तत्त्वसमाससूत्र हा सूत्ररूप ग्रंथ इसवी सनाच्या चौदाव्या किंवा पंधराव्या शतकात निर्माण झाला. त्याच्या कर्त्याविषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही. काही विद्वानांच्या मते हा ग्रंथ कपिलमुनींचीच रचना आहे. प्राचीन सांख्य ग्रंथात तसेच माधवाच्या सर्वदर्शनसंग्रहात (चौदावे शतक) तत्त्वसमाससूत्राचा निर्देश आढळत नाही. समास म्हणजे संक्षेप. सांख्य दर्शनातील तत्त्वे प्रस्तुत ग्रंथात संक्षेपाने सांगितली आहेत, म्हणून या ग्रंथाला तत्त्वसमाससूत्र असे म्हटले आहे. या सूत्रांमध्ये पुढीलप्रमाणे विवेचन आढळते —

अव्यक्त, महत्, अहंकार व पाच तन्मात्र या आठ प्रकृति आहेत. ज्यापासून अन्य तत्त्वाची उत्पत्ती होते त्याला प्रकृति म्हणतात. पाच ज्ञानेंद्रिये, पाच कर्मेंद्रिये, पाच महाभूते आणि मन असे सोळा विकार आहेत. ज्याची अन्य तत्त्वापासून उत्पत्ती होते त्याला विकार म्हणतात. वृत्तींचा साक्षी, नित्य, भोक्ता पुरुष हे तत्त्व आहे. सत्त्व, रजस् आणि तमस् हा तीन गुणांचा समूह आहे. सृष्टीच्या उत्पत्तीला सञ्चर म्हणतात. सृष्टीच्या प्रलयाला प्रतिसञ्चर म्हणतात. महत्, अहंकार, मन, पाच ज्ञानेंद्रिये आणि पाच कर्मेंद्रिये यांना अध्यात्म अशी संज्ञा आहे. (सूत्र १ ते ७).

बुद्धीने जाणावयाचा विषय, अहंकारद्वारा मनन करण्याचा विषय, मनाद्वारे केल्या जाणाऱ्या संकल्पाचा विषय, पाच ज्ञानेंद्रियांचे शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे विषय व पाच कर्मेंद्रियांच्या वचन, आदान, गमन, उत्सर्जन आणि आनंद या क्रियांचे विषय यांना अधिभूत असे म्हणतात. अधिदैवतामध्ये इंद्रियांच्या देवतांचा समावेश होतो. ब्रह्मा (बुद्धी), रुद्र (अहंकार), चंद्र (मन), दिशा (श्रोत्र), वायु (त्वचा), सूर्य (चक्षु), वरुण (रसना), पृथ्वी (घ्राण), अग्नि (वाक्), इंद्र (पाणि), विष्णु (पाद), मित्र (पायु) आणि प्रजापति (उपस्थ) हे अधिदैवत आहेत. (सूत्र ८ व ९).

बुद्धी, अहंकार, मन, ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिये यांच्या वृत्ती या पाच अभिबुद्धी होत. ‘अमुक कार्य अवश्य केले पाहिजे’ असा निश्चय करणारी बुद्धीची वृत्ती, ‘अमुक कार्य मी करतो’ असा अभिमान व्यक्त करणारी अहंकाराची वृत्ती, ‘अमुक कार्य करावयाची माझी इच्छा आहे’ असा संकल्प करणारी मनाची वृत्ती, ज्ञानेंद्रियांची शब्दादि विषयांकडे जाणारी ‘कर्तव्यता’ नावाची वृत्ती, वाणी (बोलणे), हात (आदान म्हणजे घेणे), पाय (चालणे), गुद (उत्सर्जन), उपस्थ अर्थात् जननेंद्रिय (आनंद) या कर्मेंद्रियांची ‘क्रिया’ नावाची वृत्ती आहे. धृति (वाणी, कर्म व संकल्प या तिघांना धारण करणे), श्रद्धा, सुखा (विद्या, कर्म, तप, प्रायश्चित्त), विविदिशा (जाणण्याची इच्छा) तसेच अविविदिशा (जाणण्याच्या इच्छेसाठी अडथळा) या पाच कर्मयोनी कर्मापासून उत्पन्न होतात व कर्माला जन्म देतात. यातील केवळ विविदिशा मोक्षासाठी उपयुक्त आहे. (सूत्र १० व ११).

प्राण, अपान, व्यान, उदान व समान हे पाच वायु आहेत. कर्ता शुभ-अशुभ इत्यादी पाच प्रकारचे कर्म करणारा असतो. जे अनित्य आहे त्याला नित्य, जे अशुद्ध आहे त्याला शुद्ध, जे दु:खरूप आहे, त्याला सुख आणि जे आत्मा (चेतन) नाही, त्यालाही आत्मा समजणे अशी पाच प्रकारची अविद्या आहे. (सूत्र १२ ते १४).

मन, बुद्धी, अहंकार आणि पाच ज्ञानेंद्रिये व पाच कर्मेंद्रिये या तेरा इंद्रियांपैकी कोणत्याही एका किंवा अनेक इंद्रियात व्यंग असेल (बहिरेपणा, पंगुत्व, अंधत्व इत्यादी), तर त्याद्वारे विषयाचे ग्रहण योग्य रीतीने होऊ शकत नाही. इंद्रियांच्या व्यंगामुळे बुद्धी आपले काम करण्यास असमर्थ ठरते, याला अशक्ति असे म्हणतात. अशक्तीचे २८ प्रकार आहेत. पुरुषाचे सत्य स्वरूप जाण्यासाठी शास्त्राचा आधार न घेता संसारिक वस्तूत संतोष मानणे किंवा भ्रामक कल्पनांना बळी पडणे अशा अज्ञानी माणसाच्या एकूण ९ प्रकारच्या तुष्टि आहेत. (सूत्र १५ व १६).

ऊह म्हणजे तर्क, शब्दाच्या माध्यमाने प्राप्त होणारे ज्ञान, अध्ययनातून प्राप्त होणारे ज्ञान, आध्यात्मिक दु:खाचा नाश करणारे ज्ञान, आधिभौतिक दु:खाचा नाश करणारे ज्ञान, आधिदैविक दु:खाचा नाश करणारे ज्ञान, सहाध्यायी मित्रांच्या सहवासातून प्राप्त होणारे ज्ञान, गुरूला दिलेल्या दानानंतर संतुष्ट झालेल्या गुरूंकडून मिळालेले ज्ञान किंवा विवेकज्ञानामुळे होणारी शुद्धी अशा ८ प्रकारच्या सिद्धी आहेत. मूलिक अर्थ म्हणजे प्रकृति आणि पुरुषाचे एकत्व, अनेकत्व इत्यादी धर्म होत. मूलिक अर्थ १० प्रकारचे आहेत. (सूत्र १७ व १८).

पाच तन्मात्रांच्या निर्मितीला अनुग्रहसर्ग म्हणतात. देव, पाळीव पशु, वन्यपशु, पक्षी, सर्प इत्यादी सरपटणारे प्राणी, वनस्पती आणि मनुष्य यांच्या निर्मितीला भूतसर्ग असे म्हणतात. बंध म्हणजे मुक्तीमधील अडथळे तीन प्रकारचे आहेत. त्यांची नावे प्राकृतिक, वैकृतिक आणि दक्षिणाबंध अशी आहेत. अविद्येची निवृत्ती, विषयांप्रति असलेल्या आकर्षणाची निवृत्ती आणि कर्मांपासून निवृत्ती असा तीन प्रकारचा मोक्ष आहे. प्रत्यक्ष, अनुमान व आप्त वचन असे तीन प्रकारचे प्रमाण आहे. आध्यात्मिक, आधिदैविक व आधिभौतिक असे तीन प्रकारचे दु:ख आहे. (सूत्र १९ ते २४).

क्रमदीपिका या तत्त्वसमाससूत्रावरील टीकेत असे म्हटले आहे की, “ज्याला ही तत्त्वे समजली, त्याला ज्ञानप्राप्तीसाठी अन्य काही करण्याची आवश्यकता नाही आणि त्याला त्रिविध दु:खाची बाधा होत नाही.” भावागणेश मात्र हे स्वतंत्र सूत्र मानतो.

तत्त्वसमाससूत्र या ग्रंथाने सांख्य दर्शनातील सूत्रवाङ्मयात मोलाची भर घातली. संक्षेप हे सूत्रवाङ्मयाचे वैशिष्ट्य असते. ते येथे सर्वत्र आढळून येते. शिवाय हा संक्षेप केवळ शब्दसंख्येचा नसून सांख्य दर्शनातील तत्त्वे येथे संक्षेपाने सांगितली आहेत. त्यामुळे लक्षात ठेवण्याच्या दृष्टीने हा ग्रंथ उपयुक्त आहे.

                                                                                                   समीक्षक : रुद्राक्ष साक्रीकर