पार्श्वभूमी : अफगाणिस्तानच्या पातशाहाने संपूर्ण अफगाणिस्तान आपल्या आधिपत्याखाली आणल्यावर मुघल सत्तेवर स्वारी करण्याचे त्याने ठरविले आणि अफाट सैन्य घेऊन १७६० साली तो खैबर खिंडीतून पेशावरमार्गे पंजाब प्रांत पार करून दिल्लीवर चालून आला. मुघलांनी मराठ्यांची मदत मागितली आणि मराठ्यांनी मदतीसाठी आपले सैन्य सदाशिवरावभाऊंच्या आधिपत्याखाली दिल्लीला रवाना केले.

सदाशिवरावभाऊ १४ मार्च १७६० ला परतूडहून निघून पेशव्यांच्या नेतृत्वाखालील मराठा जंगी फौज मजलदरमजल करीत २ ऑगस्टला दिल्लीत पोहचली. आग्र्याला यमुना पार करून अहमदशहा अब्दालीशी अंतर्वेदीमध्ये (गंगा-यमुनामधील दुआबाचा प्रदेश) सामना करण्याचा भाऊंचा बेत दुथडी भरून वाहणाऱ्या नदीमुळे तडीस जाऊ शकला नाही. मग सप्टेंबर १७६० अखेरीस मराठ्यांनी पानिपतमध्ये मोर्चाबंदी केली. १६ ऑक्टोबरला कुंजपुरा किल्ल्यावर धाड घालून अब्दालीची रसद त्यांनी लुटल्यावर तो बिथरला. २४ ते २६ ऑक्टोबरदरम्यान मराठ्यांच्या नकळत बांधपत येथे त्याच्या सैन्याने यमुना ओलांडली आणि मराठ्यांच्या दक्षिणेला त्याने मोर्चाबंदी केली. मग अब्दालीने पद्धतशीरपणे अगडबंब मराठा फौजेची रसद आटवली. यमुना पार करण्याची धूर्त चाल आणि रसद गोठवण्याचे डावपेच यांमुळे सदाशिवरावभाऊ कोंडीत सापडले आणि उपासमारीला कंटाळून १३ जानेवारी १७६१ रोजी त्यांनी ही कोंडी फोडण्यासाठी चढाई करण्याचे ठरवले. १४ जानेवारी २०१४ हा महाराष्ट्राच्या इतिहासातील काळा दिवस ठरला.

व्यूहरचना आणि रणनीती : दोन्ही बाजूंचे सेनाबळ बऱ्याच प्रमाणात समसमान होते. दोन्ही सेनांचे घोडदळ ४० हजारांच्या घरात होते. मराठ्यांच्या ३०–३५ हजार पायदळासमोर अफगाणी पायदळ ५०–५५ हजारांच्या घरात होते. मराठ्यांच्या २०० फ्रेंच बनावटीच्या तोफा, उंटावरील सुतरनाळा, जेजाला, जंबुरके या तोफा आणि इब्राहिमखान गार्दीसारखा अनुभवी तोपची यांमुळे त्यांचा तोफखाना संख्येत आणि आधुनिकतेत दुराण्यांपेक्षा उजवा होता. ती कमतरता भरून काढण्यासाठी अब्दालीने उंटावरील हलक्या आणि फिरत्या अशा एक हजार तोफा उभ्या केल्या होत्या. या तोफा त्यांच्या गतिमानशीलतेमुळे प्रभावी ठरल्या. अब्दालीच्या सैन्यात अफगाणिस्तानी आणि हिंदुस्तानी गिलचे समप्रमाणात होते.

पश्चिमेस पानिपत भोवतालचा खंदक आणि पूर्वेस यमुना यांच्या दरम्यान मराठा सैन्य पश्चिम-पूर्व सरळ रेषेत तैनात होते. पश्चिमेस होळकर व शिंद्यांच्या तुकड्या, मध्यभागी भाऊसाहेब आणि विश्वासराव यांची शाही हुजरात. त्यांच्यालगत विठ्ठल शिवदेव, दमाजी गायकवाड, विंचूरकर आणि अंताजी माणकेश्वर यांच्या तुकड्या आणि इब्राहिमखान गार्दी यांची तुकडी पूर्वेच्या कोपऱ्यात होती. भाऊंच्या मागे समशेर बहाद्दूर, यशवंतराव पवार, सटबोजी जाधव, नाना पुरंदरे यांचे दस्ते होते. दुर्दैवाने भाऊंनी राखीव अशी कोणतीही तुकडी पिछाडीस ठेवली नव्हती. ही एक चूक ठरली.

अब्दालीने मराठ्यांच्या फळीच्या रचनेचे सूक्ष्मपणे निरीक्षण केल्यानंतर आपल्या सैन्याची रचना तिरकस रेषेत केली. अब्दालीचा हिंदुस्तानी गिलच्यांवर पूर्ण विश्वास नसावा, म्हणूनच दोन्ही कडांस अफगाणिस्तानातील तुकड्या उभ्या केल्या होत्या. शहापसंद पश्चिमेस, त्यानंतर नजीब व शुजाउद्दैलाच्या तुकड्या, मध्यभागी त्याचा सेनापती शहावलीचा कणा, त्याच्या पूर्वेस बूंदेखान, सदुल्ला या रोहिल्यांच्या तुकड्या आणि सर्वांत पूर्वेस बरखुरदार आणि अमीरबेग यांची अफगाणी फौज. या सर्वांच्या पिछाडीस दक्षिणेला काही अंतरावर अब्दालीची पंधरा हजार राखीव किजलबाजांची तुकडी योग्य वेळी आणि ठिकाणी युद्धाचे पारडे फिरवण्यासाठी सज्ज होती. सर्वांत लक्षणीय बाब म्हणजे भाऊंसारखा अब्दाली आघाडीवर नव्हता. शहावलीवर आघाडीच्या लढाईची जबाबदारी सोपवून तो ऐन आणीबाणीच्या वेळी महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी पिछाडीला उंचावरील मोक्याच्या ठिकाणाहून लढाईचे निरीक्षण वा मार्गदर्शन करणार होता. त्यासाठी अब्दालीकडे दुर्बीण होती, जी मराठ्यांकडे नव्हती. राखीव तुकडीची योजना वा अब्दालीचा रणधुमाळीपासून बचाव हे दोन्ही अखेरीस युद्धविजयी घटक ठरले.

भाऊंनी इब्राहिमखान गार्दीच्या सल्ल्यानुसार ‘गोलाईच्या लढाई’ ची रणनीती अनुसरण्याचे ठरवले होते. पुढे तोफखाना, मग बंदूकची, मागे, पुढे, बाजूला सैनिक आणि मध्यभागी बाजारबुणगे यांनी पुढे सरकत जायचे, ही त्यामागची कल्पना, इब्राहिम गार्दीची आपल्या तोफखान्यावर अढळ श्रद्धा होती आणि त्याच्या इमानावर भाऊंचा गाढ विश्वास होता. सर्व फळ्या शाबूत ठेऊन प्रथम शत्रूसैन्याला बलवत्तर तोफखान्याने भाजून काढण्याचा मुख्य हेतू होता. शिंदे-होळकर मात्र या रणनीतीविरुद्ध होते.

निर्णायक लढाई : १४ जानेवारीच्या सकाळी ९ वाजता मराठ्यांनी सर्व संकटे आणि ओढाताण विसरून अहमहमिकेने आणि निकराने लढाईला आरंभ केला. दोन्ही बाजूंनी जोरदार तोफमारा झाला. गार्दीने बरखुरदारखानाच्या आघाडीस खिंडार पाडले. इब्राहिमखान पुढे सरकणार, तेवढ्यात गोल सोडून दमाजी गायकवाड, विठ्ठल शिवदेव पुढे धावले. बिन बंदुकीचे घोडेस्वार पाहून माघारी जाणाऱ्या रोहिल्यांनी त्यांच्यावर गोळ्यांचा वर्षाव केला. रोहिल्यांच्या बंदुकांचा मारा खाल्ल्यानंतर ते परतले. पण, त्यांच्या पुढे धावण्यामुळे इब्रहिमखानाचा तोफखाना मारा करू शकला नाही. त्याच वेळी भाऊसाहेबांच्या हुजराती तुकडीने शाहवलीला मागे रेटले. त्यामुळे गिलच्यांच्या गोटात निराशेची लाट पसरली. शिंदे-होळकरांच्या तुकड्यांना मात्र नजीबने तटवले होते. बारा-एक वाजेपर्यंत मराठ्यांची सरशी स्पष्ट दिसत होती. अब्दालीने परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी किजलबाजांची राखीव तुकडी पुढे धाडली आणि अचानक पारडे पलटू लागले. सूर्य दक्षिणायनात  असल्याने भर दुपारी उत्तरेकडून दक्षिणेकडे चाल करून जाणाऱ्या घोड्यांच्या डोळ्यांत सूर्यकिरणे पडू लागली आणि ते बुजू लागले. उपासमारीने रोडावलेले आणि थकलेले घोडे व स्वार जागीच कोसळू लागले. याच वेळी विंचूरकरांनी कुंजपुऱ्यातील लढाई दरम्यान आश्रय दिलेल्या आणि त्यांच्या बाजूने लढणाऱ्या पठाणांनी आपले भगवे फेटे फेकून उठाव केला. दुर्दैवाने ‘दिलपाक’ घोड्यावर बसून लढणाऱ्या विश्वासरावला दुपारी दोनच्या सुमारास गोळी लागली. त्यांचे प्रेत अंबारीत ठेवण्यात आले. ते पाहून मराठा सैन्यांत पळापळ सुरू झाली. हे लढाईचे महत्त्वाचे वळण ठरले. मल्हारराव होळकर, त्यांचा दिवाण गंगोजी चंद्रचूड, साबाजी शिंदे, खानजी जाधव, जानराव वाबळे यांनी मिळेल त्या फटींतून दक्षिणेकडे पळ काढला. भाऊंनी निकराचे युद्ध केले. जीव वाचवण्याचा सल्ला झुगारून ते लढत राहिले आणि धारातीर्थी पडले. चार वाजेपर्यंत दारूण पराभवानंतर मराठा सैन्य असे राहिलेच नाही. त्यानंतर कुंजपुऱ्याच्या सुडाची आग पेटली आणि सर्वत्र निर्घृण कत्तल सुरू झाली. बुणगे, यात्रेकरू कोणीच वाचले नाहीत. स्त्रियांची प्रचंड विटंबना झाली. पंच्याहत्तर हजार मराठे मारले गेले. वीस हजार गुलाम झाले. अब्दालीचे पस्तीस हजार गिलचे कामी आले.

युद्धतत्त्वांचे निकष :

युद्धशास्त्रात युद्धाची दहा तत्त्वे आहेत. पानिपतच्या लढाईचे या निकषांवर परीक्षण करणे स्वारस्यपूर्ण आहे.

  • उद्दिष्टांची निवड आणि त्याचा सातत्याने पाठपुरावा : मराठ्यांचा उत्तरेतून नायनाट करायचा, हे त्याचे उद्दिष्ट. जिहादची घोषणा करून त्याने अब्दालीला लढाईच्या भरीस घातले आणि आपले उद्दिष्ट तडीस नेले.
  • सुरक्षितता : युद्धक्षेत्र, सैन्यदल आणि रसद मार्गांची सुरक्षितता साधणे आवश्यक असते. मराठा सैन्याचा याबाबतीतील हलगर्जीपणा त्यांना भोवला.
  • इच्छाशक्तीचे जतन : सुरुवातीचा विजय मराठ्यांच्या लढाऊ वृत्तीचा द्योतक होता; परंतु सैन्याची लढाऊ वृत्ती आणि इच्छाशक्ती क्षीण होत गेली.
  • विस्मय आणि आश्चर्य :  मराठ्यांच्या नकळत यमुना ओलांडून अब्दालीने मराठ्यांना विस्मयचकित केले.
  • सैन्यशक्तीचे एकवटीकरण : आपली शक्ती वेगवेगळ्या जागी विभाजित न करता एकाच जागी केंद्रित करून शत्रूवर घणाघाती आघात करणे, हा सेनापतीचा प्रयत्न असला पाहिजे. गोलाईच्या लढाईचे हेच उद्दिष्ट होते; परंतु मराठ्यांमधील मतभेदांमुळे ते तडीस जाऊ शकले नाही.
  • सैन्यादलाचा वाजवी वापर : योग्य वेळी, योग्य ठिकाणी आणि उद्दिष्टासाठी सैन्यबल तैनात करणे हा सेनापतीच्या प्राविण्याचा भाग आहे. धूर्त व्यूहरचना, मोक्याच्या ठिकाणी घणाघात आणि राखीव दलाची योजना यांकरवी हे साधता येते. मराठे यात कमी पडले.
  • लवचिकता :  बदलत्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी युद्धयोजनेत लवचिकता हवी. यासाठी सेनापतीने स्वतःला हातघाईच्या लढाईपासून दूर ठेवले पाहिजे. त्याबरोबरच हाताबाहेर जाणाऱ्या परिस्थितीला आटोक्यात आणण्यासाठी किंवा अचानक मिळालेल्या संधीचा फायदा घेण्यासाठी सेनापतीने राखीव दल हाताशी ठेवले पाहिजे. दुपारी बारा वाजेपर्यंत होणाऱ्या सरशीचे विजयात रूपांतर करण्यासाठी भाऊंजवळ राखीव दल नव्हते. तसेच, शत्रूशी दोन हात करण्याच्या नाहक कामात आणि स्वतःला गुंतवून घेतले होते.
  • सहकार्य : सैन्याच्या वेगवेगळ्या अंगांनी आणि तुकड्यांनी एकमेकांस पूरकता प्रदान करून परिणामकारकतेला पुष्टी दिली पाहिजे. मराठ्यांजवळ सरस तोफखाना असूनही त्याचा ते उपयोग करू शकले नाहीत. होळकर-शिंदे यांच्या मतभेदांमुळे मराठा सैन्याच्या एकजीवतेवर परिणाम झाला.
  • व्यवस्थापन : मराठी सैन्याचा बंदोबस्त दोषपूर्ण होता आणि ही त्रुटी जीवघेणी ठरली. अनावश्यक बुणगे आणि यात्रेकरूंचे लोढणे, लढाई संपेपावेतो त्यांची देखभाल करण्याच्या सूरजमलच्या सूचनेचा भाऊंकडून अव्हेर आणि आपली रसदीची कोंडी करू देण्यात मराठ्यांची हलगर्जी हे त्यांच्या निर्णायक पराजयाचे प्रमुख आणि कदाचित एकमेव कारण होते.
  • नेतृत्व :  अब्दालीकडे लढायांचा मोठा अनुभव होता. भाऊ त्याआधी फक्त उद्गीरची लढाई जिंकले होते. त्यांच्या व्यक्तिगत शौर्याबद्दल तसूभर संदेह नसला आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी लढा दिला असला, तरी मध्यान्हीपर्यंत मिळालेल्या सरशीचे विजयात रूपांतर करण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रतिभेत ते अब्दालीपेक्षा डावे ठरले. भाऊंनी जानेवारी १७६१ पर्यंत न थांबता नोव्हेंबर १७६० मध्येच हल्ला चढवण्याचा निर्णय घेतला, तर  कदाचित ताज्यातवान्या सैन्याकरवी ते अब्दालीला नमवू शकले असते.

उपसंहार : मराठे मातृभूमीच्या रक्षणासाठी लढले. १८ व्या शतकातील ही जगातील सर्वांत मोठी लढाई होती. त्यानंतर खैबरखिंडीतून आक्रमण झाले नाही. १७७८ ते १८०३ पर्यंत मराठी झेंडा दिल्लीच्या किल्ल्यावर फडकला. खुद्द अब्दालीने मराठ्यांना परत मुघल सल्तनतीचे संरक्षक म्हणून पाचारण केले.

संदर्भ :

  • Pitre, K. G. War History of the Marathas : 1600–1818, 1998.
  • पाटील,  विश्वास, पानिपत, पुणे, १९८८.
  •  सरदेसाई, गो. स. मराठी रियासत खंड ४ : पेशवा बाळाजीराव, मुंबई, २०१२.

प्रतिक्रिया व्यक्त करा