सिंग, मेजर पिरु : (२० मे १९१८–१८ जुलै १९४८). एक पराक्रमी भारतीय सैनिक व परमवीरचक्राचे मानकरी. त्यांचा जन्म लष्करी परंपरा लाभलेल्या राजपूत शेतकरी कुटुंबात रामपुरा बेरी (राजस्थान) या खेड्यात झाला. बेरीच्या शाळेत त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतले; परंतु शिक्षण अर्धवट सोडून ते वडिलांना शेतीच्या कामात मदत करू लागले. बालपणी त्यांना खेळाची आणि शिकारीची आवड होती.

सुरुवातीपासून त्यांनी सैन्यात भरती होण्याचा ध्यास घेतला होता; तथापि वय कमी असल्यामुळे त्यांना दोनदा प्रवेश नाकारण्यात आला. अखेर वयाच्या अठराव्या वर्षी त्यांची राजपुताना रायफल्स क्रमांक सहाच्या पलटणीत (Battalion) निवड झाली (२० मे १९३६) आणि १०/१ झेलम (पंजाब) येथे त्यांची नियुक्ती करण्यात आली. एक वर्षाच्या लष्करी प्रशिक्षणानंतर त्यांची ५/१ पंजाबमध्ये नेमणूक झाली. सैन्यदलात शिक्षणावर विशेष परिश्रम घेऊन त्यांनी ‘इंडियन आर्मी फर्स्ट क्लास सर्टिफिकेट ऑफ एज्युकेशन’ आणि इतर परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण केल्या. पुढे त्यांना लान्सनाईक म्हणून पदोन्नती मिळाली (७ ऑगस्ट १९४०). वायव्य सरहद्द प्रांतामध्ये (North West Frontier) त्यांची बटालियन तैनात झाली. तेथे त्यांना प्रत्यक्ष युद्धाचा अनुभव मिळाला. सप्टेंबर १९४१ मध्ये त्यांची ‘पंजाब रेजिमेंट सेंटर’मध्ये झेलम येथे इन्स्ट्रक्टर म्हणून नेमणूक करण्यात आली. ते कुशल खेळाडू होते. हॉकी, बास्केटबॉल आणि क्रॉसकंट्री हे खेळ ते आपल्या रेजिमेंटतर्फे खेळत असत. मे १९४५ मध्ये त्यांना कंपनी हवालदार मेजर म्हणून पदोन्नती मिळाली; परंतु ऑक्टोबर १९४५ मध्ये त्या पदावर ते रुजू झाले. दुसऱ्या महायुद्धानंतर एप्रिल १९४६ च्या सुमारास त्यांना ‘कॉमनवेल्थ ऑक्युपेशन फोर्सेस’च्या सेवेत घेण्यात आले आणि त्याकरिता ते जपानला गेले. तेथे ते सप्टेंबर १९४७ पर्यंत कार्यरत होते.

याच सुमारास देशाची फाळणी होऊन जम्मू-काश्मीरमध्ये विद्वेषाचा उद्रेक झाला आणि पाकिस्तानने छुपे युद्ध पुकारले. पिरू सिंग आणि त्यांच्या बटालियनच्या सैनिकांना विमानाने काश्मीरखोऱ्यात आणले. त्यांच्यावर घुसखोरांना हुसकावून लावण्याची कामगिरी सोपविली होती. १९४८ च्या उन्हाळ्यात झालेल्या लढाई मध्ये पिरू सिंगांनी पिरकंठी व लेडीगली ही ठाणी काबीज करताना महत्त्वपूर्ण कामगिरी केली होती. म्हणून त्यांची दारापरी या सु. ३३६ मी. उंच ठाण्यावर पुढील लष्करी कारवाया करण्यासाठी निवड करण्यात आली होती. त्यांना कळविले की, हेरखात्याच्या अहवालानुसार शत्रूला मोर्चेबांधणीसाठी पुरेसा वेळ मिळालेला नाही; त्यामुळे चपळाईने हल्ला करून शत्रूला त्या भागातून हुसकावून लावणे शक्य आहे; परंतु ही माहिती विश्वसनीय नव्हती. त्या ठिकाणी शत्रूने मोर्चेबांधणी करून आपले पाय घट्ट रोवले होते. कमांडिंग ऑफिसरने १७ जुलै १९४८ रोजी हल्ला करण्याचा आदेश दिला. दारापरीला जाण्याचा रस्ता अरुंद व अडचणीचा होता. त्यामुळे हल्ल्याची व्यूहरचना करता येईना. कंपनी हवालदार पिरू सिंगांची पलटण पुढच्या फळीत जिथे शत्रूसैन्य दबा धरून बसले होते, तिथेच पोहोचली. साहजिकच त्यांच्यावर गोळ्यांचा भडिमार झाला. पलटणीचे कमांडर सुभेदार भिका सिंग कामी आले, तेव्हा पिरू सिंगांनी पलटणीची सूत्रे हाती घेतली. खंदकात दडून बसलेल्या शत्रुसैन्याने त्यांच्यावर बंदुका डागल्या होत्या.

या जीवघेण्या गोळीबारातून वाट काढीत पिरू सिंगांनी आपल्या सैन्याला पुढे रेटले आणि ज्या बाजूने हल्ला होण्याची दाट शक्यता होती, त्या बाजूने आपल्या मशीनगन रोवल्या. पलटणीच्या दोन्ही बाजूंनी गोळीबार चालू होता आणि खंदकात लपलेल्या शत्रुकडून हातबाँबचा वर्षाव चालू होता. पलटणीतील अर्धेअधिक जवान मारले गेले होते; तसेच काही जखमी झाले होते. अशा वेळी पिरू सिंग यत्किंचितही डगमगले नाहीत. त्यांनी खंदकामध्ये उडी घेऊन मशीनधारकाला व तिथल्या कर्मचाऱ्याला आपल्या संगिनीने भोसकून ठार केले. यामुळे मशीनगन थंडावली, आता ते एकटेच होते. त्याच वेळी शत्रुसैन्यातून आलेल्या हातबाँबने त्यांच्या चेहऱ्यावर मोठी दुखापत झाली. तशाही अवस्थेत ते खंदकातून बाहेर आले आणि शत्रूच्या दुसऱ्या खंदकावर झेपावले. तेथील दोन्ही तोफचालकांना त्यांनी संगिनीने कंठस्नान घातले आणि बाहेर येऊन तिसऱ्या खंदकांवर झेपावले. यावेळी त्यांच्या डोक्याला गोळी लागून ते त्या खंदकात कोसळले आणि त्यातच त्यांच्या प्राणाची आहुती पडली. त्यांच्या या अतुलनीय शौर्याबद्दल त्यांना मरणोत्तर परमवीरचक्र प्रदान करण्यात आले.

समीक्षक – सु. र. देशपांडे

प्रतिक्रिया व्यक्त करा