प्राचीन ईजिप्शियन देव. बाष्परहित हवा व वातावरण यांचा अधिष्ठाता. शू या नावाचा मूलार्थ पोकळी किंवा रितेपण असा होय. शूला नाईल नदीवरून येणाऱ्या उत्तरीय-मध्य समुद्रीय वाऱ्यांचे मानवी रूप मानले गेले होते. या शैत्यदायी गुणधर्माच्या वाऱ्यांना ईजिप्तमधे विशेष महत्त्वाचे स्थान होते.

विश्वोत्पत्तिमिथकानुसार तेफ्नूट ही आर्द्रतेची देवता असून शूची बहीण व पत्नी होय. सिंहिणीच्या रूपात तिची पूजा होत असे. उत्पत्तीच्या प्रारंभिक टप्प्यात आतुम ऊर्फ सूर्यदेव रा याने स्वयंप्रेरणेद्वारे स्त्रीशक्तीच्या साहाय्याशिवाय शू-तेफ्नूट या आदिम जोडप्याची निर्मिती केली आणि त्यांना जग निर्माण करण्यासाठी पाठविले. बराच काळ झाला तरी ते परतले नाहीत, म्हणून आतुमने आपल्या डोळ्याला (Eye of Ra) शोधार्थ जाण्यास सांगितले. तो त्या दोघांसह परतताच आतुम आनंदाने रडला. त्या आनंदाश्रूंमधून मानव निर्माण झाले. नंतर शू-तेफ्नूट यांच्या संयोगातून पृथ्वीदेवता गेब (मुलगा) आणि आकाशदेवता नट (मुलगी) या दोघांचा जन्म झाला. मानवांना राहण्यास जागा देण्याच्या हेतूने आतुमने गेब व नट या दोघांना परस्परांपासून दूर केले. नंतर परस्परांच्या प्रगाढ मिठीत असलेल्या या उत्कट प्रेमिकांना विलग करणे, हे महत्त्वाचे कार्य आतुमने कायमस्वरूपी शूला दिले. वातावरणाचा अधिपती या भूमिकेतून धरती व आकाश यांच्यामधे विचरण करणाऱ्या हवेच्या रूपात तो हे घडवून आणतो. शूनंतर त्याची सत्ता गेबकडे गेली.

आकाशाला दोन्ही हातांनी वर उचलणारा, गेब व नट यांना विभक्त करत असलेला किंवा मस्तकावर शहामृग पक्ष्याची एक वा अनेक पिसे धारण केलेला पुरुष अशा विविध प्रकारांनी शूचे चित्रण आलेले दिसते.

संदर्भ : 

                                                                                                                                                                    समीक्षक : शकुंतला गावडे