इंग्लंडमधील स्टॅफर्डशर परगण्यातील एक शहर आणि मृत्पात्री या उद्योगासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण. लोकसंख्या २,६३,३९३ (२०१९ अंदाज). मध्य इंग्लंडमध्ये ट्रेंट नदीच्या तसेच ट्रेंट व मर्सी कालव्याच्या काठावर वसलेले हे शहर मँचेस्टरपासून दक्षिणेस ६१ किमी., तर बर्मिंगहॅमच्या उत्तरेस ७२ किमी. अंतरावर आहे. साधारणपणे इ. स. १३०० च्या सुमारास या परिसरात सापडणार्‍या चिकणमातीपासून स्टोक ऑन ट्रेंट येथे मातीची भांडी तयार केली जात. त्यानंतर इ. स. १७०० च्या मध्यात चांगल्या प्रतीच्या मृत्पात्रांची निर्मिती हा एक छोटा, परंतु विशेषीकरण झालेला उद्योग बनला. प्रसिद्ध ब्रिटिश कुंभार जोसीआ वेजवुड यांनी इ. स. १७५९ मध्ये येथे मातीची भांडी तयार करण्याच्या उद्योगाची स्थापना केली. इ. स. १७७७ मध्ये या शहरातून जाणारा ट्रेंट व मर्सी हा कालवा काढण्यात आला. तो या उद्योगाच्या भरभराटीच्या दृष्टीने फायदेशीर ठरला. अल्पावधीतच मृत्पात्री उद्योगासाठी हे शहर विख्यात बनले. त्यामुळे ते ‘पॉटरी डिस्ट्रिक्ट’ म्हणून ओळखले जाऊ लागले. सुरुवातीच्या काळात परिसरातून उपलब्ध झालेली जाडीभरडी चिकणमाती व दगडी कोळसा यांमुळे या उद्योगाचा यशस्वी पाया घातला गेला. अलीकडे या उद्योगासाठी कॉर्नवॉलमधून आणलेल्या चांगल्या प्रतीच्या मातीचा तसेच मातीची भांडी भाजण्यासाठी तेल, वायू व विद्युतशक्तीचा वापर केला जातो. मृत्पात्री उद्योगाशिवाय येथे कोळसा खाणकाम, धातुकाम, काच, विटा, कौले, चिनी मातीची भांडी, रबर, रसायने, स्वच्छता साधने निर्मिती, मृत्पात्री उद्योगासाठीची यंत्रसामग्री, पोलाद निर्मिती इत्यादी उद्योग चालतात. येथील पर्यटन व्यवसायही महत्त्वाचा आहे. १९१० मध्ये स्टोक ऑन ट्रेंट आणि त्याच्या लगतच्या मातीची भांडी निर्मितीसाठी महत्त्वाच्या असलेल्या बर्झ्लम, फेंटन, हॅन्ली, लाँगटन व टनस्टॉल या पाच गावांचा मिळून स्टोक ऑन ट्रेंट या कौंटी बरोची निर्मिती करण्यात आली. त्यानंतर १९२५ मध्ये त्याला शहराचा दर्जा देण्यात आला. प्रसिद्ध कादंबरीकार आर्नल्ड बेनेट यांचे यामधील हॅन्ली हे जन्मगाव. त्यांनी आपल्या कथा व कादंबर्‍यांमध्ये वर्णन केलेल्या घटना यातील पाच गावांमध्ये घडल्याचे दाखविले आहे. जोसिआ वेजवुडशिवाय जोसिआ स्पोड, टॉमस मिंटन, डब्लू. टी. कोपलँड या स्टोक ऑन ट्रेंट येथील मृत्पात्री उद्योगातील महत्त्वपूर्ण व्यक्ती आहेत.

१९५१ मध्ये येथे ब्रिटिश मृत्पात्री संशोधन संस्थेची प्रयोगशाळा स्थापन करण्यात आली आहे. शहरात उत्तर स्टॅफर्डशर तंत्रशिक्षण महाविद्यालय आणि स्टॅफर्डशर विद्यापीठाचे उपकेंद्र आहे. स्टॅफर्डशर विद्यापीठाच्या (स्थापना १९७०) येथील उपकेंद्रात इतर अभ्यासक्रमांसोबतच प्रामुख्याने मृत्पात्री तंत्रविद्याविषयक कार्यक्रम राबविले जातात. शहरातील नॉर्थ स्टॅफर्डशर तंत्रशिक्षण महाविद्यालय उल्लेखनीय आहे. शहरात मातीच्या भांड्यांचे संग्रहालय तसेच इतर अनेक वस्तुसंग्रहालये आहेत.

समीक्षक : ना. स. गाडे