घुमट : गोवा आणि कोकणातील एक पुरातन स्वरूपाचे अवनध्द वर्गवारीतील लोकवाद्य. याचा आकार मडकीसारखा असतो; परंतु या मातीच्या मडकीची दोन्ही तोंडे उघडी असतात. एका तोंडाचा व्यास १५ ते २० सें. मी. तर लहान तोंडाचा व्यास १० ते १२ सें. मी. असतो. मोठया तोंडावर घोरपडीचे कातडे वनस्पतीच्या चिकाच्या सहाय्याने ताणून बसवितात. तो ताण कायम राहाण्यासाठी तोंडाच्या काठावर दोरीचा वापर केला जातो. नंतर कातडे सुकेपर्यंत ते सावलीत ठेवून देण्यात येते. घुमटाच्या दोन्ही तोंडांवर दोरी ओवून ती वादकाच्या खांद्यावर अडकविली जाते. कातडे मढविलेल्या तोंडावर थाप मारून व बोटे आपटून घुमट वाजवितात. त्यावेळी छोटया तोंडावर दुसरा हात ठेवून घुमटातील हवेचा दाब नियंत्रित केला जातो. त्यामुळे वाद्यापासून निर्माण होणाऱ्या आवाजात वैविध्य येते.
घुमट हे तालवाद्य म्हणून वापरतात. गोव्यातील बहुतेक सर्व लोकोत्सव आणि मंदिरातील उत्सवांमधून हे वाद्य प्रामुख्याने वाजविण्यात येते. शिगमो, गणेशचतुर्थी, मांडो-धुलपद, विवाहप्रसंगीचे नृत्यसोहळे, मंदिरातील आरत्या अशाप्रसंगी घुमटवादन केले जाते. घुमट हे वाद्य स्वतंत्रपणे वाजविले जात नाही. घुमटाच्या साथीला शामेळ अथवा समेळ, कांसाळे आणि सोबत लोकगीतांचे गायनही केले जाते. शिगमोसारख्या उत्सवाच्या वेळी सनई आणि सूर्त किंवा सूर या वाद्यांचीही साथसंगत पुरविली जाते. घुमटाच्या विशिष्टवादन प्रकाराला सुंवारी म्हणतात. घुमणारा घट किंवा घुमणारा माठ अशी घुमट या शब्दाची उत्पत्ती सांगितली जाते. घुमट वाजविणारे कलाकार गोव्याच्या प्रत्येक गावात आहेत. किंबहुना युवावर्गातील घुमटवादकांची शेकडो पथके गोव्याच्या गावागावातून विखुरलेली दिसतात. घुमटवादन आणि घुमटावरील आरती-गायनाच्या अनेक स्पर्धा व उपक्रम गोव्यात संपूर्ण वर्षभर अधूनमधून चालू असतात. घुमट हे आदिम परंपरेतील लोकवाद्य असल्याने ते गोमंतकीय अस्मितेचे एक प्रतीक मानण्यात येते.
संदर्भ : खेडेकर, विनायक विष्णू , लोकसरिता गोमंतकीय जनजीवनाचा समग्र अभ्यास, कला अकादेमी, गोवा.