केरळ राज्यातील मुख्यत: इडुक्की जिल्ह्यात वास्तव्यास असणारी एक जमात. त्यांची वस्ती तमिळनाडू राज्याच्या काही जिल्ह्यांमध्येही आढळते. २०११ च्या जनगणनेनुसार त्यांची
लोकसंख्या १,३६,००० इतकी होती. नेरीयममंगलमच्या मदुरा या राजाचे हे लोक वंशज असून जमातीला सुमारे सहाशे वर्षांचा वारसा आहे. त्रावणकोरच्या डोंगराळ भागातून आले असल्याचा त्यांचा समज आहे. कुडी किंवा कुरा ही त्यांची मातृभाषा असून एकमेकांशी बोलताना व लिहिताना ते मल्याळी भाषेचा वापर करतात.
मन्नान लोकांच्या शरीराचा बांधा लहान असून डोके रुंद व गोल, बुचके नाक चेहरा लहान असतो. पुरुष धोतर व लुंगी, सदरा आणि डोक्याला दुपट्टा बांधतात; तर स्त्रीया लुगडी, साडी व चोळी परिधान करतात. शहराच्या जवळपास असणारे शिक्षित मन्नान मुले व मुली आधुनिक पेहराव करतात. त्यांची वस्ती मुख्य रस्त्याच्या ३० ते ४० किलोमीटरपासून आत जंगलामध्ये असल्याचे दिसते. त्यामुळे ते लोक बुजरे आहेत. ते आपल्या लोकांशिवाय इतर अनोळखी लोकांशी संबंध ठेवण्यास कतरतात. प्रत्येक खेड्यात १० ते ५० घरे असतात. मन्नान जमातीची घरे ही उतरत्या डोंगराळ भागात जिथे शेतीची लागवड झालेली असते अशा ठिकाणी बांधलेली असतात. बहुधा घरे मातीची असतात, तर काही हाताने बनविलेल्या विटांची असतात. त्याशिवाय बांबू आणि झाडांच्या पानांचा वापर करून घरे बांधली जातात. वन विभागाने प्रत्येक खेड्यात एक ग्राम नेता (थलाइवर) व एक ग्राम प्रमुख (कानी) यांची नियुक्ती नेमणूक केली असून ते बाहेरील लोक आणि मन्नान लोक यांचे मध्यस्थी म्हणून काम पाहतात. तसेच ते खास प्रसंगी खेड्यातील सर्व मन्नान लोकांना एकत्र जमवून विविध विषयांवर मार्गदर्शनही करतात.
मन्नान जमातीत आरव आणि पानया ही दोन कुळी आहेत. कपडे धुणे (धोबी) हा त्यांचा पारंपारिक व्यवसाय होय. याशिवाय बदली पिकांची लागवड, सापळा रचून प्राणी व पक्षी पकडणे, नारळ उतरविणे, पशुसंवर्धन करणे, चटया तयार करणे, बांबूपासून विविध पारंपारिक वस्तू बनविणे इत्यादी व्यवसायही मन्नान जमातीची लोक करतात. आज शिक्षणामुळे काही मन्नान लोक सरकारी नोकरी, नैसर्गिक वैद्यकीय सेवा अशा अनेक व्यवसायांत काम करताना दिसत आहेत; मात्र या लोकांत शिक्षणाचे प्रमाण फार कमी असल्याचे दिसून येते.
मन्नान लोक शाकाहारी व मांसाहारी आहेत; परंतु ते गोमांस आणि डुकराचे मांस खात नाहीत. भात हे यांचे मुख्य अन्न असून त्याशिवाय नाचणी, कंदमुळेसुध्दा त्यांचे प्रमुख अन्न आहे.
मन्नान जमातीत आत्ते-मामे भावासोबत तसेच बहिणीसोबत एकमेकांमध्ये लग्न होतात. मुलगी १३ वर्षांची झाल्यावर ती लग्नाला योग्य झाली अशी यांची मान्यता असते. त्यामुळे तिचे लग्न जुळेपर्यंत तीला जंगलातील ‘सथ्राम’ या ठिकाणी ठेवण्यात येते. त्यांची
देखभाल वृद्ध महिला करतात. जंगलातील मुलीला जो कोणी शोधेल त्याच्याशी तिचे लग्न लावण्यात येते. लग्नाच्या वेळी तिच्या अंगावर हळदीचे पाणी शिंपडण्याची प्रथा आहे.
डोंगरावर त्यांच्या पूर्वजांचे आत्मे वास करतात, असा मन्नान लोकांचा समज असल्याने ते डोंगराला देव माणून त्याची पूजा करतात. तसेच मदुराई येथील मीनाक्षी देवीची हे लोक उपासना
करतात. बाह्य समाजाशी त्यांचा संपर्क येत असल्याने काही मन्नान लोक शंकर, विष्णू, गणपती, भगवती इत्यादी हिंदू देव-देवतांचीही उपासना करतात. ‘पुरमवेल्ला’ हा जमातीचा पारंपारिक सण असून पोंगल, मकर विलाक्कू आणि कांजीवेप्पू हेही सण ते उत्साहाने साजरे करतात. वार्षिक उत्सवात सर्व मन्नान लोक व त्यांचा वंशपरंपरागत व जंगलाचा राजा एकत्र येतात. राजा या लोकांचे नेतृत्व करतो. या वेळी ते पारंपारिक नृत्य, गाणी असे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात साजरे करतात. त्रिचूर आणि मलबार येथील मन्नान जमातीची लोक त्यांचे सर्व पारंपारिक सण खूप चांगल्या प्रकारे जपतात. मन्नान लोक मृत व्यक्तिचे दहन करतात.
संदर्भ : Singh, K. S., People of India : Anthropological Survey of India, 1998.
समिक्षक : लता छत्रे