ये ध्यानासाठी आवश्यक अशा प्राणायामाचे वर्णन येते. एखाद्या शांत ठिकाणी विषयांपासून इंद्रियांना परावृत्त करून एका आसनात स्थिर व्हावे आणि प्रणवाचा जप, ईश्वराचे ध्यान (अर्थभावना), पूरक (श्वास घेणे), रेचक (श्वास सोडणे) आणि कुंभक (श्वास रोखणे) करावेत असे येथे सांगितले आहे.
यानंतर सुषुम्ना नाडीचे महत्त्व सांगितले आहे. सुषुम्ना ही बहात्तर हजार नाड्यांमध्ये प्रमुख, देवरूपिणी आणि जिचे छेदन केले जाऊ शकत नाही अशी एकमेव नाडी आहे. कोळी त्याच्या जाळ्याच्या आधाराने सर्वत्र संचार करतो तसा प्राणाचा या सुषुम्ना नाडीतून संचार करावा. प्राणाचा प्रवास पुरुषाचे निवासस्थान असलेल्या दहर पुंडरीक किंवा अनाहत चक्रापासून सुरू होतो. या चक्राचे भेदन करून प्राण सुषुम्ना नाडीच्या ठिकाणी पोहोचतो आणि नंतर कंठस्थानात येऊन थांबतो.
जसे कार्यभाग साधण्याआधी सुरीला धारदार केले जाते तसे अनाहत चक्राचे भेदन करण्याआधी मूलाधार इत्यादी चक्रांवर मनाला स्थिर करून मनाला अधिकाधिक शक्तिशाली करावे. साधकाने निर्मळ धार असलेल्या, निर्दोष अशा, योगसाधनारूपी, सत् आणि असत् बुद्धीच्या सहाय्याने तीक्ष्ण केलेल्या मनरूपी सुरीच्या सहाय्याने सुषुम्ना सोडून इतर नाड्यांचे छेदन करावे.
साधकाने चित्त वश करून, एकांतात बसून, निरासक्त होऊन परमतत्त्व जाणावे. यामुळे संसाराच्या पाशांचे छेदन होऊन साधक आकाशात नि:शंकपणे भरारी घेणाऱ्या हंसाप्रमाणे लौकिक व्यवहाराच्या पलीकडे पोहोचतो.
विझतेवेळी संपूर्ण शांत होणाऱ्या दिव्याप्रमाणे योग्याची कर्मे दग्ध होऊन तो लयाप्रत जातो. योग जाणणारा साधक वैराग्याच्या शिळेवर घासून धार लावलेल्या प्राणायामरूपी तीक्ष्ण सुरीने जन्म-मरणाच्या चक्राचा मूळ आधार असलेल्या तंतूला कापून टाकतो आणि मग पुन्हा बंधनात पडत नाही. तो सर्व इच्छा-अभिलाषांपासून मुक्त होतो, अविद्या आणि वासनांचे धागे कापून टाकतो आणि अमृतत्व प्राप्त करतो.
कमी श्लोकांतूनही मोठा आशय व्यक्त करणारे हे उपनिषद् योगसाधकांना सुगम शैलीत आणि सोप्या उदाहरणांच्या साहाय्याने मोक्षमार्गाचा उपदेश करते. या उपनिषदात पातञ्जल योग, हठयोग आणि वेदांताधिष्ठीत योग यांचा समन्वय आढळतो.
पहा : यजुर्वेद.
समीक्षक : रुद्राक्ष साक्रीकर