अमीर हुसेनखाँ, उस्ताद : (? १८९९ – ५ जानेवारी १९६९). सुप्रसिद्ध भारतीय तबलावादक. त्यांचा जन्म उत्तर प्रदेश राज्यातील मेरठ जिल्ह्यातील बनखंडा या गावी झाला. त्यांचे वडील उस्ताद अहमद बक्क्षखाँ यांची उत्तम सारंगीवादक म्हणून ख्याती होती. दक्षिण हैदराबादच्या निजामाकडून ‘दरबारी वादक’ म्हणून त्यांची नेमणूक झाली होती. त्यामुळे अमीर यांचे लहानपण हैदराबाद येथेच व्यतीत झाले. तबलावादनाचे प्राथमिक शिक्षण त्यांनी आपल्या वडिलांकडून आत्मसात केले. त्यांना वाचनाचीही आवड होती. उर्दूत भाषांतरित झालेल्या इतिहास व तत्त्वज्ञान या विषयांतील अनेक ग्रंथांचे वाचन त्यांनी केले होते. तरुणवयात त्यांना कुस्तीचीही आवड होती. पण मुळात त्यांना लयकारीमध्ये खूप स्वारस्य होते. सुप्रसिद्ध तबलावादक उस्ताद मुनीरखाँ हे त्यांचे मामा त्यावेळी मुंबईला राहात असत. ते ज्यावेळी हैदराबादला येत त्यावेळी छोट्या अमीरचे तबलावादन ऐकत. तेही त्यांना तबल्याची तालीम देत. त्यांच्याकडून तबलावादनाचे शिक्षण घेण्यात खंड पडतो. हे लक्षात आल्यावर उद्वेगाने अमीर एकदा घरी न सांगताच मामांकडे मुंबईला गेले. त्यानंतर मात्र तबलावादनाचे त्यांचे शिक्षण अखंडितपणे चालू राहिले. अमीर हुसेनखाँ प्रामुख्याने पूरब शैली वाजवीत. दिल्ली घराण्याचे उ. नत्थ्थूखाँ यांच्या दोन बोटी ‘धिरधिर’ चा त्यांच्यावर विलक्षण प्रभाव होता. त्यांनी त्या ‘धिरधिर’वर प्रभुत्व संपादन केले. मुनीरखाँ त्यांना बडोदा, दिल्ली-मेरठ, रायगड इत्यादी ठिकाणी कार्यक्रमांसाठी आपल्याबरोबर घेऊन जात व त्यांना साथसंगत व स्वतंत्र तबलावादनाची संधी देत.

अमीर हुसेनखाँ यांचा प्रचंड रियाझ, तबलावादनाच्या प्रत्येक घराण्याचा सखोल अभ्यास, निकास वादनातील सशक्तपणा, दायाँ-बायाँवरील लक्षणीय प्रभुत्व, निकासाबाबतचे वेगळे विचार, तबल्याच्या बंदिशीतील काव्यात्मकतेचा सूक्ष्म अभ्यास ही त्यांची उल्लेखनीय गुणवैशिष्ट्ये.

संगीताच्या क्षेत्रात अशी व्यक्तिमत्त्वे फार कमी आहेत की, ज्यांच्यामध्ये ‘बनायक-बतायक-बजायक’ ही तीनही वैशिष्ट्ये सामावलेली आहेत; पण अमीर हुसेनखाँ हे त्या दुर्मीळ व्यक्तिमत्त्वांपैकी एक होत. त्यांनी केलेल्या अनेक सौंदर्यपूर्ण रचना त्यांच्या अमोघ प्रतिभेची, कल्पनाशक्तीची, विद्वत्तेची व त्यांच्यातील ‘बनायक’ ची साक्ष देतात. त्यांच्या रचना आकर्षक, कर्णमधूर व नाविण्यपूर्ण असून पेशकार, कायदे, रेले, तिहाई, चक्रधार इत्यादी सर्व प्रकारांत त्या आहेत. त्यांच्या शेकडो शिष्य-प्रशिष्यांच्या रूपाने त्यांच्यातील ‘बतायक’ सिद्ध होतो व त्यांच्या अनोख्या वादनाने त्यांच्यातील ‘बजायक’ प्रत्ययास येतो. त्यांच्या तबलावादनावर खूष होऊन रायगडच्या महाराजांनी अमीर हुसेनखाँ यांना एक हजार अश्रफींची (सोन्याची नाणी किंवा मोहोर) थैली प्रदान केली होती. उत्कृष्ट वादक, रचनाकार व उत्तम शिक्षक म्हणून ते विख्यात होते. उच्च दर्जाच्या शुद्ध शास्त्रीय तबलावादनाचा त्यांनी प्रचार केला.

अमीर हुसेनखाँ यांच्या शिष्य-परिवारातील अनके शिष्य पुढे नावारूपाला आले. त्यांमध्ये त्यांचे सुपुत्र उ. फकीर हुसेनखाँ, पं. पंढरीनाथ नागेशकर, पांडुरंग साळुंखे, उ. बाबासाहेब मिरजकर, पं. अरविंद मुळगावकर, महिला तबलावादक आबान मिस्त्री इत्यादींचा समावेश आहे.

अमीर हुसेनखाँ यांचे यकृताच्या कर्करोगाने मुंबई येथे निधन झाले.

संदर्भ :

  • मुळगांवकर, अरविंद, आठवणींचा डोह, पॉप्युलर प्रकाशन
  • श्रीवास्तव, गिरिशचन्द्र, तालकोश, संगीत श्री प्रकाशन, कानपूर.

समीक्षक : मनीषा पोळ