आचार म्हणजे आचरण व रसायन म्हणजे उत्तम दर्जाचे, गुणवत्तेचे शरीर घटक आणि धातू उत्पत्तीसाठीची विशेष चिकित्सा होय. वास्तविक पाहता रसायन चिकित्सा ही शरीरातील दूषित दोष व धातूंची चिकित्सेपश्चात दोषांचा समतोल राखणे व रोगांमुळे क्षीण झालेल्या धातूचे बल, गुणवत्ता वाढवून दीर्घायुष्य प्राप्तीसाठी केली जाते. रसायन चिकित्सा ही फक्त शारीरिक आरोग्यापुरती मर्यादित नसून मानसिक आरोग्यावरही तितकाच परीणाम करणारी आहे.

चरकाचार्यांनी रसायनाचे महात्म्य वर्णन केले आहे. आयुर्वेदाचा मुख्य हेतू निरोगी माणसाच्या आरोग्याचे रक्षण करणे आणि आजारापासून बचाव करणे हा आहे. रसायन चिकित्सेने दीर्घायू व संपन्नता साध्य करता येते.

आचार रसायन ही आयुर्वेदाची विशेषता आहे. आचार रसायनाने कोणतेही औषधी द्रव्य अथवा साधने यांशिवाय केवळ संयम, नैतिक मूल्य, सदवृत्त, अहिंसा इत्यादी नित्य आमलात आणल्यास रसायन चिकित्सेने होणारा लाभ प्राप्त होतो. आचार्य चरकांनुसार आचार रसायन ही आयुर्वेद शास्त्राची अद्वितीय चिकित्सा भेट आहे. आहार किंवा औषधींशिवाय ही एक प्रकारची नियमित आचरण प्रक्रिया आहे, जी रसायनापेक्षा अधिक कार्य करते.

खरे बोलणे, राग न करणे, निर्व्यसनी आणि ब्रह्मचर्य पाळणे; अहिंसा, श्रममुक्त, शांत, मृदू भाषेचा वापर करणे; जप करणे; स्वच्छता राखणे; नित्य दान करणे; तपस्वी, गाय, ब्राह्मण, आचार्य गुरू आणि वृद्ध लोकांची सेवा करणे, प्राणिमात्रांवर दया करणे; जितकी झोप तितकेच जागरण याचे समतोल राखणे; नियमित दुध व तूप सेवन करणे; अहंकार विरहित सद्गुणी, उदार अंतर्मुखी (स्व-केंद्रित इंद्रिय), वृद्ध, आस्तिक आणि संयमी माणसांची उपासना व त्यांच्याबरोबर राहणे; धार्मिक शास्त्रांचा अभ्यास करणे आणि त्यानुसार वागणे हे नित्य आमलात आणणे म्हणजे आचार रसायन होय.

सध्याच्या वेगवान बदलत्या जीवनशैलीमुळे आपणास विविध शारीरिक व मानसिक आजारांना सामोरे जावे लागत आहे. त्यासाठी दिनचर्येत आवश्यक ते बदल आणि वेळीच वैद्यकीय तपासण्या करणे आवश्यक आहे. दूर्धर व जुनाट आजार, हृद्रोग, कर्करोग, साथीचे रोगांना सामोरे जाताना शरीराची योग्य निगा राखणे गरजेचे आहे. आधुनिक चिकित्सेच्या जोडीला आहारशास्त्र, योग, समुपदेशन चिकित्सा हे आरोग्य टिकवण्यासाठी उत्तम हातभार लावत असल्याचे दिसून येते.

आयुर्वेद शास्त्र हितकर-अहितकर, सुख आयुष्य-दु:ख आयुष्य काय आहे व त्याच्या परिमाणाबद्दल सविस्तर माहिती देणारे शास्त्र आहे. रोग होऊच नये यासाठी आचार रसायनास जर आपण आपल्या नित्य जीवनशैलीचा भाग करू शकलो तर समतोल सहज शक्य आहे. परिणामी सुदृढ शरीर, तल्लख बुद्धी, मानसिक संपन्नता, उत्तम रोगप्रतिकारशक्ती हेच खऱ्या अर्थाने निरोगी आयुष्य होय.

संदर्भ : 

  • चरक चिकित्सा स्थान आयुर्वेदसमुत्थानीयो रसायनपाद अध्याय १.४, श्लोक ३०-३५, चक्रपाणी टिका, चौखंबा प्रकाशन.

समीक्षक : कौस्तुभ चौंडे