पेट्रोलियम पदार्थांमध्ये डीझेल या इंधनाचा सर्वांत जास्त वापर असतो.

इतिहास : डीझेलवर चालणाऱ्या यंत्राचा शोध रूडॉल्फ डीझेल या जर्मन तंत्रज्ञाने १८९३ मध्ये लावला. त्यावरून त्या इंधनाला डीझेल हे नाव पडले.

घटक व गुणधर्म : डीझेल हे इंधन १६ ते २२ कार्बन अणूच्या हायड्रोकार्बन रसायनांच्या मिश्रणाने युक्त असते. याची घनता प्रति लिटर ८०० ते ८५० ग्रॅ. इतकी असते. निष्कर्षित खनिज तेलाच्या भूप्रदेशानुसार डीझेलचा रंग फिकट पिवळा, पिवळा, खाकी किंवा रंगहीन असा दिसून येतो. हे साधारणत: १२०—३९९ से. तापमानादरम्यान उकळते. त्यातील मेणाचा अंश काढावा लागतो, अन्यथा ते थंडाव्याच्या ठिकाणी गोठते. तसेच डीझेलमध्ये अंशत: सल्फरचे प्रमाण देखील आढळते. सल्फरमुळे होणारे वातावरणाचे प्रदूषण टाळण्यासाठी तेलशुध्दिकरण कारखान्यात हायड्रोडीसल्फरीकरण (Hydrodesulphurisation, HDS) प्रक्रिया करावी लागते.

पेट्रोल आणि डीझेल यांचा तुलनात्मक अभ्यास : (१) एंजिन प्रकार : पेट्रोल आणि डीझेलवर चालणारी एंजिने अंतर्गत ज्वलन (Internal combustion) प्रकारची असतात. पेट्रोलचालित एंजिन हे ठिणगी प्रज्वलन (Spark ignition) स्वरूपाचे असते तर डीझेलचालित एंजिन संपीडित ज्वलन (compression ignition) तत्त्वावर चालते.

(२) श्यानता (Viscosity): डीझेल हे इंधन पेट्रोलपेक्षा काहीसे जाडसर असते.

(३) ज्वलन : डीझेलची एंजिनात कार्य करण्याची पद्धत पेट्रोलपेक्षा वेगळी असते. हे इंधन एंजिनातील नळकांड्यात अति दाबाखाली पेट घेते. डीझेलच्या एंजिनात पेट्रोल एंजिनाप्रमाणे ठिणगी पाडणाऱ्या प्लगची आवश्यकता नसते. एंजिनातील संपीडित हवा इतकी गरम होते की, तिच्या संपर्कात येताच इंधन जळू लागते.

(४) ज्वलनक्षमतामापन : पेट्रोलच्या ऑक्टेन निर्देशांकाप्रमाणे डीझेलची ज्वलनक्षमता ही सिटेन निर्देशांकाने मोजली जाते.

रेल्वे, जहाजे, ट्रक-बसगाड्या, जनित्रे चालविण्यासाठी डीझेल इंधनाचा वापर होतो. ५०० आवर्तने (आरपीएम) या वेगाने धावणाऱ्या वाहनात किवा फिरणाऱ्या यंत्रात वापरल्या जाणाऱ्या डीझेल इंधनाला उच्चवेगी डीझेल (High Speed Diesel, HSD) म्हणतात. शेतीपंपासारख्या ५०० आवर्तनांपेक्षा कमी वेगाने चालणाऱ्या साधनात हलके डीझेल तेल (Light Diesel Oil, LDO) वापरतात.

पहा : सिटेन निर्देशांक, हायड्रोडीसल्फरीकरण.