एरिक द रेड (Erik the Red) : (इ. स. ९५०? — १००३?). ग्रीनलंडचा शोध लावून तेथे वसाहत करणारा नॉर्वेजियन व्हायकिंग समन्वेशक. मूळ नाव एरिक थॉरव्हालसन, परंतु लाल रंगांच्या केसांमुळे त्यांना एरिक द रेड या नावाने ओळखले जाऊ लागले. त्यांचा जन्म दक्षिण नॉर्वेमधील रोगालँड येथे झाला. मनुष्यवध केल्यामुळे त्यांच्या वडिलांना हद्दपार करण्यात आले होते. त्यामुळे लहानपणीच एरिक हे वडिलांबरोबर ड्रँगा (आइसलँड) येथे राहायला गेले. तेथेच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर तेथे अनेक लोकांशी झालेल्या भांडणांमुळे एरिक यांना ९८२ मध्ये आइसलँडमधून तीन वर्षांकरिता हद्दपार करण्यात आले. पश्चिमेकडे अज्ञात मुलूख आहे, अशा कथांवर विश्वास ठेवून त्यांनी भूमिचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला व ९८२ ते ९८५ या कालावधित ते पश्चिमेकडे गेले. या काळात त्यांनी ग्रीनलंडच्या दक्षिण व पश्चिम किनाऱ्यांचे समन्वेषण केले. त्यानंतर ते आइसलँडला परतले. या भूमीवर हिरवी कुरणे असल्यामुळे, तसेच या भूमिकडे लोक आकृष्ट व्हावे म्हणून त्यांनी तीला ‘ग्रीनलंड’ हे नाव दिले व या नव्या मुलुखाची लोकांना माहिती दिली.

इसवी सन ९८५ – ८६च्या सुमारास २५ गलबते आणि सुमारे ५०० लोक घेऊन त्यांनी वसाहतीच्या दृष्टीने ग्रीनलंडकडे पुन्हा पलायन केले; मात्र फक्त १४ गलबते आणि सुमारे ४५० लोकच ग्रीनलंडच्या किनाऱ्यावर पोहोचले. येथील सध्याच्या यूल्यानहॉप आणि गॉट्हॉप येथे त्यांनी वसाहती केल्या. नैर्ऋत्य किनाऱ्यावरील ‘ईस्टर्न सेटल्मेंट’ (पुढे ईस्टर्न कॉलनी म्हणून प्रसिद्ध) व त्याच्या उत्तरेस सुमारे ४८० किमीवर ‘वेस्टर्न सेटल्मेंट’ अशा दोन वसाहती त्यांनी स्थापन केल्या. एरिक मात्र ईस्टर्न सेटल्मेंटध्येच राहिले. ते दोन्ही वसाहतींचे प्रमुख होते. या वसाहतीतील लोकांनी शेती, गुरेपालन, मेंढीपालन, शिकार इत्यादी व्यवसाय येथे वाढविला. एरिक यांच्या पत्नी थाजोदिल्द यांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला व येथे एक चर्च बांधले. पुढे १००० च्या सुमारास ग्रीनलंडच्या पश्चिमेस आणखी भूभाग शोधण्याची मोहीम एरिक यांनी आखली; परंतु गलबताकडे जाताना घोड्यावरून पडल्याने अपशकून समजून त्यांनी ती रद्द केली. अखेर ग्रीनलंडमध्येच त्यांचे निधन झाले.

एरिक यांच्या नेतृत्वाखालील ग्रीनलंडच्या वसाहतीबाबत आणि त्यांचा मुलगा लेव्ह एरिकसन यांनी लावलेला उत्तर अमेरिकेचा शोध या प्रमुख घटनांची वर्णने आइसलँडच्या ‘सागा’ (सागा-वीरगाथा-ऑफ एरिक) या साहित्यप्रकारात विस्तृतपणे मिळतात. पुढे पुढे ईस्टर्न कॉलनीची वर्णने हळूहळू नाहिशी होत गेली. ग्रीनलंडमधील नॉर्स लोकांच्या वसाहती मात्र वाढत गेल्या आणि त्यांचा पंधराव्या शतकापर्यंत नॉर्वेशी संपर्कही होता; परंतु नैसर्गिक आपत्ती, अपपोषण, आपापसातील विवाह इत्यादी कारणांमुळे वसाहतींना अवकळा येऊन पुढे सुमारे १०० वर्षे त्यांचे यूरोपशी दळणवळणही तुटले.

समीक्षक – अविनाश पंडित

प्रतिक्रिया व्यक्त करा