झ्यूसला ग्रीक देवतांपैकी सर्वाधिक महत्त्वाचा देव मानला जातो. रोमन दैवतशास्त्रामध्ये त्याचे नाव ज्यूपिटर झालेले दिसते. वैदिक देवतांपैकी द्यावा-पृथिवी या देवतायुग्मातील, ‘द्यौ’ या देवतेशी म्हणजेच स्वर्ग किंवा आकाशाशी झ्यूसचे साम्य आढळते. त्याचप्रमाणे ज्यू दैवतशास्त्रामधील जेहोवा किंवा येहोवा या सर्वशक्तिमान, तेजस्वी आणि सर्वच उत्तम गोष्टींचे प्रतीक असलेल्या देवाशीही त्याचे साधर्म्य दिसते.
झ्यूस या शब्दाचा अर्थच स्वर्गीय दिव्यप्रकाश असा आहे, त्यामुळे त्याचे वर्णन प्रकाशाचा जनक, आकाशदेवता, सर्वशक्तिमान, बुद्धिमान देव, तसेच मानवांचा वयोवृद्ध पिता आणि रक्षक म्हणून येते.
होमरने उल्लेख केल्याप्रमाणे ऑलिम्पियस पर्वतरांगांवरील स्वर्गात झ्यूसचे निवासस्थान असल्याचे मानले जाते. तो आकाशदेवता असल्याने आकाश, हवामान, वातावरण, वायू, मेघ, पर्जन्य, वीज यांच्यावर त्याची सत्ता असल्याचे कल्पिले आहे. तो देवांचा तसेच ऑलिम्पियस पर्वताचा राजादेखील आहे.
झ्यूस हा क्रोनस आणि रीया यांचा पुत्र; तर हेडीस, हेस्टिआ, डीमीटर, पोसायडन आणि हेरा यांचा बंधू. क्रोनसच्या संदर्भात अशी भविष्यवाणी केली गेली होती की, त्याच्या अपत्यांपैकी कोणीतरी त्याला ठार करेल. त्यामुळे झ्यूसच्या आधीची सर्व अपत्ये त्याने जन्माला आल्या आल्या गिळून टाकली. त्या अनुभवावरून रीयाने आपले अखेरचे अपत्य म्हणजेच झ्यूसला लपवून वाचवले आणि नवजात अर्भकाऐवजी एक दगड कापडात गुंडाळून क्रोनसला दिला. तो त्याने गिळल्यानंतर झ्यूसला क्रीटमधील एका पर्वताच्या गुहेत लपवून ठेवले. तेथे अमाल्थिआ नावाच्या शेळीने, पर्यांनी आणि देवदूतांनी त्याचे पालनपोषण केले.
तरुण झ्यूसने मेटीस या स्त्रीटायटनच्या सल्ल्यानुसार क्रोनसच्या उदरातील आपल्या भावंडांची मुक्तता केली. त्यानंतर झ्यूसच्या नेतृत्वाखाली त्या सर्वांनी क्रोनस व इतर टायटन्सच्या विरोधात युद्ध पुकारले. दहा वर्षे चाललेल्या या युद्धामध्ये ॲटलासच्या नेतृत्वाखालील टायटन्सना पराभव पत्करावा लागला. या युद्धामध्ये झ्यूसला त्याचे शस्त्र वज्र (Thunderbolt), तर त्याच्या भावंडांपैकी हेडीसला अदृश्य करणारे शिरस्त्राण (Invisibility Helmet) आणि पोसायडनला त्रिशूल (Trident) मिळाले.
टायटन्सवरील विजयानंतर झ्यूसने हेडीसला पाताळाचे, पोसायडनला समुद्राचे राज्य दिले आणि तो स्वतः अखिल विश्वाचा स्वामी झाला. झ्यूस हा देवांचा राजा असल्याने सर्व मानवी राजेही त्याचे अंश आहेत, असे मानले जाते. न्यायदेवता म्हणूनही त्याला ग्रीक देवतांमध्ये स्थान आहे. आतिथ्य, कृषी, पिके, सुगीचा हंगाम यांवरदेखील त्याचा अंमल चालतो.
हीसिअड या ग्रीक कवीच्या वर्णनानुसार झ्यूस चाणाक्ष, न्यायी, दयाळू असा देव आहे; परंतु त्याचे वागणे काही प्रमाणात अकल्पनीय‒अंदाज करण्यास कठीण‒असे वाटते. तो लवकर क्रोधित होतो आणि त्याचा क्रोध अत्यंत विध्वंसक मानला जातो. पृथ्वीवर होणारी विनाशकारी वादळॆ, विजा चमकणे हे त्याच्या क्रोधाचे प्रकटीकरण आहे.
बहुतेकदा झ्यूस ओक वृक्षाची पाने आणि मुकुट परिधान करतो. त्याच्या चित्रांमध्ये किंवा मूर्तीस्वरूपामध्ये त्याचे चित्रण दाढी असलेला प्रगल्भ पुरुष असे केलेले दिसून येते. त्याचे क्रीटमध्ये बालस्वरूपात पूजन करण्यात येई, तर लायकाइआमध्ये त्याचे झ्यूस लायकिऑस म्हणून पूजन होत असे. सर्वशक्तिमान देवता अशा वर्णनाबरोबरच त्याच्या कामुक आणि विलासी जीवनाचेही चित्रण ग्रीक पुराणकथांमध्ये दिसते.
झ्यूसची बहीण हेरा ही त्याची अधिकृत सहचरी मानली जाते; परंतु इतर देवता, अप्सरा आणि तसेच मानवी स्त्रियांशीदेखील त्याचे प्रेमसंबंध होते, असे दिसते. त्यामुळे हेराचे त्याच्याशी नेहमी खटके उडत. या कारणाने तिचे चित्रण नेहमी क्रोधित, मत्सरी असे केल्याचे दिसते. काही नोंदींनुसार झ्यूसची प्रथम पत्नी हेरा नसून विवेकाची देवता मीटिस ही होती. परंतु तिला होणार्या अपत्यापासून झ्यूसला धोका आहे, असे त्याला यूरेनस व गीया यांकडून कळले होते. त्यामुळे त्याने मीटिसला गिळून टाकले. अजिना, अलेक्मेना, कॅलिओप, कॅसिपिआ, डीमीटर, हेरा, डिओनी, यूरोपा, ईओ, लीडा, लीटो, म्नेमोसिने, निऒबे या त्याच्या प्रेमिकांपैकी काही महत्त्वाच्या प्रेमिका होत. त्यांपैकी बहुतेकांपासून त्याला अपत्यप्राप्तीदेखील झाली. त्याच्या या प्रेयसींना प्राप्त करण्यासाठी त्याने अनेकदा वेगवेगळी रूपे धारण केल्याचा उल्लेख आढळतो. उदा., हेरासाठी त्याने कोकीळ पक्ष्याचे, लेडासाठी हंसाचे, यूरोपासाठी बैलाचे रूप घेतले होते.
झ्यूसची अपत्ये : वर उल्लेखिलेल्या वेगवेगळ्या प्रेयसींपासून त्याला अनेक पुत्रांची तसेच कन्यांची प्राप्ती झाली. अपोलो, आरीझ, आर्टेमिस, अथेना, डायोनायसस, हेलेन, हेपेस्टस, तसेच पर्सेफोनी ही त्यांपैकी काही महत्त्वाची नावे होत.
प्लेटॉनिक तसेच निओप्लेटॉनिक तत्त्वज्ञानामध्येदेखील झ्यूसला महत्त्वाचे स्थान प्राप्त आहे.
संदर्भ :
- Graves, Robert, The Greek Myths : The Complete and Definitive Edition, London, 2011.
समीक्षक : सिंधू डांगे