मायर, जॉर्ज व्हॉन 

(१२ फेब्रुवारी १८४१ – ६ सप्टेंबर १९२५)

 

जॉर्ज मायर यांचा जन्म जर्मनीतील फ्रँकोनियामधील वुर्झबर्ग (Wurzburg) येथे झाला. मायर यांचे वडील गणित व खगोलशास्त्र या विषयांचे प्राध्यापक होते, तरी मायर यांनी म्यूनिक येथे कायदा आणि राज्यशास्त्र याचा अभ्यास केला. मायर यांची बावेरीअन (Bavarian) सांख्यिकी केंद्र येथे नेमणूक झाली. तिथे मायर यांनी साहाय्यक प्राध्यापक म्हणून काम केले आणि गुन्हेविषयक संख्याशास्त्र या विषयावर प्रबंधासाठी काम केले. मायर यांना म्यूनिक विद्यापीठाच्या संख्याशास्त्र विभागाकडून अधिवासन (Habilitation) मिळाले. पुढे त्यांची तिथे असामान्य प्राध्यापक (Professor Extraordinarius) म्हणून नेमणूक झाली.

मायर १८६९-७९ या काळात बावेरीअन सांख्यिकी केंद्राचे संचालक होते. याच दशकात बिस्मार्कचे साम्राज्य उदयाला आले व त्याची उभारणी झाली. जनगणनाधारित या संरचनेत संख्याशास्त्र हे महत्त्वाचे साधन म्हणून वापरले गेले. या सर्व विकास कार्यात मायर आघाडीवर होते. सुरुवातीस सांख्यिकी केंद्राच्या वैज्ञानिक कार्यात आणि नंतर पूर्ण राज्यात ते सुधारणावादी वकील म्हणूनच ओळखले जाऊ लागले. बावेरीअन सांख्यिकी केंद्राचा प्रमुख म्हणून मिळालेल्या अनुभवामुळे मायर यांना जर्मनीमधील इतर भागात असलेल्या सांख्यिकी केंद्रांची पुनर्रचना आणि आधारसामग्री मिळवणे आणि विश्लेषण पद्धतींचे केंद्रीकरण करणे शक्य झाले १८६९ मध्ये त्यांनी केंद्राच्या उपक्रमांची तसेच जनगणनेची माहिती देण्यासाठी Zeitschrift des Königlich Bayerischen Statistischen Büros या जर्नलची स्थापना केली.

संख्याशास्त्रातील वर्णनात्मक आधारसामग्रीला आलेख आणि आकृतीमध्ये रुपांतरीत करण्याचा मान मायर यांच्याकडे जातो. त्या संदर्भात पुढील गोष्टी त्यांनी केल्या : १) दोन चलांसाठी रंगीत नकाशाचा वापर आणि २) आधारसामग्री दर्शविण्यासाठी प्रमाणबद्ध चौरसांचा पहिल्यांदाच वापर. तसेच आधारसामग्रीच्या मांडणीसाठी ध्रुवीय आकृती (Polar figure) आणि तारांकित आलेखन (star studded graphs) याचाही पहिल्यांदा वापर मायर यांनीच केला.

पॅरीस येथे भरलेल्या आय. एस. आय. (International Statistical Institute) काँग्रेसमध्ये मायर यांनी आपल्या आलेखीय पद्धतीवर विस्तृत विवेचन केले. त्यामुळे संख्याशास्त्रीय विश्लेषण आणि सादरीकरण प्रभावी करण्यास चालना मिळाली. मायर यांनी Allgemeines Statistisches Archiv हे जर्नल सुरू करून त्याचे संपादनही केले. ड्रेस्डेन येथे स्थापन झालेल्या जर्मन संख्याशास्त्र संस्थेचे ते प्रमुख होते आणि सदर जर्नलचे प्रकाशन हा त्या संस्थेच्या कार्याचा एक महत्त्वाचा भाग झाला. म्यूनिक विद्यापीठात स्थापन केलेल्या संख्याशास्त्राच्या चर्चासत्रात त्यांनी आयुर्विम्याचा भागही अंतर्भूत केला. यामुळे गणिताची वा प्रशासकीय पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना आयुर्विम्यातील पदविका प्राप्त करणे शक्य झाले. राजकीय अर्थशास्त्र, भूगोल, समाजशास्त्र अशा विविध विषयात विखुरलेल्या संख्याशास्त्र विषयाला वेगळे काढून मोठ्या प्रमाणातील सामाजिक घटनांचे अचूक विज्ञान म्हणून त्याची स्वतंत्र ओळख निर्माण करण्यात मायर यांचा सक्रीय सहभाग होता.

मायर हे निवृत्त झाल्यानंतरही म्यूनिक विद्यापीठात मानद प्राध्यापक (Emeritus) या पदावर कार्यरत होते.

मायर यांची संख्याशास्त्रावर जर्मन भाषेतील पुस्तके अशी आहेत: १. Begriff Und Gliederung Der Staatswissenschaften. ZurEinfuhrung in Deren Studium, २. Statistik und Gesellschaftslehre

संदर्भ :

                                                                            समीक्षक : पाटकर, विवेक