पेरेझ, शिमॉन : (२ ऑगस्ट १९२३ – २८ सप्टेंबर २०१६). इझ्राएलचे एक राष्ट्र्निर्माते; आधुनिक इझ्राएलचे शिल्पकार, मुत्सद्दी आणि शांततेसाठीच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. इझ्राएलच्या राष्ट्राध्यक्ष पदावर असलेले शिमॉन पेरेझ निवृत्तीच्या वेळी जगातील सर्वांत वयोवृद्ध राष्ट्रप्रमुख होते (२००७-१४). त्यांचा जन्म पोलंड येथील विष्णेवा (बेलारूस) येथे झाला. त्यांचे वडील यित्झॅक लाकडाचे व्यापारी होते, तर आई सारा ग्रंथपाल होती. शिमॉन यांना गेरशॉन हा एक भाऊ होता. १९३२ साली त्यांचे कुटुंब पश्चिम आशियात स्थलांतरित झाले. शिमॉन यांचे शालेय शिक्षण तेल आवीव्ह येथे, तर उच्च शिक्षण न्यूयॉर्क आणि हॉर्व्हर्ड विद्यापीठांत झाले. पोलिश, इंग्लिश, फ्रेंच, हिब्रू  इत्यादी भाषा त्यांना चांगल्या अवगत होत्या. १९४५ मध्ये त्यांचा सोनिया गल्मन हिच्याशी विवाह झाला. त्यांना तीन अपत्ये होती.

शिमॉन यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात १९४१ पासून झाली. इझ्राएल निर्मितीसाठीच्या झिऑनिस्ट चळवळीतील ते एक युवक नेता होते. यावेळी त्यांची नौदल प्रमुख पदावर नेमणूक झाली. १९५९ मध्ये ते इझ्राएलच्या संसदेवर निवडून आले. इझ्राएलच्या मंत्रीमंडळात त्यांनी संरक्षण मंत्री पदासह विविध खात्यांचे मंत्री म्हणून चांगली कामगिरी बजावली. पुढे दोन वेळा प्रधानमंत्री व कारकिर्दीच्या अखेरीस राष्ट्राध्यक्ष होते. ते इझ्राएली जनतेचे अत्यंत लोकप्रिय नेते होते.

१९४८ साली इझ्राएल या ज्यूंच्या स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती झाल्यापासून मध्य आशियातील अरब जगत आणि इझ्राएल यांच्यातील संघर्ष तीव्र झाला. विशेषतः इझ्राएल आणि पॅलेस्टाइन यांच्यातील संघर्ष उग्र बनला. या सततच्या संघर्षामुळे पॅलेस्टाइनची समस्या हा जागतिक राजकारणातील महत्त्वाचा प्रश्न बनला होता. इझ्राएल आणि पॅलेस्टाइन या दोन देशांतील संघर्ष मिटवून स्वतंत्र पॅलेस्टाइनच्या निर्मितीसाठी १९९४ साली ‘ओस्लो करार’ घडून आला. हा करार घडवून आणण्यासाठी पुढाकार घेणारे शिमॉन पेरेझ, पॅलेस्टाइनचे राष्ट्राध्यक्ष यासर अराफत, इझ्राएलचे प्रधानमंत्री यित्झक रबिन यांना शांततेच्या नोबेल पुरस्काराने गौरविण्यात आले (१९९४). ओस्लो करार आणि पॅलेस्टाइनची निर्मिती यामुळे अस्वस्थ झालेल्या कट्टर राष्ट्रवाद्यांनी इझ्राएलचे प्रधानमंत्री यित्झॅक रबिन यांची हत्या केली. यानंतरच्या अस्थिर वातावरणात शिमॉन यांनी प्रधानमंत्री पदाची सूत्रे हाती घेऊन देशातील परिस्थिती मुत्सद्देगिरीने हाताळली आणि इझ्राएलला पूर्वपदावर आणले.

१९९६ मध्ये दहशतवाद्यांनी अपहरण केलेल्या इझ्राएलच्या विमानातील सर्व २४८ प्रवाशांची सहीसलामत सुटका करण्यासाठी शिमॉन यांनी धाडसाने  मोहीम राबविली. या यशस्वी कारवाईमुळे जगभर त्यांची प्रशंसा झाली.

शिमॉन हे सिद्धहस्त लेखकही होते. द नेक्स्ट स्टेप (१९६५), डेव्हिड्स स्लिंग (१९७०), ॲण्ड नाउ टुमॉरो (१९७८), फ्रॉम दिज मेन : सेव्हन फाउंडर्स ऑफ द स्टेट ऑफ इझ्राएल (१९७९), इंटेबे डायरी (१९९१), द न्यू मिडल ईस्ट (१९९३), बॅटिंग फॉर पीस : द मेम्वॉर (१९९५), फॉर द फ्यूचर ऑफ इझ्राएल (१९९८), द इमॅजिनरी व्हॉयिज (१९९९), बेन गुरिअन – ए पोलिटिकल लाइफ (२०११) हे त्यांचे उल्लेखनीय ग्रंथ.

वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांचे रामातगान (तेल आवीव्ह) येथे निधन झाले.

संदर्भ :

  • Bar-Zohar, Michael, Shimon Peres: The Biography, New York, 2007.
  • Golani, Motti, The Road to Peace: A Biography of Shimon Peres, New York, 1989.
  • कदम, य. ना.; भोसले, अरुण, चालू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी, कोल्हापूर, २०१७.

                                                                                                                                                                                                                         समीक्षक : अवनीश पाटील