अक्वायनस, सेंट थॉमस : (१२२४/२५—७ मार्च १२७४). मध्ययुगीन कालखंडातील एक धर्मशास्त्रज्ञ आणि राजकीय तत्त्ववेत्ता. त्याने स्थापन केलेला तात्त्विक प्रवाह ‘थॉमिझम’ या नावाने प्रसिद्ध आहे. हा सत्यप्रिय असा ‘एन्जलिक डॉक्टर’ त्याच्या शुद्ध चारित्र्य आणि विचारसरणीसाठी ओळखला जातो. त्याने त्याचे संपूर्ण जीवन अध्ययन आणि अध्यापन यांना वाहिलेले होते. मुळातच संतप्रवृत्तीच्या थॉमस अक्वायनस याचे विचार ईश्वरभक्ती आणि आध्यात्मिक प्रेरणेने झपाटलेले होते.

त्याचा जन्म इटलीतील नेपल्सजवळच्या रॉक्कासेक्का येथील किल्ल्यात एका कुलीन आणि काउंट घराण्यात झाला. त्याचे वडील ॲक्विनोचे काउंट होते. त्याचे प्राथमिक शिक्षण माउंट कासिनोच्या बेनेडीक्शन ॲबे येथे आणि १२३० ते १२३९ या कालखंडात पॅरिस येथे झाले. त्यानंतर वयाच्या चौदाव्या वर्षी नेपल्स विद्यापीठात प्रवेश घेतला व १२४४ मध्ये डोमिनिकन फ्रायरच्या संघटनेत तो दाखल झाला. हे त्याच्या घरी पसंत नव्हते. त्याच्या भावांनी रस्त्यात गाठून त्याला तुरुंगात डांबले. पण तरीही त्याने खंबीरपणे, आपला निश्चय ढळू न देता, एका वर्षाने १२४५ मध्ये पॅरिसला परतून आपले विद्याध्ययन सुरू ठेवले. त्याचे गुरू ॲल्बर्ट दि ग्रेट यांचा त्याच्या विचारांवर खूप प्रभाव होता. आपल्या गुरूसोबत क्लोन या ठिकाणी १२५२ पर्यंत राहून त्याने पुष्कळ ज्ञान आणि पांडित्य संपादन केले. सन १२७४ मध्ये पोप ग्रेगरी दहावा याने अक्वायनसला काउन्सिलमध्ये सहभाग घेण्यासाठी लिऑन्स येथे निमंत्रित केले होते. त्या बैठकीला जात असताना वाटेतच इटलीतील फोसानोव्हाच्या मठात त्याचे निधन झाले. १८ जुलै १३२३ रोजी पोप जॉन यांच्याकडून ‘संत’ म्हणून त्याचा गौरव झाला. त्याचे तत्त्वज्ञान कॅथॉलिक चर्चचे अधिकृत तत्त्वज्ञान म्हणून मान्य झाले. ‘थॉमिझम’ हे कॅथॉलिकवादाचे मूळ तत्त्वज्ञान मानले जाते. अक्वायनसने विपुल लेखन केले. त्याच्या अधिकृत लिखाणाच्या यादीत १०५ ग्रंथांचा समावेश आहे. त्यात बायबलवरील भाष्ये, प्रवचने, ईश्वरशास्त्रावरील लघुप्रबंध आणि लेख यांचा समावेश आहे.

कार्य : आपल्या विचारांची तर्कशुद्ध आणि सुसूत्र मांडणी करण्याची उपजत क्षमता अक्वायनसकडे असल्याने, ख्रिस्ती धर्मतत्त्वांची मांडणी त्याने ॲरिस्टॉटलच्या तर्कपद्धतीने केली. १२५२ मध्ये पॅरिसला परतल्यावर त्याने धर्मग्रंथांवर आधारित व्याख्याने द्यायला सुरुवात केली. १२५६ ला ईश्वरशास्त्राविषयी अधिकृत रीत्या व्याख्यान देण्याची परवानगी मिळाली. त्याच वर्षी तो मॅजिस्टर होऊन १२६७ पर्यंत त्याने डोमिनिकन प्रोफेसर म्हणून काम केले.

तत्त्वज्ञान : ईश्वरवाद (Theology) : अक्वायनसची विचारसरणी संश्लेषक स्वरूपाची आहे. इ.स. अकराव्या-बाराव्या शतकातील कालखंड हा स्कोलॅस्टिकवाद्यांच्या विचारांनी भारलेला कालखंड होता. त्याचे तत्त्वज्ञान संश्लेषक स्वरूपाचे ठरले; कारण ॲरिस्टॉटल, प्लेटो, ग्रीक मठाधिकारी, प्लॉटिनस, ऑगस्टीन, डायनिसियस यांच्या सिद्धांतांतील मौलिक घटक त्याने ईश्वराने प्रकट केलेल्या सत्याभोवती एकत्र आणले. स्कोलॅस्टिकवाद या बौद्धिक आणि वैचारिक मोहिमेअंतर्गत त्याच्या तत्त्वज्ञानाची उच्चतम पातळी दिसून येते. त्यामुळेच तो ईश्वरनिष्ठ तत्त्वज्ञ मानला जातो. ‘थिऑलॉजी’ म्हणजे पाश्चात्त्य ईश्वरशास्त्र किंवा ईश्वरवाद. म्हणजेच ख्रिस्ताच्या शिकवणुकीचे आणि उपदेशांचे समर्थन व स्पष्टीकरण करणारे शास्त्र. परंतु अक्वायनसच्या मते तत्त्वज्ञान जरी उच्च शास्त्र असले, तरी ते ईश्वरशास्त्रापासून विलग राहिले पाहिजे. ईश्वराचे अस्तित्व, आत्म्याचे अमरत्व आणि ईश्वराचा जगाशी असणारा संबंध यांसारखे प्रश्न ईश्वरवादाशी निगडित असले, तरीही बौद्धिक रीत्या त्यांची उत्तरे मिळवता येतात. त्याच्या मते तत्त्वज्ञान आणि ईश्वरवादात एक सुसंवाद असतो. ईश्वरवाद हा ख्रिस्ताच्या वचनांवर आधारित आहे आणि इतर बौद्धिक शास्त्रे वैचारिक व बौद्धिक कसोट्यांच्या निकषांवर आधारित आहेत. पण त्याच्या या ईश्वरप्रेमाच्या गूढ अनुभूतीचा आपल्या बौद्धिक लेखनावर परिणाम न होऊ देण्याची दक्षता घेतली.

त्याच्या मते विश्वास आणि हेतू यांच्यात आवश्यक संघर्ष नाही. विश्वास देवापासून सुरू होतो आणि जगाकडे जातो. उलटपक्षी, हेतू अनुभवजन्य जगापासून सुरू होतो आणि देवाकडे वाटचाल करतो. म्हणूनच विश्वास किंवा पवित्र शास्त्रवचनास पूरक आहे. जगाच्या अनुभवाच्या आधारे त्याने निर्माणकर्त्या देवाचे अस्तित्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. धर्म आणि तत्त्वज्ञान या दोघांचेही जगाकडे पाहण्याचे दृष्टीकोन भिन्न आहेत. अक्वायनसने ईश्वरशास्त्र आणि तत्त्वज्ञान यांतील भेद स्पष्ट केला. ईश्वरशास्त्र देवाचे शाश्वत अस्तित्व आहे आणि तोच या विश्वाचा निर्माता आणि उद्धर्ता आहे असा विश्वास ठेवून विश्वाचे ज्ञान प्राप्त करते. तत्त्वज्ञानाची सुरुवात जगाच्या ज्ञानाने होते, जग जाणून घेण्यामागे तत्त्वज्ञान, तर्क आणि विश्लेषणाचा उपयोग करते. तत्त्वज्ञांसाठी हेतू महत्त्वाचा आणि ईश्वरवाद्यांसाठी विश्वास महत्त्वाचा. या दोघांमध्ये जरी भिन्नता असली, तरी ते परस्परविरोधी नाहीत. विश्वास आणि हेतू एकमेकांना विरोध करण्याऐवजी पूरक आहेत.

प्रमाणमीमांसा (Epistemology) : अक्वायनसच्या मते इंद्रियसंवेदनांपासून बौद्धिक ज्ञान प्राप्त होते. ज्ञानेंद्रियांना जाणवणाऱ्या संवेदनांना आकार देऊन संघटित करण्याचे सामर्थ्य जरी बुद्धीत असले, तरीही तिच्यात उपजत कल्पना नसतात. परंतु बुद्धी संकल्पनांचे सामान्यीकरण करत असते. त्याच्या मते ज्ञान हे संकल्पनात्मक असते.

तत्त्वमीमांसा (Metaphysics) : अक्वायनसच्या मते प्रत्येक पदार्थ हा जड (Matter) आणि आकार (Form) यांचा संयोग असतो.

सत्ताशास्त्र (Ontology) : हे सत् च्या अनुभवाचे शास्त्र आहे. त्यामुळे सत् च्या अनुभवाचे विवेचन अक्वायनस करतो. सत्ताशास्त्रावरील आपले विचार प्रकट करताना अक्वायनसने सेंट ऑगस्टीन आणि देकार्त यांच्या विचारांना छेद दिला आहे. देकार्तने ‘I think therefore, I am’ (मी विचार करतो) अशी प्रतिज्ञा केली. परंतु अक्वायनसच्या मते देकार्तची ही प्रतिज्ञा म्हणजे सत् चा मूर्त अनुभव नसून त्या अनुभवापासून वेगळा एक घटक आहे. त्यामुळे तिच्या विमर्षणाने सत् विषयीचे ज्ञान प्राप्त होणार नाही. सत् चा आविष्कार म्हणजे कोणत्याही पदार्थाच्या ज्ञानेंद्रियांवरील क्रियेला मिळालेली प्रतिक्रिया होय. म्हणूनच जीवाचे अस्तित्व क्रिया प्रकट करते.

राजकीय तत्त्वज्ञान (Political Philosophy) : अक्वायनस हा राजकीय तत्त्वज्ञ म्हणूनही प्रसिद्ध आहे. ॲरिस्टॉटलच्या सत्ताशास्त्रात सांगितल्याप्रमाणे त्याने या विश्वाचा अर्थ ते ईश्वराचे प्रकटन आहे अशा रीतीने केला. तसेच शासनव्यवस्थेविषयी जो विचार मांडला, त्यावर ऑगस्टीन आणि ॲरिस्टॉटल यांच्या तत्त्वांचे मिश्रण दिसून येते. मनुष्य हा सामाजिक प्राणी असल्याने त्याला समाजात राहणे आवडते आणि अशा समाजात शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करणे, हेच अंतिम ध्येय असावे. घटनेच्या कायद्यांप्रमाणे राज्यकारभार चालवला पाहिजे; कारण त्याच्या मते राजकीय व्यवस्था ही दैवी व्यवस्थेचाच एक भाग आहे. ॲरिस्टॉटलच्या राजकीय तत्त्वज्ञानातील मध्यवर्ती संकल्पनांचा प्रभाव अक्वायनसच्या विचारांवर दिसून येतो.

संदर्भ :

  • McLean, Iain; McMillan, Alistair, Ed. The Concise Oxford Dictionary of Politics, New York, 2009.
  • जोशी, ग. ना. पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचा इतिहास, खंड पहिला, पुणे, १९७५.
  • दीक्षित, श्री. ह. भारतीय तत्त्वज्ञान, कोल्हापूर, २०१४.
  • वाडेकर, देविदास दत्तात्रय, संपा., मराठी तत्त्वज्ञान महाकोश, खंड पहिला, पुणे, १९७४.

                                                                                                                                                                     समीक्षक : हिमानी चौकर