तोबीन, जेम्स : (८ मार्च १९१८ – ११ मार्च २००२). अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ, तेथील फेडरल रिझर्व सिस्टिमचे आर्थिक सल्लागार व अर्थशास्त्राच्या नोबेल पुरस्काराचा मानकरी. गुंतवणूक, चलनविषयक तसेच वित्तीय धोरण व बाजारपेठा विश्लेषण प्रणाली यांसंबंधीच्या मूलभूत संशोधनाबद्दल १९८१ मध्ये अर्थशास्त्र विषयातील नोबेल स्मृती पुरस्कार देवून त्यांना गौरविण्यात आले.
तोबीन यांचा जन्म इलीनोइस प्रांतातील कँपेन येथे झाला. पहिल्या जागतिक महायुद्धात सहभागी झालेले त्यांचे वडील पत्रकार, तर आई सामाजिक कार्यकर्त्या होत्या. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण इलीनोइस शहरातील युनिव्हर्सिटी हायस्कूल व लेबॉरटरी स्कूलमध्ये झाले. वडिलांच्या सल्ल्यानुसार १९३५ मध्ये त्यांनी हार्व्हर्ड विद्यापीठासाठीची प्रवेश परीक्षा दिली. त्यात उत्तीर्ण होऊन त्यांना राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळाली. तेथे अध्ययन करीत असताना ते विद्यापीठातील ख्यातनाम प्राध्यापक व अर्थतज्ज्ञ योझेफ आलोईस शुंपेटर, (Joseph Olais Schumpeter),ॲल्व्हिन हार्वे हॅन्सेन (Alvin Harvey Hansen), हॅबेरलेर, सेमोर हॅरीस व एडवर्ड मॅसन यांच्या संपर्कात आला. सुप्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ जॉन मेनार्ड केन्स (John Maynard Keynes) यांच्या आर्थिक विचारांचा विशेष अभ्यास करून १९३९ मध्ये बी. ए. आणि १९४० मध्ये एम. ए. या पदव्या मिळविल्या. त्यानंतर शासकीय कार्यालयात तसेच दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या काळात अमेरिकन नेव्हीत सेवा केली. पुढे हार्व्हर्ड विद्यापीठात संशोधन कार्य सुरू ठेवले व १९४७ मध्ये अर्थशास्त्रात पीएच. डी. त्यांनी प्राप्त केली.
तोबीन यांची १९४७ – १९५० या काळात कनिष्ठ अधिछात्र (Fellow) म्हणून हार्व्हर्ड विद्यापीठात संशोधनासाठी निवड झाली. १९५० मध्ये ते हार्व्हर्ड विद्यापीठात अर्थशास्त्राचा प्राध्यापक झाले आणि तेथेच दीर्घकाळ अध्यापन व संशोधनकार्य चालू ठेवले. विद्यापीठातील काऊलेस फौंडेशनमध्ये अध्यापन करतानाच १९५५ – १९६१ व १९६४-६५ या काळात त्यांची फाउंडेशनच्या संचालकपदी निवड झाली. दरम्यान १९५७ मध्ये येल विद्यापीठात स्टर्लिंग प्रोफेसर म्हणून त्यांची नियुक्ती झाली. तोबीन हे आपल्या संशोधनकार्यामुळे केन्सवादी अर्थतज्ज्ञ म्हणून परिचित आहेत. वित्तीय धोरण केवळ भांडवली गुंतवणूकीमध्ये परिणामकारक असते. व्याजदर हा भांडवल गुंतवणूकीमध्ये जरी महत्त्वाचा घटक असला, तरी तो एकमेव घटक असत नाही, ही भूमिका तोबीन यांनी मांडली. यासंदर्भात त्यांनी आपले स्वातंत्र्य तोबीन परिमान विकसित केले. वित्तीय व बाजारपेठा समाजाच्या सेवन व गुंतवणूक कार्यावर कसा प्रभाव टाकतात, याचे विश्लेषण करणारे सिद्धांत विकसित केले. गुंतवणूक अर्थसंकल्पन सिद्धांत हे त्यांचे दुसरे महत्त्वाचे योगदान मानले जाते. गुंतवणूकदार गुंतवणूक करताना त्यातील संभाव्य धोके व मिळणारे उत्पन्न विचारात घेऊन सुरक्षिततेला प्राध्यान्य देतात. तरलता अग्रक्रम गुंतवणूक प्रतिकृती विकसित करून गुंतवणूक प्रवृत्तींविषयी भाष्य केले. केवळ पैसे जवळ असल्याने उत्पन्न मिळत नाही, प्रतिभूतीमध्ये केलेल्या गुंतवणूकीवर व्याज मिळते; परंतु त्यातही अनिश्चितता व नुकसानीची शक्यता असते. त्यादृष्टीने व्यक्तींनी गुंतवणूकीसंबंधी निर्णय घेताना जादा उत्पन्न व कमीत-कमी धोका यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
१९७२ मध्ये अमेरिकन अध्यक्षपदाचे उमेदवार जॉर्ज मॅकगर्व्हन यांचा तोबीन हे आर्थिक सल्लागार होते. शासकीय नियंत्रणे देशाच्या अर्थव्यवस्थेला हानी पोचवतात. त्यादृष्टीने अकार्यक्षम व अन्यायकारक हस्तक्षेप टाळले पाहिजेत, असे त्यांनी आग्रहाने मांडले. यासंदर्भात न्यूयॉर्क, मास्को तसेच मेक्सिको शहरातील भाडे-नियंत्रणे, श्रीमंत शेतकऱ्यांना दिली जाणारी अनुदाने तसेच सुस्थितीतील विद्यार्थ्यांना कमी व्याजाने दिलेली शैक्षणिक कर्जे यांसारखी उदाहरणे दिली.
तोबीन यांची ग्रंथसंपदा पुढीलप्रमाणे : अमेरिकन बिझनेस ग्रीड (१९६१ – सहलेखक), नॅशनल इकॉनॉमिक पॉलीसी (१९६६), एसेज इन इकॉनॉमिक्स-तीन व्हॉल्यूम्स (१९७१, १९७५ व १९८२), दि न्यू इकॉनॉमिक्स वन डिकेड ओल्डर (१९७४), कंटेम्प्ररी मॅक्रोइकॉनॉमिक थिअरी (१९८०), थिअरी ॲण्ड पॉलिसी (१९८२).
तोबीन यांना नोबेल स्मृती पुरस्काराबरोबर आर्थिक क्षेत्रातील महनीय कार्याबद्दल पुढील सन्मान लाभले : जॉन बेट्स क्लार्क मेडल (१९५५), जॉन एफ. केनेडी कौन्सिल ऑफ इकॉनॉमिक अडव्हायजर्सचे सदस्य (१९६१-६२), फेडरल रिझर्व व यू. एस. ट्रेझरी डिपार्टमेंटचे सल्लागार, अनेक नामवंत विद्यापीठांच्या सन्माननीय डॉक्टरेट्स, अमेरिकन इकॉनॉमिक असोसिएशनचे अध्यक्ष (१९७१).
तोबीन यांचे अमेरिकेतील न्यू हेवन, कनेक्टिकट येथे निधन झाले.
दृकश्राव्य दुवा : https://app.emaze.com/@ALRFWTQI/economist-james-tobin
समीक्षक – संतोष दास्ताने