जम्मू व काश्मीर राज्यातील एक विद्यापीठ. जम्मू व काश्मीर राज्याच्या विधानमंडळातील ऑगस्ट १९८२ च्या आधिनियमानुसार १९८२ मध्ये या विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. श्रीनगरमधील शालीमार येथे या विद्यापीठाचे मुख्य केंद्र आहे. १९९९ मध्ये जम्मू विभागासाठी याच नावाच्या स्वतंत्र विद्यापीठाची स्थापना झाल्यामुळे ‘युनिव्हर्सिटी ऑफ ॲग्रिकल्चरल सायन्सेस ॲण्ड टेक्नॉलॉजीʼ या मूळ नावाचे १९९९ मध्ये ‘शेर-ए-काश्मीर युनिव्हर्सिटी ऑफ ॲग्रिकल्चरल सायन्सेस ॲण्ड टेक्नॉलॉजी ऑफ काश्मीरʼ असे नामकरण करण्यात आले. शेर-ए-काश्मीर म्हणून ओळखले जाणाऱ्या शेख मुहम्मद अब्दुल्लाह यांच्या नावावरून विद्यापीठाला हे नाव देण्यात आलेले आहे. राज्याचे राज्यपाल हे विद्यापीठाचे कुलपती, तर नाझीर अहमद हे विद्यापीठाचे कुलगुरू आहेत. जम्मू येथील स्वतंत्र विद्यापीठाच्या स्थापनेपासून काश्मीर खोऱ्यातील अनंतनाग, बुडगम, बारामूल, कुपवाडा, बंदीपुरा, गणदेरबाल व श्रीनगर हे जिल्हे आणि लडाख विभागातील लेह व कारगील जिल्हे हे विद्यापीठाचे अधिकारक्षेत्र आहे. या विद्यापीठाची स्थापना झाल्यानंतर राज्यातील वेगवेगळ्या विभागांची कृषिशिक्षण, संशोधन व विस्तार प्रशिक्षण केंद्रे या विद्यापीठाकडे हस्तांतरित करण्यात आली.

कृषिसंशोधन व विकास हा या विद्यापीठाच्या स्थापनेचा मुख्य उद्देश होता. या विद्यापीठामुळे राज्यात कृषी, पशुवैद्यक आणि वनविज्ञान क्षेत्रांच्या विकासप्रक्रियेसाठीच्या संधी उपलब्ध झाल्या. वाढत्या लोकसंख्येमुळे अन्नधान्य, भाजीपाला, फळे व इतर अन्नसंसाधनांना वाढणारी मागणी, मध्यम उत्पन्न गटातील लोकांचे सुधारलेले जीवनमान इत्यादी गोष्टींचा विचार करून अन्नधान्य व इतर कृषी-उत्पादनांमध्ये गुणात्मक व संख्यात्मक वाढ घडवून आणण्याचे प्रयत्न हे विद्यापीठ करीत आहे. कृषी व तत्संबंधित विभागांना नवी दिशा देण्याच्या दृष्टीने आधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्यास विद्यापीठाने विशेष प्राधान्य दिले आहे.

विद्यापीठाच्या शालीमार येथील मुख्य परिसरात प्रयोगशाळा, वर्गखोल्या, ग्रंथालय इत्यादींसाठी नव्याने इमारती उभारल्या आहेत. विद्यापीठाच्या वेगवेगळ्या विभागात एकूण २४ ग्रंथालये आहेत. सर्व ग्रंथालयांतील एकत्रित वेगवेगळ्या विषयांची सुमारे ७९,६३९ पुस्तके आहेत. राष्ट्रीय कृषिसंशोधन प्रकल्पांतर्गत येणाऱ्या विविध कृषी-हवामान विभागांतील केंद्रांमध्ये नवीन सुविधा निर्माण करून जुन्या सुविधांत सुधारणा करण्यात आल्या आहेत. समशीतोष्ण कटिबंधीय हवामान विभागातील खुडवाणी, पहलगाम, बलपोरा, के. डी. फार्म, वडुरा, मानसबल आणि थंड शुष्क प्रदेशातील कारगील व लेह येथे विद्यापीठाची केंद्रे आहेत. शेती व इतर संबंधित शास्त्रांमध्ये संशोधन करणे, त्यांचा विस्तार करणे आणि समशीतोष्ण व थंड शेतीवर विशेष भर देणे हे कार्य विद्यापीठाद्वारे करण्यात येते. राजौरी,  राईस, भडेरवाह, राया, धिनसार, सांबा, आर. एस. पुरा, पूंछ, उधमपूर, चाथा ही या विद्यापीठांची प्रादेशिक केंद्रे आहेत. पशुविकारविज्ञान व पशुसंवर्धन विद्याशाखा, युहामा; कृषि विद्याशाखा, वडुरा आणि इतर प्रादेशिक केंद्रे व उपकेंद्रे या विद्यापीठाच्या कक्षेत येतात.

बी. एससी, एम. एससी. (कृषी), बी. व्ही. एससी. ॲण्ड ए. एच, एम. व्ही. एससी. (पशुविकारविज्ञान पदवी व पदव्युत्तर शिक्षण), पीएच. डी. इत्यादी अभ्यासक्रमांचे अध्यापन विद्यापीठात केले जाते. कृषिविद्या आणि पशुविकारविज्ञान व पशुसंवर्धन विभागांत येणाऱ्या विद्याशाखा पुढीलप्रमाणे आहेत : कृषिविद्या विभाग : कृषी अभियांत्रिकी, कृषी वनविज्ञान, कृषिविज्ञान, अर्थशास्त्र व संख्याशास्त्र, कीटकविज्ञान, विस्तारशिक्षण, शाकोत्पादन, पुष्पोत्पादन, मृदाशास्त्र व कृषी रसायनशास्त्र, रेशीमउद्योग इत्यादी. पशुविकार विज्ञान व पशुसंवर्धन विभाग : पशुविकार जीवरसायनशास्त्र, निदानीय वैद्यक व न्यायशास्त्र, रोगपरिस्थितिविज्ञान व प्रतिबंधक वैद्यक, पशुविकार सूक्ष्मजीवशास्त्र व प्रतिरक्षाविज्ञान, पशुविकार शरीरक्रिया विज्ञान, सार्वजनिक आरोग्य व आरोग्यविज्ञान, पशुविकार शस्त्रक्रिया व क्ष-किरणविज्ञान, पशुप्रजनन व आनुवंशिकी, प्राणिपोशन, मादी रोगविज्ञान व प्रसूतिविद्या, पशुधन उत्पादन व व्यवस्थापन, पशुधन फलन तंत्र, पशुविकार परजीवी विज्ञान, पशुविकार औषधिक्रिया विज्ञान व विषचिकित्सा विज्ञान इत्यादी.

समीक्षक – संतोष गेडाम

प्रतिक्रिया व्यक्त करा