विवेकख्याति ही संज्ञा विवेक + ख्याति या दोन पदांनी मिळून बनली आहे. विवेक या शब्दाचा सामान्य अर्थ ‘दोन पदार्थांमधील भेदाचे ज्ञान’ असा होतो; परंतु, सांख्ययोग दर्शनांमध्ये विवेकख्याति ही पारिभाषिक संज्ञा ‘प्रकृती व पुरुष यांच्यातील भेदाचे ज्ञान’ या अर्थी वापरली जाते. साधकाला आपल्या खऱ्या स्वरूपाचा म्हणजेच चैतन्यस्वरूप पुरुषाचा (आत्म्याचा) बोध होणे आणि प्रकृतिपेक्षा पुरुष वेगळा आहे या भेदाचे ज्ञान होणे म्हणजे विवेकख्याति होय. यालाच पुरुष-ख्याति, अन्यता-ख्याति (पुरुष अन्य म्हणजे प्रकृतीपेक्षा वेगळा असल्याची ख्याति म्हणजे ज्ञान), सत्त्व (बुद्धी)–पुरुष-अन्यता-ख्याति, प्रसंख्यान (विशेष ज्ञान) इत्यादी वेगवेगळ्या संज्ञा आहेत.

विवेकख्यातीच्या प्राप्तीसाठी अष्टांगयोगाची साधना करावी असे पतंजलींनी म्हटले आहे (योगसूत्र २.२८). योगांगांच्या अनुष्ठानाने चित्तातील अशुद्धी दूर होते व ज्ञानाची प्राप्ती होते. साधकाचा विवेकख्यातीपर्यंत प्रवास होतो. विवेकख्यातीला हानोपाय म्हणजेच अविद्येचा नाश करण्याचा उपाय मानले आहे. द्रष्टा पुरुष हा केवळ चैतन्य असूनसुद्धा अविद्येच्या प्रभावाने बुद्धीशी तादात्म्य पावल्याने बुद्धी ज्या ज्या विषयांचे आकार (वृत्ती) धारण करेल, त्या त्या विषयांचे अनुभव स्वत: घेऊ लागतो. पुरुष आणि बुद्धी यांचा हा संयोग बंधनाला कारण होतो. हा संयोग जिच्यामुळे होतो, ती अविद्या दूर झाली तर हा संयोगही नष्ट होतो. अविद्या दूर करण्यासाठी विवेकख्याति आवश्यक आहे. ती अविप्लवा म्हणजे संशय, चुकीचे ज्ञान, भ्रम इत्यादी दोषांपासून मुक्त असली पाहिजे असे पतंजलींनी सांगितले आहे. विवेकाच्या साह्याने आत्मा व अनात्मा, द्रष्टा व दृश्य यांच्यातील भेदाचे ज्ञान अविरतपणे व्यावहारिक दशेतही जागे ठेवणे, त्याची प्रत्यक्ष प्रतीति येणे ही विवेकख्याति होय.

चैतन्यस्वरूप पुरुषाचे ज्ञान इंद्रियांद्वारे होऊ शकत नाही, कारण त्याचे स्वरूप सूक्ष्म आहे. त्यामुळे ते ज्ञान होण्यासाठी चित्ताला विशेष योग्यता प्राप्त करून घ्यावी लागते. पतंजलींनी चित्ताला ती योग्यता प्राप्त करण्यासाठीच्या साधनेचे टप्पे विशद केले आहेत. ते वितर्क – अनुगत संप्रज्ञात समाधी, विचार – अनुगत संप्रज्ञात समाधी, आनंद – अनुगत संप्रज्ञात समाधी आणि अस्मिता – अनुगत संप्रज्ञात समाधी असे आहेत. सुरुवातीला मूर्ती, सूर्य, चंद्र इत्यादी स्थूल विषयांवर म्हणजे महाभूतांनी बनलेल्या एखाद्या स्थूल अर्थात इंद्रिय ग्राह्य व दृश्य वस्तूंवर चित्त एकाग्र करावे (वितर्क – अनुगत संप्रज्ञात समाधी). नंतर शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या तन्मात्र आणि अन्य सूक्ष्म विषयांवर चित्त एकाग्र करावे (विचार अनुगत संप्रज्ञात समाधी), त्यानंतर पाच ज्ञानेंद्रिये, पाच कर्मेंद्रिये ही बाह्येंद्रिये आणि मन, अहंकार आणि बुद्धी (चित्त) यांपैकी कोणत्याही एका इंद्रियावर चित्त एकाग्र करावे (आनंद – अनुगत संप्रज्ञात समाधी). अंतिमत: चैतन्यस्वरूप पुरुषावर चित्त एकाग्र झाल्यावर ‘मी केवळ चैतन्य आहे’ असे ‘स्व’चे ज्ञान होते (अस्मिता-अनुगत संप्रज्ञात समाधी). अशा पद्धतीने स्थूल विषयापासून ध्यानाला सुरुवात करून सूक्ष्म विषयावर ध्यान करण्यास चित्ताला योग्य बनविता येते. अस्मितारूप संप्रज्ञात समाधी म्हणजेच विवेकख्याति होय. चैतन्यस्वरूप पुरुषाचे ज्ञान प्राप्त होण्याच्या प्रक्रियेमध्ये ऋतंभरा प्रज्ञा प्राप्त होते.

विवेकख्याति प्राप्त झालेल्या पुरुषाला सात प्रकारांची प्रज्ञा आपोआपच प्राप्त होते (योगसूत्र २.२७). त्या सात प्रकारच्या प्रज्ञा कोणत्या याविषयी महर्षि पतंजलींनी सूत्रात विवेचन केले नाही, परंतु भाष्यकार व्यासांनी त्यांचे स्पष्टीकरण केले आहे. व्यासांनी या सात प्रज्ञा म्हणजे पुढील सात गोष्टींचे ज्ञान असे सांगितले आहे — हेय (ज्याचा त्याग करणे उचित आहे ते दु:ख), हेय कारण नाश, निरोध समाधी, विवेकख्याति, बुद्धीची कृतार्थता (कार्यनिवृत्ती), त्रिगुणांचा प्रकृतीत लय आणि आत्म्याची विशुद्ध ज्योतिर्मय अवस्था. त्यांचे स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे — (१) ज्या हेयरूप दु:खाला जाणणे आवश्यक होते, ते मी जाणले. (२) दु:खाचे कारण जे क्लेश आहेत, त्यांचा क्षय झाला. (३) मी असंप्रज्ञात (निरोध) समाधीचा अनुभव घेतला. (४) मी विवेक-ख्यातिरूप ज्ञान प्राप्त केले. (५) पुरुषाला भोग आणि अपवर्ग (मोक्ष) प्रदान केल्यावर बुद्धीचे कार्य समाप्त झाले. (६) चित्तातील त्रिगुणांचे कार्य समाप्त झाले. (७) त्रिगुणांच्या पलीकडे असलेला मी केवळ चैतन्यरूप पुरुष आहे.

काही आधुनिक टीकाकारांनी या सात प्रज्ञांचा कुंडलिनी जागृतीसाठी प्राणशक्तीचा सहा चक्रातून प्रवास व अखेरीस सहस्रार चक्राचे भेदन होणे असा संबंध जोडला आहे. ह्या योगवासिष्ठातील सप्तयोगभूमिका असाव्यात किंवा समाधी अवस्थेत पोहोचण्यापूर्वीच्या सात योगांगाशी त्यांचा संबंध असावा असेही एक मत आढळते. आपल्याला काहीतरी मिळावे असे सतत वाटणे (प्रेप्सा), जे दु:खदायक आहे ती वस्तू मिळू नये असे वाटणे (जिहासा), आपल्याला सतत काही नवे समजावे असे वाटणे (जिज्ञासा), काहीतरी करत राहावे असे वाटणे (चिकीर्षा), जुन्या अनुभवातून मनाला होणार खेद (शोक), पुढे येऊ शकणाऱ्या दु:खाची भीती (भय) व कितीही विषय सुख भोगले तरी तृप्तता न वाटणे (अतृप्ती) या सात सहज प्रेरणा चित्तात सदैव सुप्त अवस्थेत असतात. संसारी जीवाचा सर्व व्यवहार ह्या अंत:प्रेरणांनी प्रेरित होतो. विवेकख्याती प्राप्त झाल्यावर मिळवण्यासारखे काहीच उरत नाही त्यामुळे विषय प्राप्त करणे व तत्संबंधित अंत:प्रेरणा यांचा निरास होतो असे मत डॉ. कृ. के. कोल्हटकर यांनी व्यक्त केले आहे.

योगदर्शनानुसार विवेकख्यातीचे ज्ञान हे सर्वोच्च ज्ञान असले तरी ते योगाचे अंतिम साध्य नव्हे. विवेकख्याति हे एक प्रकारचे ज्ञानच आहे जे चित्ताच्या एकाग्र वृत्तीद्वारे प्राप्त होते, परंतु चित्ताच्या वृत्तींचा निरोध म्हणजे योग होय. हे जाणल्यावर विवेकख्यातिरूप ज्ञानाविषयीसुद्धा वैराग्य उत्पन्न होते, या वैराग्याला परवैराग्य म्हटले आहे. या अवस्थेत क्लेशनिवृत्ती होऊन चित्तातील सर्व अशुद्धी (मल) दूर होऊन त्रिगुणांचे कार्य संपते आणि कैवल्यप्राप्ती होते. जीवन्मुक्तावस्था हे परवैराग्याचे फळ आहे असे म्हणता येते.

मतमतांतरातून एक विचार स्पष्ट होतो तो असा की विवेकख्याति प्राप्त झाल्यापासून कैवल्यापर्यंतचा प्रवास हा क्रमाने होतो, ही क्षणार्धात घेण्याची झेप (Quantum leap) नाही.

पहा : कुंडलिनी, कैवल्य, पुरुष, प्रकृति, सप्तभूमिका.

संदर्भ :

  • कोल्हटकर, कृ. के., भारतीय मानसशास्त्र अथवा सार्थ आणि सविवरण पातञ्जल योगदर्शन, आदित्य प्रतिष्ठान पुणे, २००३.
  • स्वामी आनंद ऋषि, पातंजल योगदर्शन – एक अभ्यास, घंटाळी मित्र मंडळ, ठाणे, २०१३.
  • Acharya Kala and others, Essentials of Yoga – A Glossary of Yogic Terms, Somaiya Publications Ltd., Mumbai, 2016.                                                                                                                                                                                                                   समीक्षक : आचार्य कला