देशपांडे, मधुसूदन नरहर : ( ११ नोव्हेंबर १९२० – ७ ऑगस्ट २००८). भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याचे माजी महानिदेशक, कलेतिहासतज्ज्ञ आणि पुरावास्तूंचे जतनकार. जन्म सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर येथे झाला. प्राथमिक शिक्षण रहिमतपूर येथे, तर महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथे झाले. अर्धमागधी हा मुख्य विषय घेऊन फर्ग्युसन महाविद्यालयामधून बी. ए. (ऑनर्स) ही पदवी ते प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले (१९४२). त्यांना एस. ए. टी. जैन ही साहित्यविषयक शिष्यवृत्ती प्राप्त झाली.
डेक्कन कॉलेजचे माजी संचालक, पुरातत्त्वज्ञ ह. धी. सांकलिया यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी श्वेतांबर जैन आगमांतून घडणारे भारतीय संस्कृतीचे दर्शन या विषयावर पीएच. डी. चे अध्ययन करण्यास सुरुवात केली; तथापि त्यांची पीएच. डी. पूर्ण होऊ शकली नाही. त्याच सुमारास पुरातत्त्व खात्याचे तत्कालीन महानिदेशक सर मॉर्टिमर व्हीलर यांच्या तक्षशिला येथील पुरातत्त्वीय क्षेत्र प्रशिक्षण कार्यक्रमासाठी त्यांची निवड झाली आणि त्यांच्यावर वरिष्ठ संशोधकांच्या गटाचे नेतृत्व सोपविण्यात आले (१९४४). प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी पुरातत्त्व खात्याची शिष्यवृत्ती मिळवून दक्षिण भारतातील महापाषाणीय वास्तूंच्या सर्वेक्षणाच्या कामात तत्कालीन महाअधिक्षक व्ही. डी. कृष्णस्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली भाग घेतला. हे त्यांचे काम व्हीलर यांच्या पसंतीस पडले आणि त्यांनी देशपांडे यांची साहाय्यक पुरातत्त्व अधिक्षक म्हणून पुरातत्त्व खात्याच्या मद्रास परिमंडळात नेमणूक केली (१९४६). पुढे पश्चिम भारतातील पुणे, बडोदा आणि औरंगाबाद येथे त्यांचा मोठा कार्यकाळ व्यतीत होऊन त्यांनी तेथील शैलगृह स्थापत्यरचनेचा अभ्यास केला. विशेषतः अजिंठ्याची जगप्रसिद्ध भित्तिचित्रे, वेरूळ येथील बौद्ध, हिंदू व जैनांची शैलगृहे, तसेच पन्हाळे काजी, भाजे, पितळखोरा, नेणावली इ. लेणी यांवर त्यांचे सुमारे चाळीसहून अधिक शोधनिबंध प्रकाशित झाले. यांपैकी पितळखोरा (जि. औरंगाबाद) येथे सुप्रसिद्ध यक्षमूर्तीसह अनेक मानवी शिल्पे, काही अभिलेख आणि बऱ्याच स्फटिकाच्या वस्तू त्यांना सापडल्या (१९५९); तर भाजे (जि. पुणे) येथील लेण्यात मुख्य चैत्यगृहाच्या छतामधील लाकडी फासळीवर कोरलेली अक्षरे सर्वप्रथम त्यांच्या दृष्टीस पडली. त्यांच्याच प्रयत्नांमुळे ठाणाला, नेणावली व गोमाशी या तीन लेण्यांचा समूह भारत सरकारतर्फे संरक्षित स्मारक म्हणून अधिघोषित केला गेला (१९५४); तर अजिंठा भित्तिचित्रांविषयीचे यथार्थ वर्णन त्यांनी सहलेखक म्हणून लिहिलेल्या व पुरातत्त्व खात्याने प्रकाशित केलेल्या अजंटा म्यूरल्स या पुस्तकात वाचायला मिळते (१९६७). वेरूळ लेण्यांमधील जगप्रसिद्ध एकपाषाणीय कैलास मंदिरावरील त्यांचा अभ्यास उल्लेखनीय होता.
देशपांडे यांनी पुरातत्त्वीय व ऐतिहासिक वास्तूंचे जतन व संवर्धन या विषयात भरीव कार्य केले. स्वातंत्र्योत्तर काळात त्यांच्या नेतृत्त्वाखाली अजिंठा, वेरूळ, पितळखोरा इ. लेणी आणि विजापूरच्या आदिलशाही राजवटीतील गोलघुमट अशा ऐतिहासिक वास्तूंचे विविध उपाययोजनांद्वारे उत्तमरीत्या जतन करण्यात आले. शिवाय कोणार्क व पुरी येथील मंदिरांच्या जतनकार्यासही त्यांच्यामुळे चालना मिळाली. या सर्व जतनकार्याच्या आधारे भारत सरकारने त्यांच्यावर अफगाणिस्तानातील बामीयान येथील तत्कालीन भीमकाय बौद्ध प्रतिमा असलेल्या गुहांची, तसेच कंबोडिया आणि व्हिएतनाम येथील हिंदू व बौद्ध वास्तूंच्या जतनाची जबाबदारी सोपविली. सदर कामांचे त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटनेत (युनेस्को) भारताचे प्रतिनिधित्व केले. याशिवाय फ्रान्स, ग्रीस, इंग्लंड, अमेरिका, क्यूबा, ईजिप्त, इराण, नेपाळ, श्रीलंका, चीन इ. अनेक देशांतही त्यांनी पुरास्थळ अभ्यासदौरे काढले. तसेच तेर (जि. उस्मानाबाद) येथील प्रसिद्ध वस्तुसंग्राहक रामलिंगप्पा लामतुरे यांच्या संग्रहातील मृण्मूर्तींची वर्गवारी करून त्यांच्या वैशिष्ट्यांची बारकाईने नोंद करून ठेवली (१९६१).
देशपांडे यांच्या सर्वेक्षण मोहिमांमुळे नेवासा, बहाळ, टेकवडा इत्यादी महाराष्ट्रातील काही ताम्रपाषाणीय पुरास्थळांचा शोध लागला. यांपैकी खानदेशातील बहाळ (१९५२ व १९५६-५७) व टेकवडा (१९५६-५७) येथे त्यांनी उत्खनन मोहीम राबविली. त्यांच्या दायमाबाद (जि. अहमदनगर) येथील उत्खननामुळे इ. स. पू. दुसऱ्या शतकाच्या सुरुवातीला महाराष्ट्रात स्थिर जीवन असल्याचे पुरावे समोर आले (१९५९). याच ठिकाणी त्यांनी १९७३ मध्ये पुन्हा एकदा उत्खनन मोहीम राबविली. त्यांच्या तामलुक (पश्चिम बंगाल) येथील उत्खननात वेगवेगळ्या स्तरांत शुंगशैली, कुषाण व गुप्तकालीन मृण्मूर्ती सापडल्या (१९५५); तर अंबखेरी (पंजाब) येथील अवशेषांमध्ये हडप्पा पूर्व आणि उत्तर हडप्पा संस्कृतीचा मिलाप त्यांना दिसून आला. त्यांचे सर्वांत महत्त्वाचे सर्वेक्षण म्हणजे लाहौल-स्पिती खोऱ्यामधील टॅबो (Tabo) येथील बौद्ध लेण्यांमध्ये त्यांना मोठ्या प्रमाणात सापडलेली भित्तिचित्रे (१९६५). या चित्रांवर अजिंठा भित्तिचित्र शैलीचा प्रभाव स्पष्टपणे दिसून आल्याने त्यांनी यांचे ‘हिमालयीन अजिंठा’ असे वर्णन केले.
देशपांडे यांनी पुरातत्त्व खात्याचे महानिदेशक म्हणून विविध उपक्रम राबविले. कलावस्तुंची देशाबाहेर होणारी तस्करी रोखण्यासाठी त्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांची परिणती भारतीय पुरावशेष कायदा, १९७२ (Registration of Antiquities Act, 1972) हा कायदा होण्यामध्ये झाली. लंडन येथील वस्तूसंग्राहक नॉर्टन सायमन यांच्या ताब्यातील अमीन (कुरुक्षेत्र, हरयाणा) येथील कुषाणकालीन दोन शिलास्तंभ आणि शिवपुरम (तमिळनाडू) येथील ब्राँझची नटराज मूर्ती परत मिळविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. ते महानिदेशक म्हणून निवृत्त झाले (१९७८) व त्यानंतर मुंबईच्या नेहरू सेंटर येथील डिस्कव्हरी ऑफ इंडिया या प्रकल्पाचे सल्लागार या नात्याने तेथे त्यांनी कलादालनाची उभारणी केली. तसेच सेंटरने दिलेल्या एका शिष्यवृत्तीच्या आधारे संचालक म्हणून पश्चिम भारतातील पन्हाळे काजी (जि. रत्नागिरी) येथील लेणीसमूह तसेच ठाणाला, कोंदिवटे, नेणावली या लेण्यांचे सर्वेक्षण व संशोधन केले (१९८०-८२). यांपैकी पन्हाळे काजी हे ठिकाण म्हणजे प्राचीन हीनयान व मध्ययुगीन तांत्रिक वज्रयान केंद्र असून तिथे एकूण २९ बौद्ध व हिंदू लेणी आहेत. या लेणीसमूहांमध्ये तांत्रिक वज्रयान पंथीयांसाठी महत्त्वाच्या असलेल्या अक्षोभ्य (५ प्रतिमा) व महाचंडरोषण (१ प्रतिमा) या मूर्ती, तसेच नाथ व शैव संप्रदायातील नाथ सिद्ध, भैरव, गणेश, शिव–पार्वती, शिव त्रिमूर्ती, नंदी इ. शिल्पे आणि इतर काही सुट्या मूर्ती (वीरगळ इ.) सापडल्या. देशपांडे यांनी या मूर्तीशिल्पांची नामनिश्चिती आणि स्पष्टीकरण करून पन्हाळे काजी येथील वज्रयान पंथीयांचा संपर्क हा कान्हेरी (बोरिवली, मुंबई) व पूर्व भारतातील बिहार, बंगाल आणि ओडिशा येथील इतर वज्रयान पंथीयांशी असल्याचे सप्रमाण दाखवून दिले. तसेच पुढील काळात या लेण्यामध्ये वज्रयान पंथाची जागा नाथ संप्रदायाने कशी घेतली आणि दोन्ही संप्रदायातील परंपरांचा समन्वय कसा दिसून आला, हेही त्यांनी अभ्यासपूर्ण रितीने मांडले. पन्हाळे काजी येथील त्यांच्या संशोधन कार्यामुळे महाराष्ट्रातील धार्मिक व सांस्कृतिक इतिहासावर प्रकाश पडला.
मुळातच देशपांडे यांचा भक्तीमार्गाकडे ओढा असल्याने त्यांनी आधुनिक तत्त्वज्ञ-संत आणि डेक्कन कॉलेजचे माजी विद्यार्थी असलेल्या गुरुदेव रामचंद्र दत्तात्रेय रानडे यांचे आध्यात्मिक क्षेत्रात शिष्यत्व पतकरलेले होते. प्राचीन साहित्य विशेषत: ज्ञानेश्वरी ग्रंथाचा त्यांचा गाढा अभ्यास होता. त्या आधारे त्यांनी पुरातत्त्वशास्त्र, प्राचीन भारतीय कला व स्थापत्य आणि भारतीय तत्त्वज्ञान यांचा असलेला परस्पर संबंध उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केला. उदा. वेरूळचे कैलास मंदिर आणि शंकराचार्यांचा अद्वैतवादाचा सिद्धांत; तसेच पन्हाळे काजी येथील लेण्यांमध्ये बौद्ध तांत्रिक वज्रयान पंथात असलेली आणि पुढे नाथ संप्रदायाने अनुसरलेली ८४ सिद्धांची परंपरा इत्यादी.
पुरातत्त्व क्षेत्रातील देशपांडे यांच्या विविधांगी कार्याबद्दल डेक्कन कॉलेजतर्फे त्यांना सन्माननीय डी. लिट्. ही पदवी प्रदान करण्यात आली (२००७).
दिवाळी अंकातील वेरूळवरील त्यांच्या एका प्रदीर्घ लेखाचे (मराठवाडा दिवाळी अंक, १९५८) रूपांतर वेरूळ लेणी या पुस्तकात करण्यात आले आहे (२०१९). हे त्यांचे मरणोत्तर प्रसिद्ध झालेले शेवटचे पुस्तक होय.
संदर्भ:
- Annual Report (2006-2007), Conferment of Honorary Degree of Doctor of Letters on Shri M. N. Deshapande and his Reply, Pages 21-24, Deccan College, Post-Graduate and Research Institute, Pune.
- Dhavalikar, M. K., ‘Shri M. N. Deshpande – A Biographical Sketch’, Madhu: Recent Researches in Indian Archaeology and Art History – Shri M. N. Deshpande Festschrift, Pages IX-X, Agam Kala Prakashan, Delhi 1981.
- देशपांडे, मधुसूदन नरहर, वेरुळ लेणी, पुणे, २०१९.
- पाठक, अरुणचंद्र, ‘देशपांडे, मधुसूदन नरहरʼ, प्राच्यविद्या, शिल्पकार चरित्रकोश, खंड ८, भाग १, पुणे, २०१८.
- विदर्भ संशोधन मंडळ वार्षिक, १९८० (पृ. क्र. २२८-२२९, २४६-२४७ आणि २५६).
समीक्षक : मंजिरी भालेराव