मिश्र, सामताप्रसाद : (२० जुलै १९२०–३१ मे १९९४). प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय संगीतकार व बनारस घराण्याचे तबलावादक. त्यांचा जन्म वाराणसी (उत्तर प्रदेश) येथील कबीर चौरा येथे नामांकित तबलावादकांच्या घराण्यात झाला. गुडाई (गुदई) महाराज म्हणूनही ते ओळखले जात. त्यांच्या वडिलांचे नाव हरिसुंदर उर्फ पं. बाचा मिश्र. आजोबा पं. जगन्नाथ मिश्र व पणजोबा पं. प्रताप महाराज हे विख्यात तबलावादक होते. त्यामुळे सामताप्रसाद यांना बालवयापासूनच तबलावादनात स्वारस्य निर्माण झाले होते. तबलावादनाचे प्राथमिक शिक्षण त्यांना वडिलांकडून मिळाले. मात्र सामताप्रसाद सात वर्षांचे असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे पं. विक्रमादित्य मिश्र उर्फ बिक्कू (बिक्कूनी) महाराज यांच्याकडून त्यांनी त्यानंतरचे उच्च शिक्षण प्राप्त केले. बनारस घराण्याच्या परंपरेनुसार त्यांनी तबलावादनाचा कठोर रियाझ केला व सर्व महत्त्वपूर्ण बोलसमूहांवर प्रभुत्व मिळविले. तीन ताल, रूपक, धमार आणि सवारी हे त्यांचे आवडते ताल होते. स्वतंत्र तबलावादनाप्रमाणेच नृत्य व तंतुवाद्याच्या स्पर्धांमध्येही त्यांनी आपले स्वतंत्र महत्त्वपूर्ण स्थान प्रस्थापित केले होते. खूप वरच्या लयीत सुद्धा सुस्पष्ट निकास, तबला वादनाची आकर्षक मांडणी व त्यातील विलक्षण गोडवा ही त्यांची महत्त्वाची वैशिष्ट्ये. त्यांचा बायाँ (डाव्या हाताने वाजवितात तो डग्गा अथवा बायाँ) खूप तयारीत वाजत असे. काही विद्वानांच्या मते बनारस घराण्यात बायाँचे मैदान प्रेक्षकांकडे वळवून ठेवण्याची पद्धत सामताप्रसाद यांनीच सुरू केली. एच्. एम्. व्ही. ने त्यांची एक ‘लाँग प्लेइंग ध्वनिमुद्रिका’ प्रसिद्ध केली आहे.

सामताप्रसाद यांनी आपल्या विशिष्ट शैलीतील उत्कृष्ट तबलावादनाने देशविदेशांतील असंख्य रसिकांना मंत्रमुग्ध केले. १९४२ मध्ये अलाहाबाद येथील संगीत संमेलनात त्यांचा पहिला कार्यक्रमात झाला. त्यांच्या उत्कृष्ट तबलावादनाने इतर संगीतकारही खूप प्रभावित झाले होते. भारतामध्ये कोलकाता, चेन्नई, मुंबई, लखनौ तसेच विदेशात फ्रान्स, एडिनबर्ग, रशिया इत्यादी ठिकाणी शास्त्रीय संगीत सादर करण्याची त्यांना संधी मिळाली. विशेष म्हणजे एडिनबर्ग येथे भारतीय सांस्कृतिक संघाचे त्यांनी प्रतिनिधित्व केले. मेरी सुरत तेरी आँखे, शोले, झनक झनक पायल बाजे, बसंत बहार या चित्रपटांसाठी त्यांनी केलेले तबलावादन गाजले. प्रसिद्ध संगीतकार आर्. डी. बर्मन (राहुल देव बर्मन ) हे त्यांच्या उत्तम शिष्यांपैकी एक होत.

सामताप्रसाद यांना त्यांच्या तबलावादनातील विलक्षण कौशल्य व या क्षेत्रातील असाधारण योगदानाबद्दल विविध मानसन्मान व पुरस्कार देऊन सन्मानित केले गेले. त्यांपैकी काही महत्त्वाचे पुरस्कार पुढीलप्रमाणे : हरिदास  संगीत संमेलन, मुंबई (१९५२); ललित कला अकादमी, कानपूर (१९६६); सूरदास संगीत संमेलन सन्मान, कोलकाता (१९७०); संगीत नाटक अकादमी पुरस्कार, उत्तर प्रदेश (१९७२); भारत सरकारतर्फे पद्मश्री (१९७२); संगीत नाटक अकादमी पुरस्कार (१९७९); अध्यक्ष अधिछात्रवृत्ती (१९८७); पद्मभूषण (१९९१) इत्यादी. यांशिवाय ‘ताल-शिरोमणी’, ‘तार्ल-मार्तंड’ म्हणूनही त्यांना गौरविण्यात आले.

त्यांच्या शिष्यपरिवारामध्ये जेरल मसी, नवकुमार पण्डा, चंद्रकांत कामत, माणिक पोपटकर, माणिकलाल दास, सत्यनारायण वसिष्ठ इत्यादी नावे उल्लेखनीय होत. कुमार आणि कैलास हे त्यांचे दोन पुत्र उत्तम तबलावादक आहेत.

नादरूप आयोजित कार्यशाळेच्या निमित्ताने ते पुणे दौऱ्यावर आले असतानाच त्यांचे निधन झाले.

 

समीक्षण : मनीषा पोळ