यूरोपातील बाल्कन द्वीपकल्पाच्या पूर्व भागात आणि विशेषत: बल्गेरियात पसरलेली घडीची पर्वतश्रेणी. बल्गेरिया-सर्बीयन सीमेपासून किंवा टीमोक नदीच्या खोऱ्यापासून सुरू झालेली ही पर्वतश्रेणी पुढे मध्य बल्गेरियातून पूर्वेस काळ्या समुद्रापर्यंत पसरलेली आहे. या पर्वतश्रेणीचा पश्चिम-पूर्व विस्तार ५३० किमी. आणि दक्षिणोत्तर रुंदी १५ ते ५० किमी.च्या दरम्यान असून तिने ११,५९६ चौ. किमी. क्षेत्र व्यापले आहे. तिच्यात अनेक सोंडी आढळतात. पर्वतातील सर्वाधिक उंचीची शिखरे मध्य बल्गेरियात असून बॉटेफ (उंची २,३७६ मी.) हे या श्रेणीतील सर्वोच्च शिखर आहे. काळा समुद्र किनाऱ्यावरील केप एमीन येथे ही श्रेणी एकदम संपुष्टात येते. भूशास्त्रीय दृष्ट्या बाल्कन हा घडीचा पर्वत अल्पाईन-कार्पेथियन पर्वतश्रेणीचाच विस्तारित भाग आहे. या श्रेणीत कार्स्ट भूमिस्वरूपे आढळत असून, त्यांत अनेक गुहांची निर्मिती झालेली आहे. या पर्वतश्रेणीच्या प्रामुख्याने पश्चिम आणि मध्य भागात अनेक जलप्रपात आढळतात.

उत्तरेकडील डॅन्यूब नदीचे खोरे आणि दक्षिणेकडील मरित्स नदीचे खोरे हे बाल्कन पर्वतश्रेणीमुळे एकमेकींपासून अलग झाली असून त्या दोन खोऱ्यांदरम्यानचा हा प्रमुख जलविभाजक आहे. हिवाळ्यात ही पर्वतश्रेणी हिमाच्छादित असते. हिवाळा वगळता इतर वेळी तिच्यातून होणाऱ्या वाहतुकीत कोणताही अडथळा येत नाही. जवळजवळ २० खिंडी आणि दोन घळयांमार्गे ही श्रेणी ओलांडता येते. अनेक रस्ते आणि लोहमार्ग या खिंडींमधून आणि घळयांमधून गेलेले आहेत. शिपका ही त्यांपैकी एक प्रमुख खिंड आहे. ईस्कर नदीने ४० किमी. लांबीची घळई निर्माण केली असून तिच्यातूनही वाहतूक चालते.

बाल्कन पर्वतश्रेणीच्या दोन्ही बाजूंकडील हवामानात तफावत आढळते. उत्तरेकडील डॅन्यूब नदीच्या खोऱ्यात खंडीय प्रकारचे

व्हेलिको टर्नाव्हो नगर

हवामान, तर पर्वताच्या दक्षिणेकडील भागात संक्रमणात्मक खंडीय हवामान आढळते. हिवाळे तीव्र असतात. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०० सेंमी.पेक्षा अधिक असते. पर्वतीय भागात अल्पाईन, सूचिपर्णी आणि पानझडी वृक्षांची अरण्ये आढळतात. येथे अनेक संरक्षित क्षेत्रे असून त्यांत वेगवेगळी राष्ट्रीय उद्याने आहेत. विविध प्रकारच्या वनस्पती आणि प्राण्यांमुळे हा भाग जैवविविधतेने समृद्ध असून त्यांत वैविध्यपूर्ण परिसंस्था आढळतात. दगडी कोळसा, ग्रॅफाइट, धातु खनिजे या खनिज संसाधनांचे साठे, तसेच औष्णिक आणि खनिजयुक्त पाण्याचे झरे येथे आहेत. पर्वतीय भागातील खोरी आणि द्रोणीप्रदेश शेतीसाठी अनुकूल आहेत. येथे काही प्रमाणात पर्यटन व्यवसायही चालतो. व्हेलिको टर्नाव्हो हे जुने पहाडी नगर या पर्वतश्रेणीत वसले आहे.

बाल्कन पर्वतश्रेणीमध्ये बल्गेरियन आणि बायझंटिन साम्राज्य यांच्यादरम्यान अनेक लढाया लढल्या गेल्या आहेत.

समीक्षक : वसंत चौधरी