योगकुण्डल्युपनिषद् हे कृष्णयजुर्वेदाशी संबंधित असून ह्यात एकूण तीन अध्याय आहेत. आसने, शक्ति-चालन, प्राणायाम, बंध, समाधियोग, खेचरी-मुद्रा ही साधना तसेच ब्रह्म, त्याचे स्वरूप, ब्रह्मसिद्धीचे उपाय, जीवनमुक्ती व विदेहमुक्ती ह्याविषयीचे विवेचन या उपनिषदात आले आहे.

पहिल्या अध्यायात सुरुवातीलाच म्हटले आहे की, चित्तावर नियंत्रण मिळविण्यासाठी वासना व वायू ह्या दोहोंवर विजय मिळविणे महत्त्वाचे असून त्यापैकी वायुजयासाठी मिताहार, आसने व शक्तिचालन ह्या तीन गोष्टी आवश्यक आहेत. मिताहार म्हणजे पोटाचा चौथा भाग मोकळा ठेऊन घेतलेला, स्निग्ध व मधुर (सौम्य) असा आहार होय. यानंतर पद्मासन व वज्रासनाचे  थोडक्यात विवेचन येते. शक्तिचालन म्हणजे कुंडलिनी शक्ती जागृत करून मूलाधार चक्रापासून तिला दोन्ही भुवयांच्या मध्यभागातील केंद्रापर्यंत आणणे. यासाठी असलेली दोन साधने म्हणजे सरस्वतीशक्ति-चालन व प्राणायाम. सरस्वती हीच अरुंधती होय असे सांगून तिच्या चालनानेच कुंडलिनी शक्तीचे चालन संभवते असे प्रतिपादन केले आहे (१.९-१०). शिवसंहितेनुसार वैष्णवी, सरस्वती आणि चित्रिणी ही सुषुम्नेची नावे आहेत. या नाडीतील चक्रांवर ध्यान केल्याने योग्याची  सर्व पापे नष्ट होतात आणि त्याला परमशांती, अमृतत्व अर्थात् मोक्ष प्राप्त होतो. या कारणामुळे सरस्वती चालन महत्त्वाचे आहे.

प्राण म्हणजे देहगत वायू असून त्याचा आयाम (नियमन) म्हणजेच कुंभक होय. कुंभक सहित व केवल अशा दोन प्रकारचा असतो. सहित कुंभक म्हणजे पूरक व रेचक यांच्यासह  केलेला कुंभक. श्वासोच्छवास आपोआप बंद होऊन ज्यावेळी श्वास स्वभावतःच आत किंवा बाहेर रोखला जातो, म्हणजेच जेव्हा कुंभक आपोआप घडतो, तेव्हा त्याला ‘केवल कुंभक’ अशी संज्ञा आहे. कुंभकाचे सूर्य, उज्जायी, शीतली व भस्त्री असे प्रकार वर्णिले आहेत. यांना सहित कुंभक असे म्हटले आहे (१.१९-२१).

त्यानंतर मूल, उडि्डयान व जालंधर बंध यांचे विवेचन येते. योगाभ्यासात येणारे दहा प्रकारचे अडथळे — रोग आणि त्यामुळे साधनेचा त्याग, संशय, प्रमाद, आळस, निद्रा, विरती, भ्रांती, वासनांमधील आसक्ती, ज्याचा याठिकाणी अंतर्भाव नाही असे अनामिक विघ्न (अनाख्य) आणि योग सिद्ध न होणे यांविषयी सांगून साधकाने ते विचारपूर्वक टाळावेत असे म्हटले आहे (१.५६-६१). पतंजलींनी नमूद केलेले अडथळे निराळे आहेत. ते पुढीलप्रमाणे — व्याधी, चित्ताला कोणतेही कार्य करण्याची इच्छा न होणे (स्त्यान), एखाद्या वस्तूविषयी किंवा क्रियेविषयी निश्चित ज्ञान न होणे (संशय), चित्ताच्या एकाग्रतेचे उपाय जाणूनही त्यांचे अनुसरण न करणे (प्रमाद), आळस, वैराग्याचा अभाव (अविरती), विपरीत किंवा भ्रमरूप ज्ञान (भ्रान्तिदर्शन), योग्याने प्रयत्न करूनही काही न काही कारणामुळे योगातील एखाद्या स्थानाची किंवा लक्ष्याची प्राप्ती न होणे (अलब्धभूमिकत्व), योगातील विशिष्ट स्थान किंवा लक्ष्य प्राप्त होऊनही तेथे स्थिरता प्राप्त न होणे (अनवस्थितत्व) (योगसूत्र १.३०).

कुंडलिनीयोगाच्या संदर्भात साधक योग्य प्राणायामाच्या साहाय्याने कुंडलिनी शक्ती जागृत करतो व त्यानंतर ती शक्ती सुषुम्ना नाडीतून मार्गक्रमण करीत, मूलाधारात स्थित असलेल्या ब्रह्मग्रंथीचा, हृदयात असलेल्या विष्णुग्रंथीचा व आज्ञाचक्रात असलेल्या रुद्रग्रंथीचा भेद करीत, आठ प्रकृतींसह (पृथ्वी, आप, तेज, वायु, आकाश, मन, बुद्धि व अहंकार) सहस्रारचक्राच्या ठिकाणी शिवपदी पोहचते. तेव्हा साधक चिन्मयरूप होतो (१.६२-८१). सहस्रार कमळाच्या ठिकाणी अनुभवलेले हे शिव-शक्तीचे आनंदरूप सामरस्य हाच समाधी योग, हीच परा अवस्था होय, ही मोक्षाचे कारण आहे (१.८२-८७).

दुसऱ्या अध्यायात खेचरी विद्या, तिचे माहात्म्य, खेचरी मुद्रेची कृती, खेचरी-मंत्ररहस्य व जप इत्यादिविषयी सांगून खेचरीची साधना कशी करावी हे विस्ताराने सांगितले आहे.

तिसऱ्या अध्यायात ब्रह्मदेवाच्या प्रश्नाला उत्तर देताना शिव तीन प्रकारच्या दृष्टीचे वर्णन करतात. मनाशी एकरूप झालेली दृष्टी ही तीन प्रकारची आहे — अमावस्या (पूर्णपणे मिटलेली अर्थात् प्रकाशरहित), प्रतिपदा (अर्धवट उघडलेली अर्थात् अल्प प्रकाश असलेली) व पौर्णिमा (पूर्णपणे विकसित अर्थात् पूर्ण प्रकाश असलेली). साधनेच्या मार्गात लक्ष्याचे दर्शन होण्यासाठी पौर्णिमा दृष्टी श्रेष्ठ ठरते आणि म्हणून ही दृष्टी प्राप्त होण्याची साधना वर्णन केली आहे. ती साधना  प्राणायामावर आधारित आहे. साधकाने काम व विषयवासनेचा त्याग करून मन हेच उत्पत्तीचे कारण आहे असे जाणावे. चंद्र व सूर्य नाडीतील शक्ती (वायू) नासिकेच्या ठिकाणी नियंत्रित करावी, म्हणजेच सुषुम्ना नाडीत आणावी आणि सहा चक्रांचे भेदन करावे (३.३-११). षट्चक्रांच्या भेदनानंतर सहस्रार चक्रात प्रवेश करावा. ऊर्ध्वगामी प्राणाच्या योगे साधक ब्रह्मांडमय होतो.

ह्यानंतरच्या भागात ब्रह्मविषयक विवेचन आलेले आहे. गुरुमुखातून आलेल्या शब्दांनी ब्रह्मज्ञान प्राप्त होते. ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी गुरु हा कर्णधार होय असे प्रतिपादन केले आहे. आत्मा परा, पश्यंती, मध्यमा व वैखरी या चारही प्रकारच्या वाणीच्या पलिकडे आहे.  विश्व, तैजस, प्राज्ञ या अनुक्रमे जाग्रत्, स्वप्न, सुषुप्ति या तीन अवस्थेतील आत्मा हा पिंड होय तर समष्टिरूपातील विराट, हिरण्यगर्भ, ईश्वररूपी आत्मा ब्रह्मांड होय. ब्रह्म तेज व तमाच्या पलिकडे तसेच अनिर्वचनीय व अव्यक्त आहे. आत्मस्वरूपाचे ध्यान हा ब्रह्मसिद्धीचा उपाय होय. अज्ञानाने कल्पिलेल्या प्रपंचापासून मुक्त झाल्यावर विदेह असे आत्मरूप शिल्लक राहते. ह्याच अनुषंगाने येथे जीवनमुक्ती व विदेह्मुक्ती ह्या अवस्था वर्णिल्या आहेत. मृत्यू येईपर्यंत जो मुनि सतत म्हणजे झोपेत देखील ध्यानमग्न राहतो तो खरा जीवन्मुक्त अशी त्याची ओळख येथे सांगितली आहे. आणि ह्या जीवन्मुक्तीचाही त्याग करून, शरीर भस्मीभूत झाल्यावर जो प्राण-अपानाच्या स्पंदनापलीकडे पोहचतो तो विदेहमुक्त होय (३.३३-३४).

मुक्ती अवस्थेत अशब्द, अस्पर्श, अरूप, अव्यय, अनादि, अनंत, अढळ, अमल, निरामय, रसातीत, नित्य, गन्धातीत,  बुद्धीच्या पलिकडे असलेले असे ब्रह्म शिल्लक राहते.

सरस्वती चालन हे या उपनिषदाचे वेगळेपण आहे.

समीक्षक : प्राची पाठक