आशिया आणि आफ्रिका या दोन खंडांमध्ये संपर्क आणि सहयोग वृद्धीसाठी तसेच खंडांतर्गत विकास साधता यावा यासाठी भारत आणि जपान यांनी आशिया-आफ्रिका वृद्धी महामार्ग हा प्रकल्प संयुक्तपणे सुरू केला आहे. मे २०१७ मध्ये गांधीनगर (गुजरात) येथे आशिया विकास बँकेची ५२ वी बैठक पार पडली. येथे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंझो ॲबे यांनी संयुक्त निवेदन करून या प्रकल्पाची घोषणा केली. भारत आणि जपान आफ्रिकेच्या विकासासाठी सहकार्य करतील, असे पंतप्रधान मोदींनी जाहीर केले.

२०१६ मध्ये टोक्यो येथे भारत आणि जपान यांच्या वार्षिक परिषदेत आशिया-आफ्रिका वृद्धी महामार्ग या प्रकल्पाची कल्पना मूळ धरू लागली. या परिषदेत आशिया आणि आफ्रिकेत मोठ्या प्रमाणात उद्योग वाढीस लागावेत तसेच औद्योगिक महामार्ग बांधले जावेत यांसाठी दोन्ही राष्ट्रप्रमुखांनी सहकार्य करीत असल्याचे सूचित केले. आशिया आणि आफ्रिकेतील विचारगटांशी सल्लामसलत करून ‘द रिसर्च अँड इन्फर्मेशन सिस्टिम फॉर डेव्हलपिंग कन्ट्रीज’ (दिल्ली), ‘द इकॉनॉमिक रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर आसियान अँड ईस्ट एशिया’ (जकार्ता), ‘इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपिंग इकॉनॉमीज’ (टोक्यो) यांनी संयुक्तपणे आगामी उद्दिष्टांचा आराखडा तयार केला.

हा आराखडा आशिया-आफ्रिका वृद्धी महामार्गाच्या चार प्रमुख स्तंभांची मांडणी करतो. १. कौशल्य आणि क्षमता वृद्धी, २. दर्जेदार पायाभूत सुविधा आणि संस्थात्मक संपर्क, ३. विकास आणि सहयोग प्रकल्प आणि ४. व्यक्ती व्यक्तींमधील भागीदारी. याचसोबत हा आराखडा वरील उद्धृत केलेल्या प्रत्येक स्तंभांतर्गत असलेल्या विविध प्रमुख क्षेत्रांची व्यक्तीव्यक्तींमधील भागीदारी या कल्पनेस केंद्रित ठेऊन विस्तृतपणे मांडणी करतो. हे प्रमुख चार स्तंभ खालीलप्रमाणे :

१. क्षमता आणि कौशल्य वृद्धी :

  • मानवी संसाधनांचे शिक्षण आणि प्रशिक्षण.
  • व्यावसायिक आणि औद्योगिक प्रशिक्षण केंद्र.
  • अखंड आफ्रिकेतील ई-नेटवर्क (ई-जाळे).
  • पायाभूत सोयी सुविधांच्या शाश्वततेसाठी क्षमता विकास.
  • विकासाचे अनुभव सर्वांपर्यंत पोहोचावेत यासाठी केंद्र स्थापन करणे.

२. दर्जात्मक पायाभूत सुविधा आणि संस्थात्मक संपर्क :

  • नव्याने होऊ घातलेले प्रकल्प विरुद्ध मोठे प्रकल्प.
  • आराखडा आणि प्रकल्प विकास.
  • संयुक्त उपक्रम/सांघिक उपक्रम, खाजगी क्षेत्राचा वित्त पुरवठा.
  • गुंतवणुकीच्या संधी.
  • संपर्काच्या पायाभूत सोयीसुविधा.
  • अपारंपरिक ऊर्जा, दूरसंचार, वीजवाहक ऊर्जेची जाळी (Power Grid).

३. विकास आणि सहयोग प्रकल्प :

  • कृषी आणि कृषी प्रक्रिया.
  • आरोग्य आणि औषधोपचार.
  • आपत्ती निवारण.
  • सागरी अर्थव्यवस्था.
  • उत्पादन आणि शैक्षणिक सेवा.

४. व्यक्तीव्यक्तींमधील भागीदारी :

  • समाजातील देवाणघेवाण.
  • ज्ञानाचे सुलभीकरण.
  • पर्यटन.
  • शिक्षण.

भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘ॲक्ट ईस्ट’ योजनेंतर्गत या प्रकल्पाची गणना करता येईल. ‘सबका साथ सबका विकास’ अधोरेखित करणारा सर्वसमावेशक विकास हे या प्रकल्पाचे एक मूलभूत तत्त्व आहे. याचसोबत भारताच्या ‘सागरमाला’ योजनेच्या माध्यमातून आशिया-आफ्रिका वृद्धी महामार्ग सागरी संपर्काची पायाभरणी करू पाहत आहे. सागरमाला योजनेचा उद्देश हा मुळात बंदरांचे आधुनिकीकरण, संपर्क विकास, औद्योगिक विकास आणि त्यायोगे होणारा किनारपट्टीच्या भागातील मानवी समुदायाचा विकास, हा आहे. यात एकूण ६० अब्ज डॉलर किमतीच्या ७३ प्रकल्पांचा समावेश असून त्यातील काही पायाभूत सोयीसुविधा पुरविणारे प्रकल्प आहेत. त्याचप्रमाणे सागरी धक्क्यांचे प्रकल्प, मासेमारी बंदरांचा विकास आणि कौशल्य विकास असेही प्रकल्प यात अंतर्भूत आहेत.

जपानचे पंतप्रधान शिंझो ॲबे यांनी आशिया-आफ्रिका वृद्धी महामार्गाच्या माध्यमातून ‘मुक्त आणि खुले हिंद-प्रशांत क्षेत्र’ रणनीतीचा आरंभ केला आहे. चीनच्या ‘वन बेल्ट वन रोड’ प्रकल्पामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात झालेला सत्तेचा असमतोल सुधारण्यासाठी आशिया-आफ्रिका वृद्धी महामार्ग हा जपानने दिलेली एक प्रतिक्रिया आहे, असेही काही अभ्यासकांचे प्रतिपादन आहे. जपान औपचारिक रीत्या जरी ‘वन बेल्ट वन रोड’ प्रकल्पाचा भाग असला, तरी उपखंडातील चीनचा सहभाग मर्यादित राहावा यासाठी रणनीती आखण्याबाबत जपान कायमच प्रयत्नशील राहिला आहे. २०१८ मधील ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह’च्या सभेत जरी जपान उपस्थित असला, तरी भारताने मात्र आपल्या अनुपस्थितीबाबतचे निवेदन प्रसिद्ध करून आपली नाराजी दर्शविली होती. आशिया-आफ्रिका वृद्धी महामार्ग सर्वसमावेशक विकास आणि समाजकेंद्रित दृष्टीकोनावर भर देतो, तर ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह’चे उद्दिष्ट आशिया आणि आफ्रिकेतील देशांमध्ये जोमदार औद्योगिक आणि शैक्षणिक विकास हे आहे.

या सर्वच बाबी आफ्रिकेतील सर्वसमावेशक आणि टिकाऊ विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरल्या आहेत. आशिया-आफ्रिका वृद्धी महामार्गाचा उद्देश आफ्रिकेतील विकासासाठी आर्थिक निधी पुरविणे हा असून कोणत्याही प्रकारे देश कर्जाच्या बोज्याखाली दाबला जाणार नाही या बाबीची काटेकोरपणे काळजी घेण्यात आली आहे. त्याच प्रमाणे पर्यावरण संतुलन आणि पारदर्शकता राखली जाईल याबाबतही हा प्रकल्प आग्रही आहे.

संदर्भ :

  • http://isdp.eu/publication/asia-africa-growth-corridor-aagc-india-japan/
  • http://www.eria.org/Asia-Africa-Growth-Corridor-Document.pdf
  • https://idsa.in/africatrends/asia-africa-growth-corridor-rberi
  • https://thediplomat.com/2018/11/japans-belt-and-road-balancing-act/
  • https://www.gatewayhouse.in/japan-aagc/

                                                                                                                                                                                                                                                                                                                                               समीक्षक : वैभवी पळसुले

भाषांतरकार : प्राजक्ता भिडे