भास्कर चंदनशिव :  (१२ जाने. १९४५). मराठी साहित्यातील १९७० नंतरच्या पिढीतील महत्त्वाचे कथाकार. जांभळढव्ह  या पहिल्याच कथासंग्रहाने त्यांचे नाव मराठी साहित्य विश्वात प्रस्थापित झाले. मातीशी अतूट नाते ठेवून शेतकरी चळवळीची वैचारिक भूमिका स्वीकारुन कृषक समूहाचे सर्वांगाने चित्रण करणारे लेखक म्हणून त्यांची ओळख आहे. कृषीनिष्ठ जाणिवाबरोबरच दलित जाणिवांचेही आविष्करण त्यांच्या कथेचा स्थायीभाव आहे. मराठवाडयातील दुष्काळ हा त्यांच्या अनुभवाचा,अभ्यासाचा आणि लेखनाचा विषय राहिला.  प्राथमिक शिक्षण जन्मगावी  झाल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी अंबेजोगाई आणि औरंगाबाद येथे त्यांनी पुढील शिक्षण घेतले.

वयाच्या विसाव्या वर्षी भास्कर चंदनशिव यांनी कथालेखनास प्रारंभ केला. त्यांची साहित्यसंपदा पुढीलप्रमाणे –कथासंग्रह : जांभळढव्ह (१९८०), मरणकळा (१९८३), अंगारमाती (१९९१),नवी वारुळ (१९९२), बिरडं (१९९९), लालचिखल; ललितलेख संग्रह : रानसई ; समीक्षा ग्रंथ : भूमी आणि भूमिका, माती आणि नाती, माती आणि मंथन; संपादन : ज्योती म्हणे, गाथा, सगनभाऊंच्या लावण्या  इत्यादी. म. ज्योतीराव फुले यांच्या शेतीविषयक विचारांच्या प्रभावातून त्यांनी शेती, शेतकरी, शेतमजूर, शेतीवर अवलंबून असणारे विविध समाजघटकांचे प्रश्न, विशेषत: कोरडवाहू शेतकरी, त्याचे शेतमालाचे उत्पादन, बाजार, हमीभाव, दुष्काळ, अस्मानी-सुलतानी, बेरोजगारी इत्यादींसंबंधी मूलभूत मांडणी पोटतिडकीने केली. ग्रामीण साहित्य व ग्रामीण समूहाच्या चळवळची समीक्षा त्यांनी केली. कथा हाच आकृतिबंध हाताळून यामवास्तव सकसपणे मांडणारा कथाकार म्हणून त्यांचे योगदान अनन्यसाधारण आहे.

भास्कर चंदनशिव यांच्या कथालेखनाचे मूळ हे शेतीविचाराशी निगडीत असले तरीही त्यांच्या कथेतील विचारविश्व हे एकाचवेळी दलित,ग्रामीण, स्त्रीवादी,आदिवासी आणि जनवादी अशा विचारप्रवाहांना स्पर्श करते.शेतकरी आणि शेतमजूर यांचा संघर्ष,उपाशीपोटी राहून मुलांना शिकवू पाहणाऱ्या ग्रामीण स्त्रीचा संघर्ष, दलित जाणीवेतून गावपातळीवर निर्माण होणारे संघर्ष या सर्व बाबी त्यांच्या कथांतून प्रकर्षाने पाहायला मिळतात. १९६० नंतरची  ग्रामीण जीवनाची सांस्कृतिक व्यामिश्रता त्यांच्या कथेतून संघर्ष या एका आयामातून व्यक्त झाली आहे.

दलितमित्र पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङमयनिर्मिती पुरस्कार, आचार्य अत्रे पुरस्कार, बी.रघुनाथ पुरस्कार, पु.भा.भावे पुरस्कार, अ.वा.वर्टी पुरस्कार, दिवाकर कृष्ण पुरस्कार, आनंदीबाई शिर्के पुरस्कार आणि दमाणी पुरस्कार इत्यादी महत्वाच्या पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य म्हणूनही त्यांनी काही काळ काम केले आहे. अस्मितादर्श साहित्य संमेलन, मराठवाडा साहित्य संमेलन, वाळवा येथे झालेले ग्रामीण साहित्य संमेलन इत्यादीचे ते अध्यक्ष होते.

संदर्भ : https://shodhganga.inflibnet.ac.in/handle/10603/176144


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.