झीजरोधक खडकाची झीज न होता अवशेषाच्या रूपात मागे राहिलेली एकटी वा सुटी टेकडी किंवा विस्तीर्ण सपाट स्थलीप्राय प्रदेशातील एकटा आणि सभोवतालच्या क्षेत्राच्या सर्वसाधारण पातळीपेक्षा अधिक उंच असा एकटा व एकदम उठून दिसणारा उंच खडक किंवा खडकाचा दृश्यांश म्हणजे अवशिष्ट शैल होय. अमेरिकी भूगोलज्ञ विल्यम डेव्हिस यांनी प्रथम या भूमिस्वरूपाला ‘मोनॅडनॉक’ (म्हणजेच अवशिष्ट शैल) असे सामान्य नाव दिले. एखाद्या डोंगराळ, पठारी किंवा मैदानी प्रदेशाची वारा, पाऊस, वातावरणक्रिया (क्षरण) इत्यादी झीज घडविणाऱ्या कारकांमुळे अनेक प्रकारे  झीज होऊन अखेरीस कमी उंचीचे मैदान म्हणजे स्थलीप्राय प्रदेश तयार होतो. असे मैदान ही क्षरणचक्राची अंतिम स्थिती असते. कधीकधी भूकवचाच्या हालचालींमुळे हा प्रदेश पुन्हा वर उचलला जातो आणि पुन्हा त्याची झीज होते. झिजेचे हे कार्य चालू असताना तेथील झिजेला विरोध करणारे अधिक टणक खडक कमी झिजल्याने त्यांचे काही भाग तसेच शिल्लक राहतात; तेच अवशिष्ट शैल होत. असे खडक सामान्यपणे क्वार्टझाइट, कमी संधी असलेले घट्ट ज्वालामुखी खडक, ग्रॅनाइट खडक, बॅथोलिथ, गाळाच्या खडकांच्या  प्रदेशात आत घुसलेल्या ज्वालामुखी खडकांच्या ग्रीवा (मानेसारख्या रचना) असतात. द्वीपगिरीसारखे असणारे अवशिष्ट शैल ही उष्णकटिबंधीय जमिनीवरील भूरूपे असून ती दमट व समशीतोष्ण प्रदेशांत निर्माण होतात.

अमेरिकेच्या न्यू हँपशर राज्याच्या नैर्ऋत्य भागातील चेशायर कौंटीतील मोनॅडनॉट स्टेट पार्कमध्ये सु. ९६५ मी. उंचीचा मोनॅडनॉक किंवा ग्रँड मोनॅडनॉक नावाचा एक डोंगर आहे. त्याची लांबी सु. ८ किमी. व रुंदी सु. ५ किमी. आहे. वारा, पाऊस, नदी, विदारण इत्यादी क्षरणकारकांस विरोध करणाऱ्या कठीण खडकांचा तो बनलेला आहे. अशा प्रकारच्या सर्व डोंगरांस किंवा टेकड्यांस आता ‘अवशिष्ट शैल’ ही संज्ञा वापरतात. काही शास्त्रज्ञांच्या मते, या अवस्थेत इतक्या तीव्र उताराचा उंचवटा शिल्लक राहणे शक्य नाही; तथापि सामान्यतः बहुतेक लेखक डेव्हिसने योजिलेली संज्ञा त्याला अभिप्रेत असलेल्या अर्थानेच वापरतात. मोनॅडनॉक डोंगरात पुढील अन्य मोनॅडनॉक आहेत. मौंट मूसीलोके (उंची १,४६६ मी.), मौंट कार्डिगन (९५१ मी.), मौंट कीरसार्गे (८९५ मी.) व सुनापी मौंटन (८३६ मी.). हा प्रदेश सुटीतील पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. मोनॅडनॉक स्टेट पार्कमध्ये सहलीसाठी असणाऱ्या तंबूसारख्या सुविधा आहेत. अमेरिकेच्या जॉर्जिया राज्यातील स्टोन मौंटन हेही अवशिष्ट शैलाचे परिचित उदाहरण आहे. भारतात आंध्र प्रदेशात याची काही उदाहरणे आहेत.

समीक्षक – वसंत चौधरी

प्रतिक्रिया व्यक्त करा