कोझ, रोनॉल्ड (Coase, Ronald) : (२९ डिसेंबर १९१० – २ सप्टेंबर २०१३). ब्रिटिश अर्थतज्ज्ञ, लेखक व अर्थशास्त्राच्या नोबेल पारितोषिकाचा मानकरी. अर्थव्यवहार व मालकी हक्क या संदर्भातील संशोधनकार्याबद्दल त्यांना अर्थशास्त्र विषयाचा १९९१ मध्ये नोबेल स्मृती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
कोझ यांचा जन्म इंग्लंडमधील लंडन शहराच्या उपनगरात झाला. जन्मजात पायाने अधू असल्याने शारीरिक दुर्बलता असलेल्या मुलांसाठीच्या शाळेत त्यांचे सुरुवातीचे शिक्षण झाले. त्यांनी १९३२ मध्ये ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’मधून बी. एससी. पदवी प्राप्त केली. त्यानंतर १९५१ मध्ये ‘युनिव्हर्सिटी ऑफ लंडन’मधून डी. एससी. ही अर्थशास्त्रातील पदवी मिळविली. दरम्यान १९३५ – १९५१ या काळात ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’मध्ये अर्थशास्त्राचे सहायक प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले. १९५१ – १९५८ या काळात ‘बफेलो युनिव्हर्सिटी, न्यूयॉर्क’ व १९५८ – १९६४ या काळात ‘युनिव्हर्सिटी ऑफ व्हर्जिनिया’ या ठिकाणी त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केले. पुढे १९६४ – १९८१ या काळात ‘युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो लॉ स्कूल’मध्ये अर्थशास्त्राचे क्लिफ्टन आर. मुसेर भूतपूर्व मानद प्राध्यापक म्हणून काम केले. १९८२ नंतर तेथे त्यांची सन्माननीय प्राध्यापक व वरिष्ठ अधिछात्र अशी नियुक्ती झाली. तेथील लॉ स्कूलमध्ये २००० मध्ये त्यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या ‘रोनाल्ड कोस्ट इन्स्टिट्यूट’ या संस्थेच्या स्थापनेपासून ते संशोधन-मार्गदर्शक म्हणून कार्यरत राहिले.
कोझ यांनी १९३७ मधील आपल्या ‘नेचर ऑफ दि फर्म’ या प्रभावी शोधनिबंधात एखाद्या अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये तेथील व्यवसाय संस्थांमध्ये प्रकर्षाने आढळतात, हे दाखवून दिले. त्यांच्या मते, स्वतंत्रपणे व्यवस्था अगर व्यवसाय चालविण्यात ज्या अडचणी-समस्या उद्भवतात त्या व्यवसाय पेढ्यांच्या उत्पत्तीला कारणीभूत ठरतात. कामगारांच्या साह्याने आधुनिक पेढ्यांचे कामकाज चालते. उत्पादनकार्य इतर व्यवस्थांकडून करून घेण्यापेक्षा स्वत:च कामगार नेमून ते त्यांच्याकडून करून घेणे लाभदायक ठरते. तसेच व्यवसायपेढीचा आकार कामकाज चालवण्याचा खर्च व मिळणारे उत्पन्न यांची सांगड बसेल अशा रीतीने विस्तारतो. साधारणपणे सुरुवातीच्या काळात मोठ्या व्यवसायाचे फायदे दिसत असले, तरी नंतरच्या काळात खर्चाच्या तुलनेत उत्पन्नाचे प्रमाण घटून पेढीच्या अमर्याद वाढीच्या दृष्टीने अडथळे निर्माण होतात. व्यवसाय पर्यावरण स्थिर राहून संघटन व व्यावसायिक खर्च कमी राहिल्यास ते पेढीच्या वाढीला पोषक ठरते. उद्योजकाचे निर्णय अचूक ठरल्यास उत्पादनाच्या घटकावरील खर्च मर्यादेत राहून व्यवसाय-संघटना आकाराने मोठी होणे शक्य असते. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व बाजारपेठांचे संशोधन असे घटक व्यवसाय वृद्धीच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरतात. १९६० मध्ये जर्नल ऑफ लॉ ॲण्ड इकॉनॉमिक्स या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झालेल्या आपल्या ‘दि प्रॉब्लेम ऑफ स्पेशल कॉस्ट’ या दुसऱ्या शोधनिबंधात त्यांनी मालमत्ता हक्कासंबंधीचे विवेचन केले. कित्येकदा मालकीचा उपक्रम चालविण्याचा खर्च व त्यापासून होणारी प्राप्ती यांत फारशी तफावत दिसून येत नाही. उदा., आपल्या शेतात शेजाऱ्याची जनावरे घुसल्यामुळे होणाऱ्या नुकसानापेक्षा कुंपण घालण्याचा खर्च कमी असेल, तर कुंपण घालणे शेतमालक पसंत करेल. जनावरे सांभाळण्याचा खर्च कमी व्हावा, यासाठी शेजाऱ्याने कुंपणाचा खर्च करावा वा शेतमालकाने करावा हे आर्थिक फायदा तोट्यावर अवलंबून राहील. राजकीय बाबतीत कोझ हे उदारमतवादी होते. कोणत्याही शासकीय नियंत्रणाचे संभाव्य परिणाम लक्षात येण्यापूर्वीच त्याबद्दल पूर्वग्रहदूषित भाष्य करणे त्यांना गैर वाटत असे. अनेकदा नियंत्रणे लादण्यापाठीमागे त्या वेळची आर्थिक व राजकीय परिस्थिती व विविध घटकांचा दबाव कारणीभूत असतो.
कोझ यांचे पुढील ग्रंथ प्रसिद्ध झाले : ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग-अ स्टडी ऑफ मॉनॉपली (१९५०), एज्युकेशनल टीव्ही, हू शुड पे (१९६८), दि फर्म दि मार्केट ॲण्ड लॉ (१९८८), दि इन्स्टिट्यूशनल स्ट्रक्चर ऑफ प्रॉडक्शन (१९९२), एसेज ऑन इकॉनॉमिक्स ॲण्ड इकॉनॉमिस्ट (१९९४), हाउ चायना बिकेम कॅपिटॉलिस्ट (२०१२ – सहलेखक). शिवाय त्यांचे असंख्य शोधनिबंध व लेख प्रसिद्ध झाले.
कोझ यांनी बफोलो विद्यापीठाची मानद डॉक्टरेट पदवीसह जर्नल ऑफ लॉ ॲण्ड इकॉनॉमिक्सचा संपादक, फिलाडेल्फिया सोसायटीचा विश्वस्त ही पदे भूषविली. त्यांना स्टेट मॅगॅझिनकडून ‘मोस्ट डिस्टिंग्विश्ड इकॉनॉमिस्ट इन दि वर्ल्ड’ हा सन्मान लाभला. शंभराव्या वाढदिवसाच्या सुमारास कोझ हे आपल्या इकॉनॉमिक्स ऑफ चायना ॲण्ड व्हिएतनाम या ग्रंथाच्या लिखाणात व्यग्र होते. यावरून त्यांचा शेवटपर्यंतचा उत्साह व संशोधनवृत्तीचा प्रत्यय येतो.
कोझ यांचे अमेरिककेतील शिकागो-इलिनोयिस येथे निधन झाले.
समीक्षक – संतोष दास्ताने