महर्षि शाण्डिल्य ह्यांनी सांगितलेले ब्रह्मज्ञान म्हणजे शाण्डिल्योपनिषद् होय. हा ग्रंथ गद्य-पद्यात्मक असून त्यात एकूण तीन अध्याय आहेत. त्यातील वर्ण्य विषय विविध खंडांमध्ये विभागला आहे. शाण्डिल्य मुनींना अथर्व ऋषींकडून प्राप्त झालेली कल्याणकारी ब्रह्मविद्या, त्या विद्येची प्राप्ती करून देणारा अष्टांगयोग, तसेच हठयोगातील काही प्रक्रिया ह्या सर्वांचे विस्तृत वर्णन या ग्रंथात येते. एकूण ह्या ग्रंथात योगदर्शन व वेदांतदर्शन ह्यांचा सुरेख व सुबोध मेळ घातलेला दिसतो.

ग्रंथाच्या पहिल्या अध्यायात अष्टांगयोगाचे विस्तृत वर्णन येते. ह्यात यम व नियमाचे प्रत्येकी दहा प्रकार, आठ प्रकारची आसने, तीन प्रकारचा प्राणायाम, पाच प्रकारचे प्रत्याहार, पाच प्रकारची धारणा, ध्यानाचे दोन प्रकार (सगुण आणि निर्गुण) आणि समाधी ह्याविषयी विवेचन आढळते. तसेच नाडीसंख्या, त्यांचे शरीरातील स्थान व त्यांची शुद्धी; कुंडलिनी शक्ती; प्राण, अपान, इ. दहा वायू व त्यांचे व्यापार; वैष्णवी तसेच खेचरी मुद्रा व त्यांचे लाभ, इत्यादी अनेक बाबींवर विस्तृत चर्चा केलेली आढळते. जो योगाभ्यासाद्वारे शरीरस्थ प्राणावर अग्नीच्या साह्याने नियंत्रण मिळवतो तो योगी श्रेष्ठ ठरतो, असे सांगून पुढे मनुष्य, चतुष्पाद प्राणी व पक्ष्यांच्या शरीरातील क्रमाने त्रिकोण, चतुष्कोण व वर्तुळाकार अग्नि-स्थानांची माहिती दिलेली आहे (१.४.३-४). कुंडलिनीचे स्थान नाभीच्या जवळ असल्याचे ह्या ग्रंथात नमूद केलेले असून ती आठ प्रकारच्या प्रकृतीने युक्त आहे असेही म्हटले आहे (१.४.८). मूलबंधाद्वारे अपान वायूला ऊर्ध्वदिशेकडे नेणे व प्राणाला कंठाद्वारे खालच्या दिशेने नेणे व अशा रीतीने या दोघांचा संयोग साधणे याला याठिकाणी योग म्हटले आहे. प्राणायामांचे उज्जायी, सीत्कारी इत्यादी प्रकार सांगितले आहेत.

धारणेचे विशेष सांगताना शरीराच्या जीभ, डोळे, कान, पाय, सांधे, हृदय, कंठ इत्यादी अनेक ठिकाणी तसेच सूर्य, चंद्र, ध्रुवतारा इत्यादी ठिकाणीही वायूच्या साह्याने चित्तसंयमन केल्यास होणारे विविध लाभ वर्णिले आहेत (१.७.४७-५२). प्रत्याहाराच्या पाच प्रकारांपैकी वैशिष्ट्यपूर्ण प्रकार म्हणजे जे जे दृष्टीपथास येईल ते ते सर्व आत्मरूप आहे असे जाणणे; तसेच नित्य करावयाच्या विहित कर्मांच्या फळांचा त्याग करणे; त्याचप्रमाणे अठरा प्रकारच्या मर्मस्थानांमध्ये चित्ताला एकाग्र करणे (१.८.१).

दुसऱ्या अध्यायात निराकार ब्रह्मस्वरूप वर्णिले आहे. सत्य-विज्ञान-आनंदरूप असलेले परब्रह्म हे अत्यंत सूक्ष्म, सर्वव्यापी, निरंजन, निष्क्रिय, चैतन्यमय, अनंत, अचिंत्य असून सर्व प्राणिमात्रात तेच आत्मा ह्या रूपात आहे. ते परमतत्त्व केवळ योगज्ञानाद्वारेच जाणता येते. आत्मज्ञान झाल्यावर साधकाच्या शोकाचा अंत होतो व त्यास शाश्वत आनंद प्राप्त होतो. (२.३-६).

निष्क्रिय असे परब्रह्म विश्वोत्पत्ती कशी करते ह्या प्रश्नावर उत्तर देताना तिसऱ्या अध्यायात अथर्व ऋषि म्हणतात की, परब्रह्म जरी निष्क्रिय असले तरी ते सकल, निष्कल व सकल-निष्कल असे तीन प्रकारचे असते. सत्य-विज्ञान-आनंदरूप, अमृत, सर्वव्यापी, निरंजन, अत्यंत सूक्ष्म, अवर्णनीय तत्त्व हे त्याचे निष्कल स्वरूप होय. त्रिगुणात्मिका प्रकृति किंवा माया ह्या आपल्या शक्तीच्या साह्याने ते ब्रह्मतत्त्व ईश्वररूपाने प्रकट होते, हे त्याचे सकल रूप होय. ईश्वराचे विविध अवतार उदाहरणार्थ दत्तात्रेय हे ब्रह्माचे सकल-निष्कल रूप आहे. विश्वोत्पत्तीची अशी संगती लावून ह्या ब्रह्मविद्येच्या अनुषंगाने काही महत्त्वाच्या संज्ञा — परब्रह्म, आत्मा, महेश्वर व दत्तात्रेय — त्यांच्या व्युत्पत्तीसह स्पष्ट केल्या आहेत (३.१.१-८). ग्रंथाच्या शेवटी दत्तात्रेयांचे स्तोत्र दिलेले असून त्यांच्या ध्यानाने सर्व पापांपासून मुक्ती होते व नि:श्रेयसप्राप्ती होते असे म्हटलेले आहे.

शाण्डिल्य उपनिषदात सांगितलेला योग हा पतंजलींच्या योगापेक्षा काही ठिकाणी निराळा आहे. उदाहरणार्थ अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह या पाचांचा समावेश पतंजलींनी यमांमध्ये केला आहे (योगसूत्र २.३०). तर शाण्डिल्य उपनिषदात यमांची संख्या दहा आहे. पतंजलींनी योगसूत्रात शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वरप्रणिधान हे पाच नियम नमूद केले आहेत (योगसूत्र २.३२); तर शाण्डिल्य उपनिषदात नियमांची संख्या देखील दहा आहे.

महर्षी पतंजलींनी योगसूत्रात कोणत्याही आसनाचा उल्लेख केलेला नाही; तर शाण्डिल्य उपनिषदात आसनांच्या नावांचा उल्लेख केला आहे. पतंजलींच्या मते प्राणायाम म्हणजे श्वास-उच्छ्वासाची गती रोखणे होय (योगसूत्र २.४९); तर शाण्डिल्य उपनिषदात प्राण व अपान वायूंचा संगम हाच प्राणायाम होय अशी प्राणायामाची व्याख्या आढळते. पतंजलींच्या मते प्रत्याहार म्हणजे इंद्रियांचा त्यांच्या विषयांशी संयोग नसताना ती इंद्रिये निष्क्रिय राहणे (योगसूत्र २.५४); तर शाण्डिल्य उपनिषदानुसार प्रत्याहार म्हणजे जे जे दृष्टिपथास येईल ते ते सर्व आत्मरूप आहे असे जाणणे, तसेच नित्य करावयाच्या विहित कर्मांच्या फळांचा त्याग करणे इत्यादी  होय. पतंजलींनी एखादया विशिष्ट स्थानावर मन स्थिर करणे म्हणजे धारणा अशी धारणेची व्याख्या केली आहे (योगसूत्र ३.१); तर शाण्डिल्य उपनिषदात धारणेचे विषयदेखील सांगितले आहेत. शाण्डिल्य उपनिषदात सांगितलेल्या ध्यानाच्या सगुण आणि निर्गुण ह्या दोन प्रकारांचा पतंजलींच्या योगसूत्रात उल्लेख आढळत नाही. महर्षि पतंजलींनी चित्ताच्या वृत्तींचा निरोध म्हणजे योग अशी योगाची व्याख्या केली आहे; तर शाण्डिल्य उपनिषदानुसार योग म्हणजे प्राण व अपान ह्यांचा योग होय.

शाण्डिल्य उपनिषदानुसार समाधि म्हणजे जीवात्मा व परमात्मा यांची आनंदरूप ऐक्यावस्था होय; तर पतंजलींच्या योगसूत्रानुसार समाधीमध्ये जीवात्मा व परमात्मा यांचे ऐक्य शक्य नाही. शाण्डिल्य उपनिषदात आढळणाऱ्या योगाचे वर्णन वेदांतदर्शनावर आधारित  आहे.

                                                 समीक्षक : कला आचार्य