ओरेयाना, फ्रांथीस्को दे (Orellana, Francisco De) : (१४९०? – १५४६). स्पॅनिश सेनानी व संपूर्ण ॲमेझॉन नदीचे समन्वेषण करणारे पहिले समन्वेषक. त्यांचा जन्म स्पेनमधील त्रूहीयो येथे झाला. त्यांच्या पत्नीचे नाव ॲना दे याला होते. ओरेयाना यांच्या पूर्वायुष्यासंबंधी फारशी माहिती उपलब्ध नाही. दक्षिण अमेरिकेतील पेरू जिंकणार्या पिझारो या समन्वेषकांचा ते नातेवाईक व प्रमुख साथीदार होते (१५३५). ओरेयाना यांनी काही साथीदारांसह पिझोरा यांची साथ सोडली व आणखी प्रदेशांची शोधमोहीम हाती घेतली. सध्याच्या एक्वादोरमधील ग्वायाकील शहरी ते गेले व १५३८ मध्ये त्या प्रदेशाचे गव्हर्नर झाले.
ओरेयाना हे पिझोरा यांचा सावत्र भाऊ गाँथालो यांच्या एक्वादोरमधील कीटोच्या पूर्वेकडील प्रदेशाच्या समन्वेषण मोहिमेत लेफ्टनंट होते. या मोहिमेत पुढील तयारीसाठी ओरेयाना यांना ५० साथीदारांसह एप्रिल १५४१ मध्ये पुढे पाठविण्यात आले होते. ते नापो व मारान्यॉन या नद्यांच्या संगमावर पोहोचले. त्यानंतर पिझोरा यांना परत मिळण्यास त्यांच्या साथीदारांनी असमर्थता दर्शविली. त्याबदल्यात त्यांनी सहकार्यांच्या मदतीने ॲमेझॉन नदीच्या उगमापासून (अँडीज पर्वत) मुखापर्यंतच्या (अटलांटिक महासागर) नदीप्रणालीचा अभ्यास केला. ऑगस्ट १५४२ मध्ये त्यांचे जहाज ॲमेझॉन नदीमुखाशी पोहोचले. अशक्य वाटणारे हे काम ओरेयाना यांनी शक्य करून दाखविल्याने काहींनी या नदीला त्यांचेच ओरेयाना (रीओ दे ओरेयाना) हे नाव दिले; परंतु या नदीकाठी तिरकमठे घेऊन लढणार्या स्त्रिया (लांब केसांचे पुरुष असण्याची शक्यता) पाहून ओरेयाना यांनी या नदीला ‘ॲमेझॉन’ (लढाऊ स्त्री) असे नाव दिले. पुढे त्रिनिदाद येथे जाऊन ते स्पेनला परतले.
ओरेयाना यांनी समन्वेषित भागाच्या हक्कांसाठीचे प्रयत्न चालू केले होते; परंतु स्पेनचा राजा व पोर्तुगाल यांच्यात या प्रदेशाच्या मालकीविषयी संघर्ष चालू होता. त्यामुळे ओरेयाना यांना मदत मिळाली; परंतु अधिकृत पाठिंबा मिळू शकला नाही. १५४४ मध्ये ते या मोहिमेवर पुन्हा गेले; परंतु नोव्हेंबर १५४६ रोजी त्यांचे जहाज नदीमुखाशी उलटले. त्यातच ते व त्यांचे साथीदार बुडून मृत्यू पावले.
ओरेयाना आपल्या ऐतिहासिक कामगिरीमुळे एक्वादोर येथे प्रसिद्ध असून तेथे त्यांच्या नावाने रस्ते, शाळा आणि प्रांतसुद्धा आहेत.
समीक्षक : अविनाश पंडित