आरा, कृष्णाजी हौलाजी : (१६ एप्रिल १९१४ – ३० जून १९८५). विख्यात भारतीय चित्रकार. स्थिरवस्तुचित्रण (स्टिल लाइफ) हा एक चित्रप्रकार (चित्रशैली) म्हणून त्यांनी भारतात विशेष लोकप्रिय केला. के. एच. आरा म्हणूनही सुपरिचित.
त्यांचा जन्म हैदराबादजवळील बोलारूम या गावी झाला. वयाच्या तिसऱ्या वर्षीच त्यांच्या आईचे निधन झाले. त्यानंतर त्यांच्या वडिलांनी दुसरा विवाह केला; परंतु सावत्र आईच्या छळाला कंटाळून आरा यांनी वयाच्या सातव्या वर्षी घर सोडले आणि ते मुंबईला आले. उदरनिर्वाहासाठी त्यांनी तेथे सुरुवातीला गाड्या धुण्या-पुसण्याचे काम केले. त्यानंतर एका यूरोपियन महिलेकडे घरकामाची नोकरी करीत असता आरा यांच्यातील चित्रकलेची आवड व त्यांचे चित्र काढण्याचे विलक्षण कौशल्य तिच्या लक्षात आले. परिणामी तिने त्यांना चित्रकलेकडे प्रोत्साहित केले. तिच्या एका मित्राच्या ओळखीने पुढे त्यांना योकोहामा कॉर्पोरेशन नावाच्या जपानी कंपनीत गाड्या धुण्याची नोकरी व वास्तव्यासाठी वाळकेश्वर (मुंबई) येथे कंपनीची खोली मिळाली.
आरा यांनी काढलेली काही चित्रे तत्कालीन टाइम्स ऑफ इंडियाचे कलासमीक्षक रुडी व्हान लेडन यांच्या नजरेस पडली. त्यांना ती खूप आवडली. ‘गाड्या धुण्या-पुसण्यापेक्षा चित्रनिर्मिती करʼ, असा सल्ला त्यांनी आरांना दिला व आर्थिक मदतही केली. पुढे लेडन यांच्यामुळेच आरा यांची ऑस्ट्रियन चित्रकार वॉल्टर लँगहॅमर यांच्याशी भेट झाली. त्यांच्याकडून त्यांनी चित्रकलेचे तांत्रिक शिक्षण आत्मसात केले व कलावंत म्हणून त्यांच्या कारकिर्दीस सुरुवात झाली.
आरा यांनी मुंबई येथील केतकर संस्थेतून चित्रकलेचे प्राथमिक शिक्षण घेतले होते. १९४२ मध्ये बाँबे आर्ट सोसायटीच्या सलाँमध्ये (सध्याचे आर्टिस्ट्स सेंटर) त्यांच्या चित्रांचे पहिले प्रदर्शन कॅमोल्ड गॅलरीच्या केकू गांधी यांनी भरविले. १९४४ मध्ये चेतना रेस्टॉरंट येथे त्यांचे दुसरे चित्रप्रदर्शन भरले. त्याच वर्षी बाँबे आर्ट सोसायटीचा ‘गव्हर्नरʼ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार त्यांना लाभला. १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाले. या घटनेचे ते साक्षीदार होते; कारण स्वातंत्र्याच्या लढ्यात त्यांचे सक्रिय योगदान होते. ह्या लढ्यात सहभागी होणाऱ्या असंख्य भारतीय नागरिकांचे चित्र आरा यांनी भल्यामोठ्या कॅनव्हासवर हळूहळू उलगडत चितारले. हे चित्र आजही मुंबईच्या विधानभवनात लावलेले आहे. १९४७ मध्ये आरा आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भारतीय चित्रकार ⇨ फ्रान्सिस न्यूटन सोझा यांच्या सहवासात आले, त्यांच्या विचारांनी ते प्रभावित झाले. हुसेन, रझा इत्यादी चित्रकारांसमवेत सोझा यांनी स्थापन केलेल्या प्रोगेसिव्ह आर्टिस्ट्स ग्रूपमध्ये ते सामील झाले. आरा यांची मुंबई, अहमदाबाद, बडोदा (बडोदरा), कलकत्ता (कोलकाता) येथे एकल आणि समूहचित्र प्रदर्शने भरली.
स्थिरचित्रे हे त्यांचे खास वैशिष्ट्य. भांडी, फळे, फुलदाण्या यांचा रचनात्मक पद्धतीने मेळ साधत ते स्थिरचित्रे रंगवत असत. त्यांच्या स्थिरचित्रांमध्ये वस्तूंसोबतच चंद्र, चांदणे, प्रकाश, सावल्या अशा अनेक गोष्टींची बांधणी ते प्रभावीपणे करीत. विवस्त्र स्त्रीदेह, वस्तू, फर्निचर इ. रंगविण्यातून त्यांची थेट अभिव्यक्ती प्रत्ययास येते. घट्ट रंग बोथट कुंचल्याने (ब्रश) घासत जलरंग वापरून तैलरंगासारखा परिणाम साधणे हे आरांचे खास तंत्र. नग्नचित्रे (Nude Paintings) हे आरांच्या चित्रांचे आणखी एक वैशिष्ट्य होते. त्यांची नग्नचित्रे ही वास्तवतेच्या परिप्रेक्ष्यात राहूनदेखील वेगळेपण दर्शविणारी, आकारांची घनता आणि ठसठशीतपणा साधणारी आहेत. त्याचप्रमाणे त्यांमध्ये गूढ वातावरणीय परिणामही साधलेला दिसतो.
१९५२ मध्ये जहांगीर आर्ट गॅलरीच्या उद्घाटनप्रसंगी भरलेल्या बाँबे आर्ट सोसायटीच्या प्रदर्शनात आरांच्या टू जग्ज या स्थिरचित्राला सुवर्णपदक प्राप्त झाले. १९५२, १९५४ आणि १९६० मध्ये त्यांची एकल प्रदर्शने भरली. १९६३ मध्ये मुंबईच्या पंडोल आर्ट गॅलरीच्या उद्घाटनप्रदर्शनात त्यांचा मुख्य सहभाग होता. रुमानिया, हंगेरी, बल्गेरिया, प. जर्मनी, रशिया, जपान येथेही त्यांची चित्रप्रदर्शने भरली. १९६० च्या दशकात आरा यांनी आपल्या चित्रांचे भव्य प्रदर्शन भरविले. त्या वेळी त्यांनी आपल्या चित्राची किंमत प्रत्येकी फक्त १०० रुपये ठेवली होती. सर्वसामान्यांच्या घरांतही कला रुजावी, हा त्यामागील हेतू होता. प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. होमी भाभा हे त्यांच्या चित्रांचे चाहते होते.
बाँबे आर्ट सोसायटी, ललित कला अकादमी, आर्टिस्ट्स सेंटर अशा संस्थांच्या उभारणीत आरा यांचा महत्त्वाचा सहभाग होता. १९८० नंतर त्यांची चित्रनिर्मिती हळूहळू कमी होत गेली. ते अविवाहित होते.
मुंबई येथील पठाण यांच्या निवासस्थानी आरा यांचे निधन झाले.
संदर्भ :
- बहुळकर, सुहास; घारे, दीपक, संपा., दृश्यकला खंड, हिंदुस्थान प्रकाशन, मुंबई, २०१३.
समीक्षक – महेंद्र दामले