वैमानिकी टर्बाइन इंधन हे विमानामध्ये वापरले जाणारे अतिशुध्द स्वरूपाचे केरोसीन होय. दोन ठिकाणांमधील अंतर अधिक असल्यास प्रवासाकरिता विमानाचा वापर केला जातो. दोन्ही ठिकाणांतील हवामानात फरक असतो. तसेच हवाईमार्गाचे वातावरण भिन्न स्वरूपाचे असते. अशा परिस्थितीमध्ये एटीएफ हे इंधन विमानाच्या एंजिनाला सतत ऊर्जा पुरवीत असते. अति उष्णतेमुळे याचे संप्लवन होत नाही तसेच शीत तापमानामुळे ते गोठत नाही. हे इंधन जळत असताना काळा धूर बाहेर पडत नाही. शिवाय विमान आकाशातून उडत असताना त्याचे हवेशी घर्षण होते. परिणामी मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण होते. परंतु एटीएफ या इंधनावर त्या उष्णतेचा काही विपरित परिणाम होत नाही.
हे इंधन जरी ठिणगी प्रज्वलन (Spark ignition) प्रकारच्या एंजिनासाठी वापरत असले तरी त्याची प्रतिइंधनी आघात क्षमता (Anti-knocking ability) तितकीशी महत्त्वाची नसते.
प्रकार : एटीएफ हे इंधन दोन प्रकारचे असते. जगभर मोठ्या प्रमाणात वापरत असलेले एटीएफ हे केरोसीनसदृश असते, तर दुसऱ्या प्रकारामध्ये पेट्रोलचे प्रमाण जास्त असते.
गुणधर्म : एटीएफ हे दहा ते तेरा कार्बनयुक्त हायड्रोकार्बन रसायनांनी बनलेले असते. हे १५०-२५०० से. तापमानादरम्यान उकळते. त्याच्या ऊर्ध्वपातनाचा समतोल राखला जावा, यासाठी त्याचे १०,२०,५० व ९० % प्रमाण विशिष्ट तापमानाला उकळले जावे ही दक्षता घेतली जाते. त्यात अत्यल्प प्रमाणात गंधक आणि रासायनिक पुरकांचा अंश असतो. या इंधनात ओलेफिन आणि अॅरोमेटिक हायड्रोकार्बन रसायने मर्यादित असतात. त्यामुळे ते जळताना धूर येत नसतो आणि टर्बाइनवर कार्बनची पूड जमा होत नाही. एंजिनातील भाग गंजू नयेत व घाणेरडा वास बाहेर पडू नये म्हणून त्यातील गंधकाचे प्रमाण अत्यल्प ठेवले जाते.
सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या इंधनाचा प्रज्वलन बिंदू (flash point) किमान ३८० से. असावा लागतो. थंड हवामानाचा विपरित परिणाम होऊ नये म्हणून त्याचा गोठनबिंदू – ४७० से. तसेच त्याची विष्यंदता -२०० से. तापमानाला ८ सेंटीस्टॉक राखावी लागते. या इंधनाचा धूमबिंदू (Smoke point) किमान २० मिमी. असतो व त्याद्वारे त्याची धूर उत्सर्जित करण्याची क्षमता नियंत्रित केली जाते. अशा विविध गुणधर्मांनी परिपूर्ण असलेल्या या इंधनाची ज्वलनक्षमता उच्च दर्जाची असते.
उपयोग : हे इंधन विमानाच्या टर्बाइन परिचालित (Turbo-propelled) एंजिन व जेट एंजिन यांमध्ये वापरतात.
संदर्भ :
1. Aviation Quality Control manual, DGCA, New Delhi, 1984.
2. Know Your Product, BPCL, Mumbai, 2002.
3. Product Manual, Quality Control Cell, BPCL, Mumbai, 2007.