हॉर्नमान, फ्रीड्रिक कॉन्रात (Hornemann, Friedrich Konrad) : (१५ सप्टेंबर १७७२ – फेब्रुवारी १८०१ ). आफ्रिकेतील अतिशय धोकादायक व अपरिचित सहारा प्रदेशाचे समन्वेषण करणारे पहिले यूरोपीय समन्वेषक. त्यांचा जन्म जर्मनीतील हिल्दसहाइम येथे झाला. त्यांना इतिहास व भूगोल या विषयांत रस होता. त्यांनी गटिंगन येथे निसर्गविज्ञानाचा अभ्यास केला. १७९४ मध्ये आपले शिक्षण पूर्ण करून काही काळ हॅनोव्हर येथे त्यांनी शिक्षकाची नोकरी केली.

लंडनच्या आफ्रिकी संघाने आफ्रिकेतील समन्वेषणासाठी संघाचा समन्वेषक म्हणून हॉर्नमान यांच्यावर १७९६ मध्ये जबाबदारी सोपविली. या संघाने अरेबिक भाषेच्या अभ्यासासाठी आणि उत्तर आफ्रिकेतील अपरिचित प्रदेशातील सफरीच्या तयारीसाठी त्यांना जर्मनीतील गटिंगन विद्यापीठात पाठविले. त्यानंतर १७९७ मध्ये ईजिप्तला जाऊन तेथेही त्यांनी आफ्रिकेच्या सफरीसंदर्भातला अभ्यास सुरू ठेवला. ईजिप्तवर फ्रेंचांचे आक्रमण झाले, तेव्हा धर्मांध लोकांपासून संरक्षण करण्यासाठी त्यांना कैरो येथील किल्ल्यामध्ये आश्रयास ठेवण्यात आले. ५ सप्टेंबर १७९८ रोजी कैरो येथे मुस्लिम पेहराव करून मक्केवरून मगरबकडे परतणाऱ्या फेझान व्यापाऱ्यांच्या काफिल्यात एक मुस्लिम व्यापारी म्हणून ते सामील झाले. या प्रवासात ते ईजिप्तमधील सीवा मरूद्यानमार्गे लिबियातील फेझान प्रदेशात असणाऱ्या मूर्झूक या ठिकाणी १७ नोव्हेंबर १७९८ रोजी पोहोचले. ते जून १७९९ पर्यंत तेथेच राहिले. या प्रवासात त्यांनी पश्चिम सहारा आणि मध्य सूदानमधील भूप्रदेश तसेच तेथील लोक व समाजजीवनाविषयीची माहिती गोळा केली. हा वृत्तान्त लंडनला पाठविण्यासाठी ते १७९९ मध्ये ट्रिपोली येथे गेले. सहारा प्रदेशातून दक्षिणेस मुख्यत: नायजेरियातील हौसा जमातीच्या प्रदेशातून प्रवास करण्याच्या विचाराने ते ट्रिपोलीवरून पुन्हा मूर्झूक येथे परतले. तेथून त्यांनी आपल्या पुढील प्रवासाला सुरुवात केली; परंतु त्यानंतर १८१९ पर्यंत त्यांच्याबद्दल काहीच माहिती मिळाली नाही. नंतर १८१९ मध्ये ते नूफी किंवा नूपी (सांप्रतचे बीडा) येथे पोहोचले होते आणि त्यांचे तेथेच निधन झाले, अशी बातमी त्यांच्या मृत्यूनंतर १८ वर्षांनी मूर्झूक या ठिकाणी समजली.

हॉर्नमान यांनी मिळविलेली मूळ माहिती जर्मन भाषेत होती. त्यांच्या प्रवासाचा इंग्रजी भाषेतील वृत्तान्त जर्नल ऑफ फ्रीड्रिख हॉर्नमान्स ट्रॅव्हल्स फ्रॉम कैरो टू मूर्झूक या नावाने १८०२ मध्ये लंडन येथे प्रसिद्ध झाला.

समीक्षक : ना. स. गाडे